|| ज्योती कपिले

अरे अर्जुन, कर ना पटकन लेव्हल पार,  गेम आज कम्प्लीट करायचाच आहे आपल्याला.’’ अक्षय एकदम जोशात अर्जुनला म्हणाला.

‘‘हो रे बडी, ही लास्ट लेव्हल सॉलिड ट्रिकी आहे रे.’’ अर्जुनने अक्षयला तेवढय़ाच तत्परतेने उत्तर दिलं. मुलांना उन्हाळ्याची सुट्टी होती त्यामुळे तहानभूक विसरून ते कॉम्प्युटर गेम खेळण्यात मग्न होते.

‘‘अरे मुलांनो, तुम्ही गेले ४ तास झालेत, कॉम्प्युटरवर गेम खेळत आहात. आता उन्हाचा तडाखा जरा कमी झालाय. तेव्हा तुम्हाला मदानात खेळायला जायला काही हरकत नाहीये. नाहीतर आपल्या सोसायटीत खेळा बरं.’’ अक्षयच्या पप्पांनी अक्षय आणि अर्जुनला सांगितलं.

‘‘हो पप्पा, आम्ही जाणारच आहोत खेळायला, फक्त हा कॉम्प्युटर गेम संपला की जातोच.’’ अक्षय म्हणाला.

‘‘प्लीज काका, आमचा गेम पूर्ण होऊ द्याना.’’ अर्जुनने अक्षयच्या सुरात सूर मिळून सांगितलं.

‘‘बरं बुवा, पण तुमचा गेम लवकर संपवा. कारण गेला तासभर मी हेच ऐकतोय.’’ असे म्हणत अक्षयच्या पप्पांनी पुन्हा रविवारच्या पुरवण्या वाचण्यात दंग झाले.

आणि त्याच वेळेस कॉम्प्युटर खेळत असतानाच अक्षय आणि अर्जुनने एकमेकांच्या हातावर टाळी देत म्हटलं, ‘‘येस्स्, हमने तो गेम के सारे लेव्हल पार कर दिये है!’’ आणि कॉम्प्युटर शटडाऊन करून ते मस्ती, आरडाओरड करत खाली खेळायला गेले आणि सोबत अक्षयची बहीण गौरी आणि अर्जुनची बहीण गीतालाही घेऊन गेले. अर्जुन, गीता हे अक्षय- गौरीच्या काकाची मुलं, उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांच्या घरी राहायला आले होते.

पेपर वाचण्यात गुंग असलेल्या अक्षयच्या पप्पांना मुलांच्या आवाजाने थोडा त्रास  झाला, पण ते मुलं खाली खेळायला गेलेले बघून समाधानाने परत पेपर वाचू लागले.

रात्रीच्या जेवणानंतर मुलांचा आवडता फळांचा राजा आंबा खाण्याची वेळ झाली आणि नेहमीप्रमाणे कोण जास्त आंबे खातं याची चढाओढ लागली होती. ते बघितल्यावर अक्षयच्या पप्पांना आपलं बालपण आठवलं.

त्यांनी मुलांना विचारलं, ‘‘मला सांगा, तुम्ही आत्तापर्यंत कुठले कुठले आंबे खाल्ले आहेत?’’

अक्षय पटकन म्हणाला, ‘हापूस’, तर गौरी म्हणाली, ‘मी हापूस, तोतापुरी, पायरीपण खाल्लेत.’

‘‘या सगळ्या आंब्याबरोबर मी राजापुरी, बदामी आणि नीलम आंबापण खाल्लाय.’’ अर्जुन म्हणाला.

तर सर्वात छोटी, पण तेवढीच धिटुकली गीता म्हणाली, ‘‘काका, मी तर दशहरी आणि गोटी आंबेपण खाल्लेत.’’

ते ऐकताच अक्षय आश्चर्याने म्हणाला, ‘‘अरे गीता, कोणाला पुडय़ा सोडतेस? गोटी आंबे असतात का कधी?’’

‘‘असतात. मी काही पुडय़ा सोडत नाही वा खोटं नाही बोलत हं अक्षयदादा. हो ना काका, नासिकला मिळतात की नाही गोटी आंबे!’’ गीता अक्षयच्या प्रश्नाने वैतागत आपल्या काकाला विचारू लागली.

