News Flash

तुम्हीच शिल्पकार!

बाईंनी त्याला खूप समजावलं आणि सांगितलं, ‘‘अरे राज, तुम्ही मुलांनी आपल्या आईला समजून घ्यायला पाहिजे

प्रतिनिधिक छायाचित्र

‘‘आर्या, सानू, नील, केदार..  आवरला का तुमचा नट्टापट्टा? चला लवकर! आपल्याकडे आज तुम्हा मित्रांचं गेटटुगेदर आहे ना, सकाळपासून एकटीनं तयारी करून दमले मी. जरा मलासुद्धा मदत करा रे! सगळ्यांसाठी मिसळीचा बेत आहे.. आणि अजून कांदा, कोथिंबीर, लिंबू सगळं चिरून व्हायचंय.’’ आईचं बोलणं ऐकून ‘हा नचीदादा तुला मदत करतो हं, थांब!’ असं म्हणत नची पुढे सरसावला.

‘‘अरे, सुरी नको घेऊ, हात कापेल. त्यापेक्षा खायच्या डिश घे. प्यायचे पाणी भरून घे.’’ आईनं दिलेल्या सूचनेला होकारार्थी मान डोलवत नची कामाला लागला. इतक्यात दारावरची बेल वाजली.

‘‘नील, दार उघड. कोण आलंय बघ.’’ शांताआजीने आवाज दिला.

‘‘अरे व्वा! आले की सगळे. याऽऽ याऽऽ ‘हॅपी चिल्ड्रेन्स डे.’ असं म्हणत नीलनं सगळ्यांचं स्वागत केलं. राधा, श्रीश, रसिका,

ऋ जुता, आदिती अशी सगळी मुलं छान नटूनथटून आली होती.

केदारच्या आजीचा सोसायटीतल्या मैत्रिणींचा छानसा ग्रुप आहे. या सगळ्या मुलांच्या आयांची आजी खास मैत्रीण आहे. रोज गप्पा मारताना या मैत्रिणी मुलांच्या वागण्याबद्दल, स्वभावाबद्दल, आई म्हणून स्वत:च्या होत असलेल्या मानसिक कुचंबणेबाबत बोलत असत. शाळेत बाईंनी, शिक्षकांनी सांगितलेलं मुलांना पटत नाही आणि काही वेळा ते ऐकावंच लागतं. पण घरामध्ये फक्त आई आणि बाबा दोघंच आणि तेही नोकरीसाठी बराच वेळ घराबाहेर असणारे. त्यामुळे मुलांना त्याबद्दल काय वाटतं? मुलं नाराज तर नाहीत ना? ती आई-बाबांशी बोलायला घाबरतात का? असे अनेक प्रश्न प्रत्येक पालकाला सतावत होते. शांताआजी हे सगळं रोज ऐकत होती. आज बालदिनाचं औचित्य साधून तिनं मुलांशी या विषयावर बोलायचं ठरवलं होतं. रोज हसून, गप्पा मारणारी, सगळ्यांशी प्रेमानं बोलणारी शांताआजी मुलांचीही लाडकी आजी होती. आज म्हणूनच आजीनं मुलांना पार्टीसाठी बोलावलं होतं.

‘‘या बाळांनोऽऽऽ याऽऽ’’, असं म्हणत आजीनं सगळ्यांना कुरवाळलं. सगळ्या मुलांना बालदिनानिमित्त कॅडबरी, छानसं पुस्तक आणि आजीनं स्वत: तयार केलेलं ग्रीटिंग दिलं होतं. त्यामध्ये ‘श्यामची आई’ पुस्तकातली छानशी वाक्ये निवडून ती लिहिली होती आजीनं! आजीनं दिलेली भेट घेताना मुलं खूश झाली होती. प्रत्येक जण कौतुकानं पुस्तक, ग्रीटिंग उघडून बघत होता. राधा मात्र मोबाईलवर गेम खेळण्यात गुंग होती.

