News Flash

कवि सृष्टीचा अलंकार

फा र वर्षांपूर्वी वैशाली नगरीमध्ये राजा शूरसेन राज्य करीत होता. नावाप्रमाणे राजा मोठा शूर व कर्तबगार होता. पण त्याच्यामध्ये एक दोष होता.

| July 19, 2015 01:03 am

फा र वर्षांपूर्वी वैशाली नगरीमध्ये राजा शूरसेन राज्य करीत होता. नावाप्रमाणे राजा मोठा शूर व कर्तबगार होता. पण त्याच्यामध्ये एक दोष होता. राजाला कवी वगैरे लेखक मंडळी अजिबात आवडत नसत. ‘‘कवी म्हणजे मुलखाचे आळसोबा अन् लाडोबा! खा खा खायचं, आरामात लोळायचं अन् काहीतरी अचाटअफाट कल्पना करत कविता खरडायच्या. बस्स, एवढंच त्यांचं काम!’’ राजा तिरस्काराने म्हणायचा.
एक दिवस राजाचं काहीतरी बिनसलं आणि त्याने आपल्या राज्यात एक मुलखावेगळा आदेश काढला. राजाज्ञेप्रमाणे त्याचे सेवक गावोगावी जाऊन दवंडी पिटू लागले. ‘‘ऐका हो ऐका, आजपासून या राज्यात कविता करणं व वाचणं मना आहे होऽऽ समस्त कवीवर्गाने याची नोंद घ्यावी होऽऽ ढुमढुम ढुमाक, ढुमढुम ढुमाक!’’
दवंडी ऐकताच राज्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली. बिचाऱ्या कवीमंडळींची तर पाचावर धारण बसली. काय करावं अन् कुठे जावं, काहीच समजेना. राज्याच्या सर्व पाठशाळांमध्ये कविता, काव्यगायन वगैरे बंद करण्यात आलं. कविता थांबल्या, गाणी रुसली. त्यामुळे सारं कसं रूक्ष, निरस वाटू लागलं. फुलाकळय़ांच्या, झिरीझिरी पावसाच्या, भणाणत्या वाऱ्याच्या कविता थिजून गेल्या. ‘नाच रे मोरा’च्या तालावर थिरकणारी पावलं थांबली अन् ‘गाऱ्यागाऱ्या भिंगोऱ्या’ म्हणत वाऱ्यासंगे पिंगा घालणारी मुलं खट्टू झाली. आकाशीच्या चंद्राकडे बघून झुरू लागली. राजा शूरसेन मात्र अडेलतट्टसारखा आपल्या हट्टावर कायम राहिला.
एक दिवस राजा आपल्या मित्राकडे-म्हणजे राजा चंद्रसेनाकडे अतिथी म्हणून गेला. फार दिवसांनी मित्र आला म्हणून चंद्रसेनाने मोठय़ा इतमामाने त्याचं स्वागत केलं. नृत्यगायनाच्या मैफिली आयोजित करण्यात आल्या. नृत्यगायन म्हणताच राजा शूरसेनाने कडू कारलं खाल्ल्यागत तोंड वेडवाकडं केलं, पण मित्राच्या आग्रहाखातर तो समारंभाला उपस्थित राहिला. समारंभ सुरू झाला. मृदंग बोलू लागले, वीणा झंकारू लागल्या अन् राजनर्तिका रूपमती दरबारात उपस्थित झाली. त्या दिवशी रूपमतीने आपलं नृत्यकौशल्य एवढं बहारदार पेश केलं, की राजा शूरसेन तिच्या पदलालित्यावर खूश झाला. नृत्यगायनाचा कार्यक्रम आटोपताच कवी सारंगधर पुढे झाले आणि राजाला त्रिवार अभिवादन करून त्यांनी आपली काव्यकला सादर केली. सारंगधराचे काव्य म्हणजे जणू तेजस्वी रत्नमालाच! आपल्या काव्यामध्ये त्याने उपमा व अलंकारांची अशी काही मुक्त उधळण केली होती की राजाच्या तोंडून नकळत शब्द उमटले- ‘‘वाहवा! वाहवा!’’ राजाची कळी खुलली अन् कवी सारंगधराला धीर आला. तो म्हणाला, ‘‘महाराज, माझी एक लहानशी विनंती आहे.’’
‘‘बोला, कविराज बोला, आज आम्ही बेहद्द खूश आहोत. काय हवं ते नि:संकोचपणे सांगा,’’ राजा म्हणाला.
‘‘महाराज, मी आपल्या वैशाली नगरीचा रहिवासी आहे. आपल्या आज्ञेमुळे मला गाव सोडून येथे परमुलखात राहावं लागतंय. महाराज, मला माझ्या गावाची, तिथल्या गावकऱ्यांची फार फार आठवण येते. मला गावी येण्याची परवानगी असावी.’’ सारंगधराचा गळा दाटून आला होता. डोळय़ांतून अश्रू वाहत होते. राजाला आपली चूक उमगली आणि त्याने कवी सारंगधराची विनंती मान्य केली.
राजाने आपली विचित्र आज्ञा मागे घेतली अन् सारं वातावरण बदलून गेलं. ताधिन, ताधिन करीत मृदंग बोलू लागले. घुंगरू छणछणू लागले. तुमच्यासारखी गोबऱ्या गालांची अन् काळय़ाभोर हसऱ्या डोळय़ांची मुलं ‘येरे येरे पावसा’ म्हणत नाचू, बागडू लागली आणि त्यांच्या आनंदाने बेभान झालेला वेडा पाऊस झरझर-सरसर बरसू लागला. निळे मोर चंदेरी पिसारे फुलवत थुईथुई नाचू लागले. सर्वत्र आनंदीआनंद झाला.
राज्याला जशी शूर व कर्तबगार राजाची व सैन्याची गरज असते तशीच प्रतिभावंतांचीही असते. कवी, लेखकमंडळी नसतील तर सप्तरंगी इंद्रधनूचं, फुलपाखरांमागे धावणाऱ्या मुलांचं अन् सुंदर निसर्गाचं वर्णन कोण बरं करेल?
रामदासस्वामी दासबोधात कवींविषयी मोठय़ा आदराने लिहितात-
कवि सृष्टीचा अलंकार, कवि लक्ष्मीचा शृंगार
सकळ सिद्धीचा निर्धार ते हे कवि॥

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 1:03 am

Web Title: marathi stories for childrens
Next Stories
1 रोमन अंकांची गंमत
2 डोकॅलिटी
3 शब्दार्थ : भगीरथ प्रयत्न
Just Now!
X