‘‘अक्षय बेटा, गीता खरं बोलतेय. नासिक आणि माझ्या आजोळी कळस गावाला गोटी आंबेच जास्त मिळतात. आणि हे आंबे कापून नाही तर फक्त चोखून खायचे असतात. असे अनेक प्रकारचे वेगवेगळे आंबे तिकडे मिळत असतात.’’ अक्षयचे पप्पा मुलांची उत्सुकता बघून गावठी आंब्याबद्दल त्यांना अजून माहिती देऊ लागले तेव्हा अर्जुन लगेच अक्षयला म्हणाला, ‘‘अरे, इकडे मुंबईला तर हापूस आंबेच जास्त खातात. म्हणून तुला माहिती नाहीये हे गोटी आंबे. आता येशील तेव्हा मी माझ्या पप्पांना तुझ्यासाठी गोटी आंबे आणायला सांगेन.’’

हे ऐकताच अक्षय त्याच्या पप्पांना म्हणाला की, ‘‘पप्पा, चला ना नासिकला, मला ते चोखून खायचे गोटी आंबे खायचे आहेत.’’

तेव्हा मुलाच्या गप्पा, गोटी आंब्याविषयी प्रश्न, उत्सुकता ऐकून अक्षयच्या पप्पा सर्व मुलांना म्हणाले की, ‘‘.. आणि हो, आता हापूसमध्येही गोटी हापूस निघालाय आणि त्यातील कोय छोटी असते.’’

‘‘एकदम चिंटुकली ना काका?’’ गीताने उत्सुकतेने विचारलं.

‘‘होय. बरं ऐका, आता या वेळी आपण माझ्या आजोळी कळस गावाला जाऊ या.’’ अक्षयच्या पप्पांनी फर्मान सोडलं.

‘‘कळस? ते कुठे आहे पप्पा?’’ गौरीने पटकन विचारलं.

‘‘कळस गाव हे संगमनेर जिल्ह्य़ात अकोला तालुक्यात आहे. लहानपणी आम्ही सिन्नरला राहत होतो. तिकडून तासा दोन तासांच्या अंतरावर कळस गाव आहे. तिकडे माझे मामा राहतात. त्यांची मोठ्ठी आमराई आहे. तिकडे आपण आमराईत फिरू या, शेतात जाऊ या, बलगाडी चालवू या, खूप आंबे, आमरस खाऊ या, धम्माल करू या. मुख्य म्हणजे गोटी आंबे खाऊ या. जे मुंबईत लवकर मिळत नाही आणि मिळाले तरी त्याला गावासारखी गोड चव नाही. अहाहा ‘ते’ आंब्याचे दिवस.’’

हे सर्व सांगताना अक्षयच्या पप्पांचा उत्साह बघून सर्वानाच कळस गावी जाण्याची ओढ लागली. आणि ते लक्षपूर्वक अक्षयच्या पप्पांचे बोलणं ऐकू लागले.

‘‘लहानपणी आम्ही सुट्टी लागली की मामाकडे पळायचो. सोबत अजय, मावशीचे संजू, राजू आणि गजू तर मामाचे नितीन आणि बाळू सगळे मिळून नुसती धम्माल करायचो, घर अगदी डोक्यावर घ्यायचो. रोज सकाळी उठल्यावर मामाबरोबर नदीवर पोहायला जायचो, आमच्या वेळी हेच आमचे स्वििमग क्लासेस होते. मात्र राजू काठावरच बसून राहायचा. आम्ही बाकी मुलं त्याला पाण्यात ओढायला बघायचो, पण तो मात्र भोकाड पसरायचा आणि आजीची दटावणी मिळायची. तशी आमची आजी खूप प्रेमळ, पण जर चुकीचं वागलं की तिच्या हातचा प्रसाद मिळायचा.’’

‘‘प्रसाद अरेव्वा, मला खूप आवडतो प्रसाद खायला, काय यम्मी लागतो ना.’’ गौरी चिवचिवली.

‘‘अहा रे वेडाबाई, आम्ही आजीच्या हातचा प्रसाद म्हणजे फटके खायचो. चल मग खायचा का प्रसाद?’’ पप्पांनी गौरीची गंमत केली.