‘‘अगं राधाऽऽऽ तुझ्याकडे मोबाईल कसा? एवढय़ा लहान वयात कित्ती मोबाईलला चिकटून बसतीस? चल गप्पा मार सगळ्यांबरोबर!’’ शांताआजी म्हणाली.

‘‘अशीच आहे ती! कुणाबरोबर बोलत नाही. सारखी मोबाईलवर गेम खेळते. शाळेतसुद्धा एकटी असते. कुऽऽण्णाशी बोलत नाही.’’ श्रीश म्हणाला.

रुसलेल्या आवाजात राधा म्हणाली, ‘‘आजी, तुम्ही सगळे मला रागवता. पण मी काय करू? आई-बाबा ऑफिसला जातात. घरी खेळायला दुसरं कुणीच नाही. मग कंटाळा आला की बसते टी. व्ही. बघत नाही तर गेम खेळत.’’

‘‘अगं राधा, पण आई-बाबा ऑफिसमधून आल्यावर घरीच असतात की, तेव्हा बोलावं त्यांच्याबरोबर खेळावं.. गप्पा माराव्यात.’’- इति आजी.

‘‘हो.. पण बाबा दमलेले असतात आणि आईचा स्वयंपाक असतो.’’ राधाचं बोलणं मध्येच थांबताच नची म्हणाला, ‘‘ए थापा नको हं मारू. अहो आजी, आई-बाबा असले की ही फक्त आपल्याच मनासारखं त्यांनी वागावं म्हणून हट्ट करते. मग ते रागावले की बाईसाहेब ्नरागावतात. मुळुमुळु रडायला लगेच येतं. हिच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी वाहायला लागतं. सगळ्यांनी हिचंच कौतुक करायला हवं. आणि हिच्याच मनासारखं वागायला पाहिजे.’’ राधा गाल फुगवून ऐकत होती.

‘‘हो आज्जी. आमच्या वर्गातला राजपण असाच आहे. परवा आमच्या बाई ‘श्यामच्या आई’ची गोष्ट सांगत होत्या. श्यामच्या आईनं श्यामवर किती छान संस्कार केले, प्रेम केलं. त्याच्या गोष्टी ऐकून आम्हा मुलांच्या डोळ्यात पाणी आलं. पण राज मात्र गप्प होता. बाईंनी त्याला कारण विचारलं तेव्हा म्हणतो कसा, ‘माझी आई कुठं माझ्याजवळ असते, ती साहेब आहे ना मोठय़ा ऑफिसात.. ती कायम बिझी असते.’’ ऋ जुता सांगत होती.

बाईंनी त्याला खूप समजावलं आणि सांगितलं, ‘‘अरे राज, तुम्ही मुलांनी आपल्या आईला समजून घ्यायला पाहिजे. तुझी आई खूप शिकलेली आहे. पण तिच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना व्हायला हवा नं! आणि तुमचे हट्ट असतात नं.. सायकल पाहिजे.. हॉटेलमध्ये जायचंय.. शिवाय शाळा, क्लासची महागडी फी भरायची असते. आई नोकरी करून घराला हातभार लावते नं! एवढी समज असायला हवी तुम्हाला. अरे बाळा, तुझी किंवा कुणाही मुलांची आई नोकरीसाठी बाहेर असली तर तिचं सगळं लक्ष आपल्या मुलांकडेच असतं. घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी.’’ बाई समजावणीच्या सुरात म्हणाल्या.

केदार म्हणाला, ‘‘आज्जी, आपल्याकडेही आई नोकरी करतेच की! पण ती नेहमी आम्हाला समजावून सांगते की बाळांनो, तुम्ही शाळेत जाताना तुम्हाला बाय करावं, तुम्ही घरी येता तेव्हा तुम्हाला गरम जेवायला वाढावं, तुमच्यात रमावं, असं मलाही नेहमीच वाटतं रे! आपल्याला बराच वेळ घराबाहेर राहायला लागतं, मुलं घरी एकटी असतात याचं आई म्हणून अपराधीपण वाटतं. पण मग अशा वेळी क्वान्टिटी टाईमपेक्षा, क्वालिटी टाईम महत्त्वाचा याची जाणीव ठेवून घरात आल्यानंतरचा प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार तुमच्यासाठीचा असतो. तुमच्यावर खूप प्रेम आहे आमचं. अरे, जितके आपण दूर असतो तितकेच मनानं, प्रेमानं जवळ असतो. नातं घट्ट, मजबूत, सुंदर असलं नं की एकमेकांना समजून घेतोच आपण.’’

