सुवर्णप्रस्थ नावाचा एक देश होता. राजाने आपल्या या देशाचे ‘सुवर्णप्रस्थ’ हे नाव का ठेवले त्याचीच ही गोष्ट!
सुवर्णप्रस्थ देशाचे पूर्वीचे नाव चंद्रप्रस्थ होते. चंद्रप्रस्थ देशाच्या राजाला पाच राण्या होत्या. पहिल्या चार राण्या या मोठमोठय़ा देशांच्या राजांच्या कन्या होत्या. शेवटची पाचवी राणी ही जंगलातील आदिवासींच्या राजाची कन्या. ती काळी होती तरी तरतरीत, नाकी-डोळी नीटस होती. ती हसली की देवघरातील घंटा किण्किण्ल्यासारखं वाटायचं.
एकदा राजाने पाचही राण्यांना दरबारात बोलावलं. राजाने त्यांच्यासाठी एक स्पर्धा जाहीर केली. ‘तुम्ही पाचही जणींनी आपापल्या महालांची सजावट करायची आहे. सजावटीसाठी तुम्हाला एक वर्षांचा अवधी देण्यात येईल. त्यानंतर निकाल जाहीर करून क्रमांक दिले जातील,’ राजानं त्यांना सांगितलं.
पाचही राण्या कामाला लागल्या. पहिल्या राणीने सोन्या-चांदीची सजावट केली. सर्व महाल सोन्या-चांदीच्या वस्तूंनी सजवला. छत, झुला सोन्या-चांदीच्या गोष्टींनी सजवला. दुसऱ्या राणीने सोन्याने महाल सजवला. तिसऱ्या राणीने हिरे-मोती-माणिकांनी लखलखाट केला. चौथ्या राणीने चंदन, शिसवी, सागवान, देवदार अशा झाडांच्या लाकडावर कोरीव काम करून सजावट केली. तिला स्वत:लाही कोरीव कामाची कला अवगत होती. तिने अनेक कारागीर मदतीला घेतले. स्वत: शिसवीच्या लाकडावर कोरीव काम करून देव्हारा बनवला. त्यावर सोन्या-चांदीचे मिनाकाम केले. त्यात चंदनाची श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली. सागवानाच्या लाकडाचा झुला बनवून त्याला सोन्या-चांदीच्या साखळय़ा लावल्या. त्यावर सोन्या-चांदीची वेलबुट्टी केली. खिडक्यांच्या कमानींनादेखील कोरीव काम केले. पाचव्या राणीने निरनिराळय़ा झाडांची, पाना-फुलांची सजावट केली.
बघता बघता एक वर्ष लोटलं. राजा सजावट बघण्यासाठी निघाला. पहिल्या राणीची सोन्या-चांदीची सजावट पाहिली. दुसऱ्या-तिसऱ्या राणीची सजावटही पाहिली. राजाच्या कानावर आले होतेच की, पहिल्या तीन राण्यांच्या सजावटीमुळे खजिन्यावर खूपच ताण आलेला आहे.
राजा चौथ्या राणीकडे गेला. त्याला देव्हारा फारच आवडला. राजाने श्रीकृष्णाच्या मूर्तीला नमस्कार केला.
