27 January 2020

News Flash

गजाली विज्ञानाच्या : कुणी निंदा, कुणी वंदा माझा स्वहिताचा धंदा!

खूपदा झाडाझुडपांवर पाने नसलेली पिवळसर वेल वाढलेली दिसते, ही आहे अमरवेल.

|| डॉ. नंदा हरम

जीवसृष्टीत प्रत्येकाचं वेगळेपण कशात ना कशात आहे. परजीवी किंवा परपोषी वनस्पतींना नावं ठेवण्यात येतात, कारण या वनस्पती जगण्यासाठी लागणारी सर्व पोषक द्रव्यं आणि पाणी दुसऱ्या वनस्पतींकडून शोषून घेतात. पण या वनस्पतींचं म्हणणं असं की, जगायचं तर लाजून कसं चालेल? म्हणून त्यांच्या तोंडी, ‘कुणी निंदा, कुणी वंदा, माझा स्वहिताचा धंदा!’ ही म्हण चपखल बसते.

या परजीवी वनस्पतींची सुधारित शोधक मुळं पोशिंदा वनस्पतींच्या जल आणि पोषणवाहक प्रणालींशी जोडलेली असतात. या परजीवी वनस्पती, पोशिंदा वनस्पतीच्या खोडांनी किंवा मुळांनी हवेत किंवा जमिनीत सोडलेल्या रसायनांना बरोब्बर ओळखतात आणि त्यांचा ठावठिकाणा नेमका शोधून काढतात. अंदाजे फुलझाडांच्या २० कुलातील ४५०० परजीवी वनस्पतींच्या जाती ज्ञात आहेत.

खूपदा झाडाझुडपांवर पाने नसलेली पिवळसर वेल वाढलेली दिसते, ही आहे अमरवेल. तिचं शास्त्रीय नाव ‘कसकुटा रिल्फेक्सा’, तिला ‘डोडर’ ही म्हटले जाते. तिच्या १००-१७० प्रजाती असून ही वेल पिवळसर, केशरी किंवा लालही असते. अमरवेलीचे कमकुवत खोड सुतासारखे असून पोशिंदा वृक्षांवर आच्छादलेले असते. (चित्र पहा) तिचे बी जमिनीत रुजल्यावर त्यातून तंतूसारखे खोड येते. त्याला दुसऱ्या वनस्पतीचा आधार मिळाला नाही तर ते लगेच मरून जाते. पण आधार मिळताच खोडाला शोषक मुळे फुटतात. ही शोषक मुळे पोशिंदा झाडाच्या खोडात, फांद्यात घुसून अन्नरस शोषून घेतात. या वेलीला जमिनीत वाढणारी मुळे नसल्याने ‘निर्मुळी’ असे म्हणतात.

नावावरून ही वेल अमर आहे की काय, असं तुमच्या मनात आलं असेल ना? ही वेल एक आधार संपला की दुसरा आधार शोधते मग तिसरा.. अशा प्रकारे साखळी स्वरूपात ती वाढते. थोडक्यात काय, तर तिचा शेवट लांबवता येतो, म्हणून ती अमरवेल. चित्रात दाखविल्याप्रमाणे या वेलीची फुलं लहान, पांढरी आणि घंटाकृती असतात.

दुसरी अतिशय वैशिष्टय़पूर्ण परजीवी वनस्पती आहे, रॅफ्लेसिआ अरनॉल्डी! तिला कॉर्प्स फ्लॉवर (शवपुष्प) म्हणूनही ओळखले जाते. कारण या फुलाला सडलेल्या मांसासारखा वास येतो. ही वनस्पती इंडोनेशिया, सुमात्रा या ठिकाणी आढळते. या वनस्पतीला पानं, मूळ, खोड काहीही नसतं. या वनस्पतीच्या तंतूमय पेशी पूर्णपणे पोशिंदा वनस्पतीच्या आत आढळतात, जिथून अन्नरस आणि पाणी ही वनस्पती मिळवते. फक्त रॅफ्लेसिआची कळी दिसू लागते. ही कोबीसारखी असून, काळ्या जांभळ्या रंगाची असते. ही कळी ३० सेंमी रुंदीची असते. कळी विकसित व्हायला एक वर्ष लागतं, पण फूल मात्र काही दिवसच टिकतं. वनस्पती सृष्टीतील सर्वात मोठय़ा फुलाचा मान या पुष्पाला मिळतो. आत्तापर्यंत आढळलेलं सर्वात मोठं शवपुष्प ३.४४ फूट असून वजन ११ किलो आहे. चित्रात दाखविल्याप्रमाणे फुलांत तबकडीसारखा भाग असून त्यावर कुक्षी किंवा पुंकेसर असतात. फुलाच्या कुसक्या वासामुळे परागीकरण करणारे कीटक, माश्या त्याकडे आकर्षति होतात.

आपली म्हण या परजीवी वनस्पतींना कशी लागू पडते, याकरिता वानगीदाखल दोनच उदाहरणं पाहिली. पण ती पुरेशी बोलकी आहेत.. नाही?

nandaharam2012@gmail.com

 

First Published on September 22, 2019 12:37 am

Web Title: parasitic or nutritious plants abn 97
Next Stories
1 मित्र गणेशा!
2 कार्टूनगाथा : कवडीचुंबक म्हातारा!
3 ज्वलनशील पदार्थाची गंमत
Just Now!
X