‘‘हो रे.. अगदी बरोबर’’ म्हणत आजीनं मान डोलवली.

‘‘आजी, माझंपण माझ्या आई-बाबांवर खूप प्रेम आहे. आई-बाबा नोकरी करतात, त्यांना प्रवासाची दगदग होते. ऑफिसमधल्या कामाचा ताण असतो आणि आमचा अभ्यास, खाणं- पिणं त्यांनाच बघावं लागतं. माझ्या आईच्या मदतीला दुसरं कुणीच नाही. मग मी आणि दादा आईला जमेल तशी मदत करतो. कधी ताटं घेतो, भाजी निवडतो, कपडे वाळत घालतो. कधीतरी चिडते आई आमच्यावर, पण आम्हाला राग येत नाही त्याचा. उलट तिची तळमळ समजते. मी तर आपणहून तिला शाळेत दिवसभर घडलेल्या गोष्टी सांगते. प्रोजेक्ट, अभ्यास, परीक्षा याबद्दल बोलते. अभ्यासाच्या वेळी तर हट्टच करते माझ्यासोबत बसण्याचा आणि ती खूश होऊन बसते. ’’ रसिका म्हणाली.

‘‘मीसुद्धा माझ्या वाढदिवसाला केक पाहिजे असा हट्ट करते, तसा मला छान पुस्तकं घेऊन दे, नवी गोष्ट सांग असा हट्ट करते.’’ आर्या म्हणाली.

एवढय़ात आई सगळ्यांसाठी मिसळ घेऊन आली. प्रत्येकाला डिश देता देता आई म्हणाली, ‘‘बाळांनो, तुमचे आई-बाबा तुमच्याशी खूप मोकळेपणानं वागतात. मित्रत्वाच्या नात्यानं तुमच्याबरोबर खेळतात, बोलतात. तुमच्या आवडी-निवडी जोपासण्याचं स्वातंत्र्य देतात. तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देतात, मार्गदर्शन करतात. तुमच्या गुणांचं कौतुक करतात, पण त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा नाही घ्यायचा. घरात कधी ‘नाही’ हा शब्द ऐकला नाही तर बाहेर समाजात, मित्रांत, नात्यात वावरताना कुणी आपल्याला ‘तू चुकलास’ किंवा एखादी गोष्ट नाही मिळणार म्हटलं की मग स्वाभिमान दुखावतो. मग अशी मुलं एकलकोंडी, भित्री, अबोल होतात.

‘‘हो काकू. माझ्या बाईपण सांगतात, ध्येयापर्यंत पोचण्यासाठी खूप कष्ट करा, ‘न’ कार पचविण्याची ताकद वाढवा. आपल्या आई-बाबांना समजून घ्या.’’ सानू म्हणाली.

