विज्ञान आणि गणित हे श्रेयाचे आवडते विषय. त्यामुळे या विषयांशी संबंधित स्पर्धामध्ये ती हिरीरीने भाग घ्यायची. पालक आणि शिक्षकही तिला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करायला नेहमीच उत्सुक असायचे.
यावर्षीही आंतरशालेय विज्ञान स्पध्रेच्या अंतिम फेरीत ती पोहोचली होती. एक दिवस आधी तिला बोलण्यासाठी विषय दिला गेला – ‘कपडय़ावरील तेलकट डाग आणि साबण!’ श्रेयाच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले.
शाळेतून घरी आल्यावर शाळेचा ड्रेस आणि रुमाल वॉिशग मशीनमध्ये टाकताना तिला रुमालावर भाजीतील तेलाचा डाग पडलेला दिसला. डागाचा भाग ओला करून एकमेकांवर चोळून पाहिला, पण डाग काही निघेना. हा डाग कसा काढावा, या विचारात असताना तिला आवाज आला..
‘तुझा डबा खाऊन झाल्यापासून मी रुमालात अडकून पडलोय. मला तूच बाहेर काढ,’ रुमालावरील डागाने विनंती केली.
‘तेच तर करत होते. पण तू हट्टी आहेस. का नाही निघून गेलास मी पाण्याने धुतल्यावर?’ श्रेया तणतणली.
‘माझ्यात आणि पाण्यात छत्तीसचा आकडा आहे ना!’ डाग म्हणाला. हे ऐकल्यावर पाणी काय गप्प बसणार? तेही या संवादात सहभागी झाले.
‘तुला तर माहीतच आहे, तेल माझ्यात मिसळू शकत नाही,’ पाणी म्हणाले.
‘शाळेत हे प्रयोगाद्वारे आम्ही शिकलो आहोत,’ श्रेया म्हणाली.
‘आता तूच सांग श्रेया, हेच पाणी मीठ आणि साखरेला स्वत:मध्ये विरघळू देतं, पण मला मात्र सामावून घेत नाही,’ तेलाने राग व्यक्त केला.
तेलाचा राग दूर करण्यासाठी पाण्याने श्रेयाला एका ग्लासात पाणी आणि तेलाचे मिश्रण करून आणायला सांगितले. पाण्याने समजावून सांगायला सुरुवात केली, ‘माझ्या पृष्ठभागावर एक प्रकारचा ताण असतो. माझ्यातील सर्व रेणू एकमेकांना परस्पर आकर्षणाने सतत खेचत असतात. माझ्या पृष्ठभागावरील रेणूंना आतले रेणू ओढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे माझा पृष्ठभाग सतत ताणला जातो. असेच सर्व काही या तेलाच्या बाबतीतही घडते. त्यामुळे आम्ही दोघं एकमेकांत मिसळत नाही. अर्थात, आमच्यातील आकर्षणाचे बंध वेगळे असल्याने माझे रेणू विद्युतभारित असतात आणि या तेलाचे विद्युतभारित नसतात. आता आमच्या या मिश्रणात थोडा साबण टाकून ढवळ आणि बघ,’ पाण्याने श्रेयाला सुचवले. श्रेयाने तत्परतेने तसे केल्यावर तिला कळले की या दोहोंचे एकसंध मिश्रण तयार होऊन त्याला दुधकट रंग आला आहे.
‘पाण्यात विरघळलेल्या माझ्या रेणूंच्या दोन टोकांपकी एक विद्युतभारित असते व दुसरे नसते. विद्युतभारित टोक पाण्याकडे, तर दुसरे टोक तेलाकडे आकर्षति होते. त्यामुळे माझे रेणू एका बाजूला तेलाच्या व दुसऱ्या बाजूला पाण्याच्या रेणूला धरून वावरू लागतात आणि असे मिश्रण तयार होते,’ साबणाने आपले मनोगत व्यक्त केले.
पाणी आणि तेल एकमेकांत का मिसळत नाही, ते श्रेयाला समजले. रुमालावरचा डाग काढण्याची युक्ती समजली म्हणून तिला आनंद झाला. स्पध्रेतील विषय तिला आता आत्मविश्वासाने मांडता येणार होता. तिने या सर्वाचे आभार मानले आणि डागाला आनंदाने निरोप दिला. सर्वानी श्रेयाला स्पध्रेत पहिला नंबर मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.