26 March 2019

News Flash

रद्दीची गोष्ट

आईनं उडवाउडवीची उत्तरं दिली आणि स्वयंपाकाच्या कामाला लागली.

आईचं हे वागणं स्वराला अजिबात आवडलं नव्हतं. बाबा ऑफिसमधून आल्यावर ती बाबांना सांगणारच होती- आई कशी वागलीय ते. आईला विचारलं तर आईनं उडवाउडवीची उत्तरं दिली आणि स्वयंपाकाच्या कामाला लागली.

त्याचं काय झालं, आज स्वरा तिच्या आईसोबत भाजी आणायला गेली होती. तर तिची आई एका भाजीवाल्याकडे राहिलेले दीडशे रुपये मागत होती. तो भाजीवाला आईला म्हणाला, ‘‘ताई, गावाकडे घर बांधायला घेतलंय. आता पुढच्या महिन्यात देऊ का तुमचे पैसे?’’ त्याच्या या उत्तरावर आई चिडली आणि त्याला म्हणाली, ‘‘अहो, चार महिने झाले आता. मी पुन: पुन्हा पैसे मागायला येणार नाही. आता तुम्ही स्वत: घरी येऊन द्या पैसे. घर माहीतच आहे तुम्हाला.’’ आईने त्या भाजीवाल्याकडची एकही भाजी घेतली नाही. अगदी सगळ्या भाज्या त्याच्याकडे होत्या, तरीसुद्धा तिने दुसऱ्या भाजीवाल्याकडून तीनशे रुपयांची भाजी घेतली. ते पाहून स्वराच्या मनात आलं की ‘त्या’ भाजीवाल्याकडून भाजी घेतली असती तर त्या गरीब माणसाला मदत तरी झाली असती. त्या बिचाऱ्याने गावात घर बांधायला घेतलंय तरी आई त्याच्याकडे दीडशे रुपये मागतेय आणि वर त्याच्याकडून भाजीसुद्धा घेत नाही मदत म्हणून. स्वराला आईचा खूप राग आला. वाटलं, ‘गरीबांना मदत करायची असं मोठी माणसं शिकवतात आणि ही आई मात्र प्रत्यक्षात अशी वागतेय. पैशांचा हिशोब करायला स्वरा जरी लहान असली तरी दीडशे रुपयांकरिता त्या भाजीवाल्यावर वैतागण्याची खरं तर गरज नाही, हे नऊ वर्षांच्या स्वराला कळत होतं. आई त्या गरीब माणसाला दीडशे रुपये ‘आणून दे’ असं रागानं सांगतेय हे पाहून स्वराला आईचा रागच आला होता.

घरी आल्यावर स्वरा आईला म्हणाली, ‘‘तू त्या गरीब भाजीवाल्याकडे असं रागावून पैसे मागायला नको होते.’’ त्यावर आईचा काही बोलायचा मूडच नव्हता. ‘‘तू पाढे म्हणायला बस आधी, अजून सगळा स्वयंपाक करायचाय,’’ असं म्हणून ती कामाला लागली. स्वराने ठरवलं की, बाबा आले की त्यांना आईचं नाव सांगायचंच. इतक्यात बाबा आलेच. पण स्वराने काही बोलायच्या आधी आईनेच विषय काढला आणि म्हणाली, ‘‘कशी असतात पहा माणसं. आजही त्याच्याकडे पैसे मागितले तर आज काय म्हणे, गावाला घर बांधायला घेतलंय.’’

त्यावर बाबा म्हणालेच, ‘‘जाऊ दे गं, सोडून दे. आता पुन्हा नको जाऊस पैसे मागायला.’’ बाबांचं हे बोलणं ऐकून स्वराला खूप आनंद झाला. ‘म्हणजे बाबांना त्या गरीब भाजीवाल्याची बाजू पटतेय तर.’ स्वरा पटकन् बाबांच्या मांडीवर जाऊन बसली. आईची चिडचिड चालूच होती- ‘‘आता नाहीच जाणार पैसे मागायला. आणि त्याच्याकडून कधीच भाजी घेणार नाही.’’