एव्हाना मुलांनी मिसळ फस्त केली होती. सगळ्यांना आईस्क्रीमचा कप देताना शांताआजी म्हणाली, ‘‘मुलांनो, तुम्ही मुलं म्हणजे आमचं विश्व असता रे! आमची खूप मोठ्ठी  संपत्ती म्हणजे तुम्ही मुलं आहात. बाबांनी नोकरीसाठी घराबाहेर पडणं ही जगरहाटीच आहे. पण आई नोकरीसाठी घराबाहेर पडली आणि घरची, मुलांची घडी विस्कटली की सगळीकडे ‘तो’ चर्चेचा विषय होतो. मुलांकडे  दुर्लक्ष होतं का? मुलांची मानसिक, भावनिक कुचंबणा होते का? मायेची ऊब कमी झाली का? मुलं एकलकोंडी, आत्मकेंद्री झाली का? असे असंख्य प्रश्न आपलेच लोक विचारायला लागतात. मग पालक धास्तावतात. मुलांच्या मनाची चाचपणी करावीशी वाटते त्यांना. अरे बाळांनो, तुम्ही मुलं हेच सर्वस्व असतं आमचं. मुलांच्या सुखात ते सुख शोधतात. अशा आई-बाबांना समजून घ्यायाला हवं ना! आपल्या मायेची ऊब देणाऱ्या आई-बाबांना आपण श्वास आहोत, हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. आई-बाबांना काही सांगायचं असेल, काही कमी पडत असेल तर हट्टानं बोला त्यांच्याशी. एरवी तुम्हाला पाहिजे त्या गोष्टींसाठी हट्ट करता ना.. तस्सा. आमचं ऐकून घ्या, मला बोलायचं आहे तुमच्याशी असा हट्ट करा. आईने घरीच रहावं हा बालिश हट्ट चुकीचा आहे. शिवरायांना घडवणारी जिजाऊ, झाशीची राणी, इंदिरा गांधी, किरण बेदी, लतादीदी अशा कितीतरी स्त्रियांकडे किती वेगळ्या अलौकिक क्षमता होत्या. त्या घरात बसल्या असत्या तर?’’ मुलं आजीचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत मान डोलवत होती. आजीचं म्हणणं मुलांना पटत होतं.  शाळेमध्ये बालदिन साजरा होतोच. मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा होतात. चित्रकलांची प्रदर्शनं होतात. मुलांनी केलेल्या खाद्यपदार्थाचे स्टॉल्स लावले जातात. नाच, गाणी आणि बरंच काही उत्साहानं साजरं होतं. पण आज आजीनं मुलांच्या मनाला समजावण्याचं मोठ्ठं काम केलं होतं. लहान मुलं अविचारानं अघोरी कृत्य करतात. कधी नैराश्यानं एकाकी होतात. मोबाईलच्या आहारी जाऊन कल्पनाविश्वाला बळी पडतात, हे आजी सतत वर्तमानपत्रांमध्ये वाचत होती. टी.व्हीवर बघत होती. म्हणूनच बालदिनाच्या निमित्तानं ही बालके शरीराबरोबर मनाने, भावनेने, विचारांनी आणि बुद्धीने सशक्त होणं फार गरजेचं आहे, हे शांताआजीनं जाणलं. घराला समजून घेणारी मुलं समाजालाही समजून घेतील तरच त्यांची प्रगती होईल, नाही तर दरवेळी मुलांना ‘कारणं’ द्यायची सवय लागते. हे सगळं आजीला चांगलं माहीत आहे. म्हणूनच मुलांशी गप्पा मारण्याच्या निमित्तानं आजची पार्टी होती.

आज आजीचं बोलणं म्हणूनच सगळ्या मुलांना पटले. आता गाण्याच्या भेंडय़ा सुरू झाल्या होत्या. मुलं छान रमली होती. आजीनं एका दगडात दोन पक्षी मारले होते. मस्त मजेबरोबर नवा विचार दिला. मुलांची गाणी सुरू असतानाच आदितीनं हट्ट केला, ‘‘ए आजी, तू म्हण ना एखादं गाणं..’’ मग आजीनं सगळ्या मुलांना जवळ घेऊन गाणं म्हणायला सुरुवात केली.

‘‘या लाडक्या मुलांनो..

तुम्ही मला आधार..

नवहिंदवी युगाचे..

तुम्हीच शिल्पकार..!’’

प्रा. मीरा कुलकर्णी meerackulkarni@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 1:03 am

Web Title: interesting short moral story for kids 2
Next Stories
1 फुलांच्या विश्वात : कण्हेर
2 जीवचित्र ; भू भू.. भो भो
3 तिच्या धडाडीला मोनिकाकडून कौतुकाची थाप!
Just Now!
X