निळी निळी परी

निळी निळी परी, खटय़ाळ भारी

मज्जा तिची, ऐका तर खरी

परीला आली फिरायची लहर

आभाळभर टाकली एकच नजर

कानांत घातले पाचूचे डूल

केसांत माळले जुईचे फूल

गळ्यातल्या हारात माणिक नि मोती

सोनसळी झगा चमके किती

लाल लाल पंखांवर नक्षी पिवळी

गुंफलेले त्यात हिरे नि पोवळी

झगमग झगमग झगा उडवत

ऐटीत निघाली उडत उडत

चांदोबामामा वाटेत दिसला

परीला खूप खूप आनंद झाला

‘येतोस का, जाऊ  ना फिरायला’

चांदोबामामा हसून म्हणाला,

‘नको ग परी, वेळ नाही मला!’

थोडय़ाशा चांदण्या देतो ना तुला

रुसली परी म्हणते कशी,

‘नक्कोच जा, मी निघते कशी’

रुसकी परी परत निघाली

आभाळी निळा रंग पसरून गेली!

– शकुंतला मुळ्ये