‘‘बाबा, गरीबांना मदत करायची असते ना, मग आई अशी का वागतेय?’’ स्वरा रुसून म्हणाली. स्वराचं हे चिडणं आणि रुसवा बघून वैतागलेल्या आईचा मूड क्षणार्धात बदलला आणि स्वराजवळ बसत आई म्हणाली, ‘‘तुला ऐकायचंय या भाजीवाल्याकडून मी दीडशे रुपये का मागतेय ते?’’ आईनं सांगायला सुरुवात केली, ‘‘त्या भाजीवाल्याला मी गेले कित्येक महिने ओळखते. खूप वेळा भाजी घ्यायचे त्याच्याकडून. एक दिवस तो आणि त्याची बायको सोसायटीत आले आणि सगळ्यांच्या दारावरची बेल वाजवून सांगू लागले की, आम्ही आता रद्दीही घेतो. दर महिन्याला तुमच्या घरी येऊन रद्दी घेऊ. आपल्याकडे बरीच रद्दी साठलेली. इतकी रद्दी घेऊन जाण्यापेक्षा दाराशीच रद्दी घ्यायला हा आलेला बघून आम्हाला बरंच वाटलं. साधारण इतक्या साऱ्या रद्दीचे पाचशे-सहाशे रुपये तरी नक्कीच होणार याचा अंदाज होता आम्हाला पण त्यानं तर सांगितलं की, तुमची रद्दी फक्त तीनशे रुपयांची आहे. मनात म्हटलं, ‘जाऊ दे गरीब माणूस आहे.’ त्यानंतर तो म्हणाला, ‘ताई, आत्ता पैसे नाहीत माझ्याकडे. तुम्हाला माहितीय ना, मी कुठे बसतो भाजी घ्यायला, तिथे दोन दिवसांनी या, मग देतो पैसे.’ तेव्हाही मला काही वाटलं नाही. चांगली चार दिवसांनी गेले तर शंभर रुपये दिले आणि पन्नास रुपयांची भाजीच घ्या म्हणाला. उरलेले दीडशे नंतर देतो म्हणाला. आता चार महिने झाले या गोष्टीला. स्वरू, तू म्हणशील की गरीब आहेत ते, पण हे म्हणजे फसवून पैसे घेणं झालं ना! त्यांनी गरज म्हणून हजार रुपये मागितले असते तरी दिले असते. अगदी गरज म्हणून तुमची रद्दी द्या म्हणाले असते तरी देऊन टाकली असती. पण खोटं सांगून लोकांच्या घरची रद्दी गोळा करून पैसे मिळवणं योग्य आहे का? नंतर कधीच ते रद्दी घ्यायला आले नाहीत. म्हणजे तेव्हा पैसे हवे होते म्हणून दर महिन्याला येऊ वगैरे सांगून रद्दी घेऊन गेले. ही फसवणूक नाही का? प्रश्न रद्दीचा किंवा पैशाचा नाहीये. त्यांनी फसवणूक केली म्हणून मला त्यांचा राग येतो. चार वेळा पैसे मागायला गेले तेव्हा जरी मान्य केलं असतं की, ‘माफ करा, गरज होती पैशाची..’ तरी काही वाटलं नसतं. फसवून पैसे घेतले म्हणून  मी ते मागायला जात होते, समजलं? गरजू माणसांची फसवणूक करून गरज पूर्ण करणं चूक आहे ना?’’ आईचं बोलणं पूर्ण झालं आणि स्वराला समजलं की पूर्ण माहिती नसताना आईवर रागावणं किती चुकीचं होतं तिचं. दर वेळेस आई- बाबांच्या वागण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं. आत्तासुद्धा त्या रद्दीची किंमत त्यांच्यासाठी महत्त्वाची नव्हती, तर फसवणूक करणाऱ्या भाजीवाल्याची चूक महत्त्वाची होती. हे सगळं स्वराला मनोमन पटलं आणि तिने आईला घट्ट मिठी मारली.

– राजश्री राजवाडे-काळे

shriyakale@rediffmail.com

First Published on March 11, 2018 1:03 am

Web Title: rajashri rajwade kale story for kids