राजा पाचव्या राणीकडे गेला. या राणीच्या महालापुढे मोठी बाग होती. बागेला चार प्रवेशद्वारे होती. प्रवेशद्वारांवर कमानी बसवलेल्या होत्या. त्यावर जाई-जुई, कुंदा, कृष्णकमळ असे वेल कमानींवर चढवलेले होते. बागेचे पाच भाग केलेले होते. एका भागात औषधी वनस्पती लावलेल्या होत्या. तिला जडीबुटीच्या औषधाची खूपच माहिती होती. रमावेल, औषधाची रोपे, कोरफड, शतावरी, अश्वगंधा अशा कितीतरी औषधी वनस्पतींची लागवड केली होती. दुसऱ्या भागात फळांची झाडे होती. तिसऱ्या भागात भाजीपाला, कंदमुळे लावलेली होती. चौथ्या भागात शोभेची फुले, शोभेची पाने, वासाच्या फुलांची मोठी झाडे लावलेली होती. पाचव्या भागात खतासाठी खड्डा केलेला होता. राजा बागेत हिंडून पाचव्या राणीकडून झाडा-झुडपांची माहिती घेत होता. आजपर्यंत राजाने निसर्ग, झाडे-झुडपे यात कधीच रस घेतलेला नव्हता. राजाला बागेतून हलावेसेच वाटत नव्हते. अजून महालाची आतील सजावट बघायची होती. राजा महालाकडे निघाला. महालात शिरण्यापूर्वी अंगणात तुळशी वृंदावन होते. त्यापुढे आदिवासी पद्धतीची रांगोळी काढलेली होती. महालात भिंतीवर निसर्गचित्रे लावलेली होती. ती राणीने स्वत: काढलेली होती. मोठमोठय़ा कुंडय़ा गेरूने रंगवल्या होत्या. त्यात सावलीत वाढणारी झाडे लावलेली होती. एकसारख्या उंचीच्या पामच्या झाडांच्या कुंडय़ा ठेवून पडदा केलेला होता. महालाच्या आतील हिरव्या सजावटीने खूपच प्रसन्न वाटत होते. राजाला ही स्वस्त आणि सजीव सजावट खूपच आवडली.
त्यानंतर निकालाची वेळ आली. राजाने पाचही राण्यांना बोलावून घेतले. पाचव्या राणीला पहिला क्रमांक, चौथ्या राणीला दुसरा क्रमांक, तिसऱ्या राणीला तिसरा क्रमांक, दुसऱ्या राणीला चौथा क्रमांक आणि पहिल्या राणीला पाचवा क्रमांक दिला. पाचव्या राणीला पाचशे एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. चौथ्या राणीला अडीचशे एकर जमीन बक्षीस दिली.
चौथ्या राणीने बक्षीस मिळालेल्या जमिनीवर साग, चंदन, शिसव, देवदार अशा झाडांची लागवड केली. तीन-चार वर्षांत झाडे वाढू लागली. तिला माहीत होते की देवदाराच्या झाडाचे लाकूड पाण्यात जास्त टिकते. तिने या झाडाच्या लाकडाच्या बोटी बनवून घेतल्या. अनेक कारागिरांना हाताशी घेऊन साग, चंदन, शिसवीच्या लाकडावर कोरीव काम केलेल्या अनेक वस्तू बनवून घेतल्या. लाकडी खेळणी बनवण्याचे कारखाने सुरू केले.
पाचव्या राणीने पाचशे एकर जमिनीवर गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, कडधान्य, गळिताची धान्ये, फळफळावळ, भाजीपाला, गाई-म्हशींसाठी चारा, कापूस, औषधी वनस्पती अशा अनेकांची शेती सुरू केली. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना संघटित केले. नवीन तंत्रज्ञान, नवीन यंत्रणा यांची माहिती करून घेतली. चौथ्या आणि पाचव्या राणींनी एकत्र येऊन राज्यांतील लोकांना रोजगार मिळवून दिला. राज्यात धनधान्याची लयलूट झाली. कोरीव काम केलेल्या वस्तू, धान्ये-फळे, फुले बाहेरच्या राज्यांना निर्यात करू लागल्या. चंद्रप्रस्थ देशात परकीय चलनाचा ओघ वाढू लागला. प्रजा सुखी झाली. राजाच्या खजिन्यात भर पडली. चंद्रपस्थ देश सर्वात श्रीमंत देश झाला. राजा खूपच खूश झाला. त्याने चौथ्या आणि पाचव्या राणीला पट्टराणी केले. दोघींमुळे चंद्रप्रस्थ देशात सोन्याचा धूर निघू लागला, म्हणून राजाने चंद्रप्रस्थ हे नाव बदलून देशाचे सुवर्णप्रस्थ असे नाव ठेवले.

girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य