तेव्हा, ‘‘सॉरी, मला वाटलं की, सत्यनारायण प्रसाद.’’ गौरी हिरमुसून म्हणाली. आणि मग सगळे तिच्यावर हसू लागलेत हे बघताच विषय बदलण्यासाठी गौरी पप्पांना पटकन म्हणाली, ‘‘पुढची गोष्ट सांगा नं पप्पा.’’

‘‘हं तर नदीवर अंघोळ, पोहणं आटोपलं की आम्ही नाष्टा करून आजोबांबरोबर शेतात जायचो, मस्त हुंदडायचो. बलगाडीत फिरायचो, मोटेने पाणी काढायचं, झाडांवर चढायचं आणि..’’

‘‘..आणि मग शेतात तर तुम्ही झाडावरचे आंबे तोडून खात असाल ना काका?’’ अर्जुनने उत्सुकतेने विचारलं.

‘‘अरे नाही रे अर्जुना, आम्हाला आमराईत आंबे तोडायला मनाई असायची, पण घरी मात्र दिवसभर आंबे खायला मिळायचे. जेवताना आमरस आणि पुरणपोळी असा फक्कड बेत व्हायचा. वाह, आमरस खावा तो माझ्या मामीच्या हातचा, असं म्हणत, म्हणत आम्ही पोटभर जेवायचो. पण तरीही सर्व भाऊ मिळून एक गंमत करायचो.’’

‘‘ती हो कुठली पप्पा?’’ गौरीने पटकन विचारलं.

‘‘ सांगतो, आजही ते सगळं आठवलं की मला हसू येतंय. आमच्या मामाचं घर खूप मोठ्ठं आहे. तिकडे पहिल्या मजल्यावर सगळी आंब्याची आढी पसरवून ठेवलेली असायची.’’

‘‘आंब्याची आढी म्हणजे काय?’’ हा समस्त बच्चे कंपनीला पडलेला प्रश्न.

‘‘अरे, आपण आंब्याची पेटी आणतो त्यात आंब्याच्या व्यापाऱ्यांनी जसे आंबे खराब होऊ नये म्हणून गवत ठेवून रचलेले असतात ना, तसेच  इकडे ते घरी जमिनीवर गवत ठेवून रचलेले असतात. अरे, पिकायला आलेल्या कैऱ्या तोडून जमिनीवर गवताची गादी करून त्यावर पसरवायच्या, रांगेत मांडून ठेवायच्या आणि परत त्यावर गवत पसरवून ठेवायचे. असे कैऱ्यांवर कैऱ्या, गवत ठेवत, रचत जायचं. त्याने आंबे हळूहळू पिकतात आणि खराबपण होत नाहीत.’’

‘‘पण काका, कैऱ्या का बरं तोडून ठेवायच्या? झाडावर का नाही पिकू द्यायच्या?’’ अर्जुनचा प्रश्न.

‘‘अरे अर्जुना, झाडावर पिकलेलं फळ खाली पडलं तर ते बहुधा अर्धकच्चं असतं त्याला शाक म्हणतात. आणि त्याची चव एकदम भन्नाट असते. असं फळ खाली पडलं की खराब होतं. किंवा पाखरं फळांना चोच मारतात, झालंच तर येणारे जाणारे झाडावर नुसते किंवा गलोलीने दगड मारतात, किंवा कोणी तर गुपचूप कैऱ्या तोडून नेतात, अगदी रखवालदार असले तरीही. मग ज्याची आमराई असते त्याचे नुकसान होते. म्हणून आंबे अध्रेकच्चे असतनाच तोडले जातात आणि विकले जातात.’’ अक्षयच्या पप्पांनी खुलासा केला.

‘‘अच्छा, अच्छा.’’- इति अर्जुन.

‘‘हं तर मी काय सांगत होतो, दुपारी आमच्या सर्वाची जेवणं झाली, आजी झोपली की आम्ही सगळी मुलं हळूच आंब्याची आढी ठेवलेल्या खोलीत जायचो. आणि कोण जास्त आंबे खातो अशी आमच्यात पज लागायची. मग तिकडे भरपूर आंबे खायचो. आणि खाल्लेल्या कोयी, सालं तिकडेच गवतात लपवून गुपचूप खेळायला निघून जायचो.’’ हे सांगताना अक्षयच्या पप्पांच्या चेहऱ्यावर एक मिस्कील भाव होते. आणि त्यांच्या नजरेसमोर ‘ते’ बालपणीचे आंबे खातानाचं चित्र उभं राहिलं होतं.

