तोत्तोचान
तोत्तोचान हे जगात बेस्टसेलर पुस्तक ठरले आहे. ही गोष्ट घडते जपानमध्ये! जगातील अनेक भाषांमध्ये या पुस्तकाचे अनुवाद झाले आहेत. अवघे ७ वष्रे रेल्वेच्या डब्यात चाललेली शाळा दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब पडून नष्ट झाली. पण रेल्वेच्या डब्यातली ती ७ वर्षांची शाळा आजही संपूर्ण जगातील पालक, शिक्षक व मुलांना प्रेरणा देते आहे.
कोबायशी या शिक्षकाला निवृत्तीनंतर मुलांशिवाय करमेना. त्याने शाळा सुरू करायचे ठरवले, पण पसा नव्हता. रेल्वेस्टेशनवरचे रिकामे डबे बघून डब्यात ‘तोमोई’ ही शाळा सुरू झाली. बॉम्बहल्ल्यात ही शाळा नष्ट झाल्यावर हा प्रयोग ७ वर्षांत थांबला. पुढे ही सारी मुलं मोठी झाली. जपानमधील सारे कलावंत, अधिकारी एकमेकाचे मित्र होते. याचे कारण ते सर्वजण त्या डब्यातील शाळेचे विद्यार्थी होते. ते सर्व विद्यार्थी एकत्र आले आणि आपल्या त्या शिक्षकाच्या आठवणी संकलित केल्या. तेच पुस्तक म्हणजे तोत्तोचान..
तोत्तोचानला तिच्या शाळेतून काढून टाकले. तक्रारी ‘गंभीर’ होत्या. शाळा सुरू असताना ती खिडकीत जाऊन चिमण्यांशी बोलते. बॅण्डवाल्यांना बॅण्ड वाजवायला सांगते. इथले गुरुजी तिला म्हणतात, ‘तू खूप चांगली मुलगी आहेस.’ शाळेला साचेबद्ध असे वेळापत्रक नव्हते. मुलांनी जेवणाच्या डब्यात समुद्रातलं काही आणि डोंगरावरचं काही आणणं बंधनकारक होतं. निसर्गातल्या सहली हा या शाळेच्या शिक्षणाचा भाग होता. अभिव्यक्ती उंचावण्यासाठी जेवताना मुलांपकी रोज काहींनी आपले मनोगत व्यक्त करायचे, अशी पद्धत होती. इतर शाळेत मुलांना कडक इस्त्रीचे कपडे घालून बोलावले जाते, पण या शाळेत खराब कपडे घालूनच मुलांना पाठवण्याची सूचना होती; जेणेकरून मुलांनी मनसोक्त खेळावं. शिक्षक इतके संवेदनशील होते की मुलांच्या श्वासाची लय त्यांना जाणवायची. संगीत ही तर या शाळेची भाषाच होती. शेतीचे ज्ञान व्हावे म्हणून शेतीचा तास असायचा. एका बालगुन्हेगार मुलीने लिहिले, ‘मला कोबायशीसारखी प्रेमळ आई आणि शिक्षक जर लाभले असते तर मी कधीच गुन्हेगार झाले नसते.’
समाज हा क्रूर आणि आत्मकेंद्रित आहे याचे कारण शिक्षणातून प्रेम समाजात झिरपले नाही, हे वास्तव हे पुस्तक पुढे आणते. कोबायशी देशातल्या प्रत्येक शाळेत आपल्याला भेटोत हीच सदिच्छा!
तोत्तोचान- तेत्सुको कुरोयानागी अनुवाद- चेतना सरदेसाई, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया प्रकाशन, पृष्ठे – १३० रुपये, किंमत-५५ रुपये

धर्मा
मुलांनो, तुमच्या शाळेत स्काऊट गाईडचा ग्रुप असेलच ना! या बालवीर पथकाच्या एका अनाथ मुलाची कहाणी ‘धर्मा’ या पुस्तकात आहे. बाबा भांड यांनी हे पुस्तक लिहिले आहे. मुलांना मुलांच्या साहसाच्या गोष्टी वाचायला आवडतात. पुस्तकातले सगळे वर्णन अगदी आपल्या गावासारखे वाटते. धर्मा हा आई-वडील वारल्यावर घरात एकटाच राहत असतो. पण त्याच्या कष्टाळू स्वभावामुळे तो सर्व गावाचा लाडका आहे. त्याला गावकरी मदत करतात. शैक्षणिक साहित्य दरवर्षी घेतात, पण धर्माचा स्वभाव फुकट घेण्याचा नाही. तो त्या कुटुंबासाठी कष्टाची कामे करतो. पुस्तकातले संपूर्ण कथानक फक्त एका दिवसात घडते.
घृष्णेश्वर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या यात्रेत धर्मा व त्याच्या मित्रांचे बालवीर पथक सेवेचे काम करते. पाणपोई लावते. स्वच्छता करते. धर्मा त्याला शैक्षणिक साहित्य देणाऱ्या व्यापाऱ्याचे नारळाचे पोते पाहोचवण्याचे काम करतो. तळ्यात बुडणाऱ्या एका लहान मुलाला धर्मा स्वत: उडी मारून बाहेर काढतो. रात्री नारळाच्या करवंटय़ांना आग लागल्यावर जवळच्या बलगाडीच्या झोळीत बांधलेले लहान मूल स्वत: जखमी होऊनही धर्मा वाचवतो. धर्माची ही प्रेरक कहाणी कोणत्याही शाळकरी मुलांना भारावून टाकते. एका अनाथ मुलाची ही कहाणी मुलांमध्ये सामाजिक भान रुजवते. पुस्तकाची भाषा खूप सोपी आहे. त्यांचे शिक्षक, गावकरी यांची व्यक्तिचित्रे खूप सुंदर आहेत. पुस्तकात खूप चित्र आहेत. त्यामुळे बालमित्रांना हा धर्मा आपलासा वाटतो.
धर्मा- बाबा भांड, साकेत प्रकाशन, पृष्ठे- ८०, किंमत- १०० रुपये