26 March 2019

News Flash

टेड ED

तुम्हाला ऑनलाइन गेल्यावर व्हिडीओज् बघायला आवडतात..

तुम्हाला ऑनलाइन गेल्यावर व्हिडीओज् बघायला आवडतात.. हो ना! आई-बाबांचा फोन हातात मिळाला की लगेच एकतर तुम्ही गेम्स खेळायला सुरुवात करता किंवा मग यूटय़ूबवर जाता. आणि तिथे उपलब्ध असलेल्या अगणित व्हिडीओज्मध्ये तुमच्या आवडीच्या व्हिडीओज्ना हुडकून काढता. यूटय़ूबच्या महासागरात व्हिडीओ शोधणं तुमच्या आई-बाबांना जितकं अवघड जातं तेवढं तुम्हाला जात नाही. या गोष्टी तुम्ही चुटकीसरशी करू शकता. म्हणूनच आज मी तुमची एका भन्नाट साइट्शी ओळख करून देणार आहे. या साइटचं नाव आहे टेड टेडटॉक या जगप्रसिद्ध संस्थेचीच ही साइट आहे. आणि विशेषत: मुलांना डोळ्यासमोर ठेवून या साइटची निर्मिती केलेली आहे. तुम्हा मुलांच्या डोक्यात सतत नवनवीन कल्पना उगवत असतात. नवीन काहीतरी करून बघण्याची इच्छा असते. अगणित प्रश्न पडतात, त्यांची उत्तरं कशी मिळवायची हाही प्रश्नच असतो ना तुमच्यासमोर! मग आता टेड एच्यिा साइटवरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं तर तुम्ही शोधू शकताच; पण त्याचबरोबर ऑनलाइन क्लब तयार करू शकता. तुमचे वर्गमित्र, एका विषयावर काम करणारा शाळेतल्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप एकत्रितपणे या साइटवर क्लब सुरू करू शकता. या क्लबच्या माध्यमातून तुमच्या मनातल्या प्रश्नांना, तुमच्या कल्पनांना आकार देऊ  शकता. त्यावर चर्चा करण्याची, या साइट्सही जोडलेल्या जगभरातल्या शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळवू शकता. जगभरातल्या अनेक क्लबच्या मुलांशी मैत्री करून त्यांच्या आणि तुमच्या कल्पनांची देवाणघेवाण करू शकता.  आहे की नाही भन्नाट कल्पना!

या साइटवर २,८८,१९३ माहितीपूर्ण व्हिडीओज् आहेत. या व्हिडीओज्च्या प्रचंड मोठय़ा खजिन्यातून १९,१०७,१३५ एवढय़ा प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, कला, व्यवसाय, आरोग्य, भाषा, गणित, धर्म, इतिहास, तत्त्वज्ञानापासून मानसशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणापर्यंत विविध विषयांवरचे हे व्हिडीओज् आहेत. तुमच्या मनात एखादी शंका आहे, प्रश्न आहे तर या साइटवर जा, सर्च करा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज मिळू शकतं. तुमच्या शाळेत विज्ञान गट असतील तर तुम्ही मुलं एकत्रितपणेही हे व्हिडीओज् बघू शकता. त्यावर चर्चा करू शकता. वर्गात एखादा धडा शिकवून झाल्यानंतर त्या धडय़ाशी संबंधित विषयांवरचे व्हिडीओज् बघू शकता, जेणेकरून पाठय़पुस्तकातल्या माहिती पलीकडचे ज्ञान तुम्हाला मिळू शकेल.

या साइटवर सिरीज् म्हणूनही एक विभाग आहे. ज्यामध्ये भन्नाट विषय हाताळलेले आहेत. उदा. समजा, आपल्याला आवडणारे स्पायडर मॅन, सुपरमॅन, आयर्नमॅन खरंच असते किंवा निर्माण झाले तर? याविषयीचे व्हिडीओज् तुम्ही सुपरहिरो सायन्स सिरीजमध्ये बघू शकता. असे मानवी शोध, ज्यामुळे जगाचा इतिहासच बदलला त्यांची माहिती देणारी सिरीज् यात आहे. आपण विचार करतो म्हणजे नक्की काय करतो, आपल्या मनात आणि मेंदूत काय चालू असतं या विषयावर पण एक सीरिज आहे. असे कितीतरी वेगळे विषय घेऊन या सीरिज बनवल्या गेल्या आहेत. टेडच्या साइटवर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मनातल्या प्रश्नांची, शंकांची उत्तरं देणारे व्हिडीओज् तर बघू शकताच. शिवाय विविध विषयांवरच्या सीरिज तुम्हाला बघायला मिळतील. शिवाय तुम्ही क्लब सुरू करू शकता. हे सगळं मोफत उपलब्ध आहे. ऑनलाइन गेल्यावर यूटय़ूब हा एकच पर्याय असतो असं आपल्याला उगाच वाटत असतं. टेड च्या साइटवर काही लाख व्हिडीओज् तुम्हा मुलांसाठी उपलब्ध आहेत. रोज एक बघायचं ठरवलं तरी किती माहिती तुम्ही मिळवू शकता विचार करा!

रेड अलर्ट

आई-बाबा आपल्याला हौसेने फोन घेऊन देतात किंवा स्वत:चा फोन आपल्याला वापरायला देतात. स्मार्ट फोन, टॅब या महागडय़ा वस्तू असतात. एखादं खेळणं तुटलं की जसं लगेच दुसरं मिळू शकतं तसं गॅजेट्सचं असत नाही. तसंच गॅजेट्सवर किती वेळ घालवायचा यालाही काही मर्यादा असणं आवश्यक आहे. तुम्ही अनुभवलं असेल की, एकदा हातात फोन आला की वेळ कसा जातो तेच कळत नाही. त्यामुळे काही गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. हातात स्मार्टफोन आला याचा अर्थ तुमची जबाबदारी वाढली आहे.

  • स्मार्ट फोन जरी पालकांनी भेट दिला असला तरी तो त्यांनी बरेच पैसे खर्च करून विकत आणलेला असतो. त्यामुळे तुम्ही फोनला पासवर्ड टाकलात तरी तो आई-बाबांना माहीत असायला हवा.
  • तो फोन तुमचाच असला तरी तो आई-बाबांचाही आहे हे कधीही विसरायचं नाही.
  • शाळेत, क्लासला फोन घेऊन जायची गरज नसते. मित्र-मैत्रिणींवर शायनिंग मारण्याचा कितीही मोह झाला तरी शाळेत फोन न्यायाचा नाही.
  • रात्री फोन बंद करूनच झोपायचं. घरात वायफाय असेल आणि फोन चालू असेल तर तो सतत वाजत राहतो आणि त्यामुळे झोपमोड होऊ शकते. या वयात तुम्हाला पुरेशी झोप मिळणं गरजेचं आहे. सो, रात्री फोन बंद.
  • उगीचच शेजारी बसलेल्या मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग कशाला करायचं? जिथे प्रत्यक्ष संवाद शक्य आहे तिथे प्रत्यक्षच बोललं पाहिजे. त्याची मजा चॅटिंगला नाही. अनुभव घेऊन बघा.

टेड ED च्या साइटवर जाण्यासाठी तुम्ही https://ed.ted.com या लिंकचा वापर करा. टेड ED च्या चळवळीशी जगभरातले २,५०,००० शिक्षक जोडलेले आहेत. आणि दर आठवडय़ाला काही दशलक्ष शिक्षक आणि मुलं या साइटला भेट देत असतात.

 

– मुक्ता चैतन्य

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

First Published on March 11, 2018 1:02 am

Web Title: how to use ted ed