माझ्या छोटय़ा वाचकांनो, या लेखमालेची सुरुवात नक्कीच लिंबाच्या पदार्थाने व्हायला हवी, खरं ना? आता तुम्ही म्हणाल, ‘लिंबू सरबतामध्ये काय करायचं आहे? बाजारातून सरबताची पूड आणायची, पेल्यामध्ये ती पूड घालायची आणि त्यावर थंडगार पाणी ओतून छान चव घेत घेत पिऊन टाकायचं.. इतकं सोप्पंय!’

पण माझ्या दोस्तांनो, मी सांगतो त्या पद्धतीने लिंबू सरबत करून पाहिलंत ना, तर तुम्ही बाजारातल्या सरबताला पार विसरून जाल. हं, पेल्यात पुडी आणि पाणी ओतण्यापेक्षा अवघड नक्कीच आहे; पण एक प्रॉमिस नक्की करतो, की त्या सरबतापेक्षा तुमच्या सरबताची चव हज्जारपट धम्माल असेल. मग करायची सुरुवात?

चार ग्लास सरबताकरता साहित्य : २ ते ३ मोठी लिंबं, ८ चमचे साखर, चार ग्लास थंड- शक्यतो माठातले पाणी, दोन हिरव्या वेलच्यांचे दाणे आणि २-३ चिमूट मीठ.

अन्य साहित्य : एक गंज किंवा पातेलं आणि डाव किंवा मोठा चमचा, लिंबू कापण्याकरता चाकू किंवा सुरी आणि लिंबू पिळण्याकरता महादेव किंवा लिंबू पिळायचा चिमटा, वेलची कुटण्याकरता छोटा खलबत्ता.

कृती : लिंबं चांगली स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. निम्मी चिरून त्यातील बिया काढून टाकून द्या. चिमटय़ाने किंवा महादेवावर लिंबू पिळणार असाल तर बिया आपोआपच वेगळ्या होतात. लिंबू हाताने पिळणार असाल तर मात्र बिया न चुकता काढा. मोठय़ा गंजात किंवा पातेल्यामध्ये चार ग्लास पाणी मोजून आधीच घेऊन ठेवा आणि त्यात लिंबाचा रस टाका. दोन हिरव्या वेलच्या सोलून त्यातील बिया थोडय़ा साखरेसोबत कुटून घ्या. साखर, मीठ आणि वेलची-साखरेचा कुट्टा लिंबूरस टाकलेल्या पाण्यात घालून चांगलं ढवळा. साखर आणि मीठ चांगलं विरघळायला हवं. चव घेऊन पाहा. जास्त गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण थोडं वाढवा.

लिंबाच्या रसामध्ये वेलची पूड घालण्याची आणि त्यायोगे स्वाद आणण्याची हातोटी माझ्या आजीची. तिचं लिंबू सरबत आमच्या साऱ्या नातेवाईकांमध्ये आणि आम्हा नातवंडांमध्ये खास प्रसिद्ध होतं. गंमत म्हणजे ती ऋतूनुसार या लिंबाच्या सरबतामध्ये काही छोटे बदल करून ते स्वादिष्ट करायचीच; शिवाय ते अधिक परिणामकारकही व्हायचं. साखरेऐवजी मध, वेलचीऐवजी किंचित आल्याचा रस आणि क्वचित कधी जिरेपूड वापरून ती लिंबाच्या सरबताची चव बदलायची आणि औषधी गुणधर्मही वाढवायची. केरळात असताना मी मध आणि मिरेपूड घातलेलं लिंबू सरबत प्यायलो, त्याची चव आपल्या नेहमीच्या लिंबू सरबतापेक्षा फारच वेगळी, तरी खूपच मजेदार होती. आंबट, गोड आणि किंचित तिखट असं हे लिंबाचं सरबत आजही माझ्या जिभेवर रेंगाळतं. माझी खात्री आहे, तुम्हाला मी सांगितलेली माझ्या आजीची रेसिपीच सगळ्यात जास्त आवडेल. तरीदेखील तुम्हाला कोणतं लिंबाचं सरबत आवडतंय, ते सगळी निरनिराळ्या प्रकारची लिंबू सरबतं करून ठरवा आणि मला नक्की सांगा.

श्रीपाद

contact@ascharya.co.in