29 October 2020

News Flash

झाकली मूठ

राजेबाईंना हल्ली नववीच्या वर्गात जाताना काय करावं हे लक्षातच येत नसे.

(संग्रहित छायाचित्र)

मेघना जोशी

राजेबाईंना हल्ली नववीच्या वर्गात जाताना काय करावं हे लक्षातच येत नसे. कारण, त्या वर्गातलं त्यांचं शिकवणं म्हणजे फक्त एकमार्गी संभाषणच होत होतं.

ही मुलं आठवीत असताना किती छान वाटायचं त्यांना त्यांच्या वर्गात जाताना. सगळी मुलं किती मनमोकळ्या गप्पा मारायची त्यांच्याशी. कित्ती कित्ती बोलायची, कधी कधी तर ‘आत्ता गप्पं बसा, एक अक्षरही बोलायचं नाही,’ अशी सक्ती करायला लागायची त्यांना. पण गेल्या दोन-चार महिन्यांत सारंच चित्र पालटलं. काही बोलेनासाच झाला वर्ग. शिकवणं म्हणजे एक उपचार उरला फक्त. त्यामुळेच राजेबाईंना खूप उदास वाटायचं हल्ली. त्यांना या वर्षी पहिल्यांदाच नववीचा वर्ग मिळाला होता शिकवण्यासाठी. किती तयारी केली होती त्यांनी नववीला शिकवण्यासाठी? किती प्रयोग, प्रकल्प राबवायचे ठरवले होते, पण मुलांचा प्रतिसाद एवढा थंडा असताना कसं बरं करणार काही.. या चिंतेने त्यांना ग्रासलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या शाळेत आणि इतर शाळांतून शिकवणाऱ्या त्यांच्या मित्रमत्रिणींकडे चौकशी केली तेव्हा त्या सगळ्यांनी त्यांना वेडय़ातच काढलं. एवढा कशाला विचार करायचा त्याचा, असं सगळ्यांचंच म्हणणं पडलं. अहो, तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्हाला काळजी वाटतेय, पण आमचा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे, मुलं नववी-दहावीत गेली ना की असंच करतात. बोलतच नाहीत. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही द्यायला नको असतात त्यांना. हळूहळू होते आपल्यालाही सवय.

पण राजेबाईंना काही हे पटणारं नव्हतं. त्यांनी खूप विचार केला यावर आणि त्यांना अचानक एक गोष्ट सुचली. त्यांची आजी लहानपणी म्हणायची, ‘‘एका गावात एक खूप छोटं देऊळ असतं. त्या देवळात एक पुजारी असायचा. देवळात कधीतरीच कोणीतरी भाविक यायचा. पुजाऱ्याला देवळाचं काही उत्पन्न मिळत नव्हतं. तरी बिचारा देवाची सेवा आपल्याला जमेल तशी करायचा. दुपारी गावात भिक्षा मागायचा आणि स्वत:चं पोट भरायचा. असं खूप वर्ष चाललं होतं. एक दिवस मात्र वेगळाच उगवला. सक्काळी सक्काळी चक्क राजाचा शिपाई देवळाच्या दारात उभा होता. तो म्हणाला, ‘‘आजपासून बरोब्बर पंधराव्या दिवशी महाराज या देवळात दर्शनासाठी येणार आहेत.’’ पुजारी आनंदला. त्याला वाटलं, आपलं नशीब पालटलं. महाराज येणार म्हणजे नक्कीच देवळाला काही देणगी देणार. बरं, महाराजांना असं मोडकंतोडकं मंदिर कसं दाखवणार? म्हणून त्याने गावात लोकांकडे कर्ज स्वरुपात पैसे मागायला सुरुवात केली. म्हणाला, ‘‘महाराजांनी देणगी दिली की देतो तुमचे.’’ आणि लोकांनी त्याला पैसे  दिलेही. त्या पशांमधून त्याने पंधरा दिवसांत देवळाचा चेहरामोहराच बदलून टाकला. आणि शेवटी तो दिवस उगवला. महाराज देवळात दर्शनासाठी आले. त्यांनी दर्शन घेत देवासमोरच्या ताम्हनात काही देणगी ठेवली आणि दर्शन घेऊन झाल्या झाल्या आल्या पावली परतही गेले. ताम्हनात त्यांनी जे काय ठेवलं ते पुजारीबुवांनी तत्काळ ताब्यात घेतलं आणि मुठीत घट्ट पकडून ठेवलं. महाराजांनी प्रस्थान केल्याकेल्या जमलेल्या लोकांना म्हणाले, ‘‘महाराजांनी ताम्हणात जी देणगी ठेवलीय तिचा लिलाव करायचाय. महाराजांनी ठेवलेली देणगी आहे ही.. असामान्य!’’ उपस्थितांना पटलं आणि झटाझट लिलावासाठीची बोली लागू लागली. शेवटची बोली लागली ती चक्क सव्वा लाख रुपयांची. आणि जेव्हा त्या व्यक्तीने सव्वा लाख रुपये समोर ठेवले तेव्हा पुजारीबुवांनी मूठ उघडली. आणि सर्वाना समजलं की राजाने देवासमोर फक्त पंचवीस पैसे ठेवले होते. म्हणजे झाकल्या मुठीची किंमत होती फक्त पंचवीस पैसे.’’

ही गोष्ट आठवली आणि राजेबाईंना रात्री शांत झोप लागली. नववीच्या वर्गात ही गोष्ट सांगत त्या म्हणाल्या, पुजाऱ्याची मूठ सव्वा लाखाला विकली गेली, पण आपण जर आपली मूठ अशीच झाकून ठेवली तर प्रत्येकाला ते काही लाखाला विकायला जमणार नाही. त्यापेक्षा आपण आपल्या मुठीची किंमत वाढवावी हे बरं नाही का? मुलांना गोष्टीचा अर्थ ध्यानी आला आणि त्यांच्यामध्ये हळूहळू होणारा बदलही राजेबाईंच्या लक्षात येऊ लागला होता. वर्गाची कळी खुलायला लागली होती आणि झाकली मूठ अलगद उघडायला!

joshimeghana.23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 4:04 am

Web Title: meghna joshi balmaifal article abn 97
Next Stories
1 गजाली विज्ञानाच्या : वर झगझग आत भगभग
2 असाही ख्रिसमस
3 कार्टूनगाथा : कार्टून गाथा संपूर्णम्
Just Now!
X