हे ऐकताच अक्षय पटकन म्हणाला, ‘‘पप्पा, त्या मम्मीला सांगा ती आम्हाला सारखी ओरडत असते की जास्त आंबे खाऊ नका. नाहीतर पोट दुखेल आणि सारखं पळावं लागेल दोन नंबरला.’’

‘‘ अरे बाळांनो, मम्मी लोकांचं बरोबरच असतं. आम्हालाही लहानपणी आंबे खाल्ल्यावर असाच त्रास व्हायचा, पण ते वय वेडं असतं. कोणाचं ऐकत नसतं.’’

‘‘मग काका तुम्हाला कोणी ओरडायचं नाही?’’ गीता अगदी आश्चर्याने आपल्या काकांना विचारू लागली.

‘‘नाही. आजोळी आमचे फक्त लाड व्हायचे. कधीमधी आजी ओरडायची- आजोबांना नाव सांगेल म्हणून. पण तिने कधीही आजोबांना आमचे गाऱ्हाणे सांगितले नाही. आणि मामा-मामी तर खूपच प्रेमळ होते. आमची मामी घरातले खायला काढलेले आंबे संपले की वरचे आढीतले आंबे आणायला जायची आणि वैतागून घमेलंभर आम्ही चोखलेल्या आंब्याच्या कोयी, साली ती आजीसमोर आणून ठेवायची.  मग काय, आजीची जोरदार तंबी मिळायची, पण मग आजोबा मात्र म्हणायचे. ‘‘खाऊ द्या त्यांना आंबे, ते आपलं उगाच मज्जा म्हणून खातात, चार दिवस खातील आणि जातील आपल्या घरी.’’

मग आजी वैतागत म्हणायची, ‘‘मी आंबे खायला कुठे नाही म्हणते? आंबे खा, पण निदान चोखलेल्या कोयी, साली तर तिकडेच लपवून ठेवू नका, उगीच माश्या भणभणतात. तर मामी आम्हाला हळूच म्हणायची, ‘‘भाचरांनो आंबे जपून खा नाहीतर पोटात दुखेल.’’

‘‘अरे वा! पप्पा, लहानपणी तुम्ही तर तुमच्या आजोळी खूपच मज्जा केलीत की.’’ अक्षय हसत हसत म्हणाला.

‘‘ हो, तसे आम्ही भाग्यवान. आमच्या वेळी असं कॉम्प्युटर, मोबाइलचं  फॅड नव्हतं. त्यामुळे आम्ही लहानपणी खूप खेळलो, मज्जा केली. सुट्टी लागली की आम्हाला आजोळी जायचे वेध लागायचे. आणि अजून एक गंमत म्हणजे आजोबांचे किराणामालाचे दुकान होते..’’

हे ऐकताच गीता आनंदाने म्हणाली, ‘‘व्वा काका, मग तुम्ही तर खूप गोळ्या- चॉकलेटं खाल्ले असतील ना?’’

‘‘हो तर बाळांनो आणि अजूनही ते दुकान आहे, मात्र आता तिकडे कॅडबरीपण आहे हं.’’ अक्षयच्या पप्पांनी मुलांना खूश केलं.

‘‘व्वा पप्पा, मग आपण कधी जाणार कळसला? सांगाना, मला खूप साऱ्या कॅडबऱ्या आणि तो गोटी आंबा खायचा आहे.’’ गौरी  पप्पांना विचारू लागली आणि मुलांनी तिच्या बोलण्याला दुजोरा दिला.

‘‘बरं, बरं, तुमची सर्वाची इच्छा आहे तर आपण उद्याच कळसला जाऊया, ओके?’’ पप्पांनी असा ग्रीन सिग्नल दिल्यावर  ‘‘ओके.. येस्स्स..’’ म्हणत चौघं बहिण-भाऊ असे एकसाथ आनंदाने ओरडले आणि कळस गावाला जाण्याचे, आंबे खाण्याचे प्लॅन करू लागले.

jyotikapile@gmail.com