श्रीनिवास बाळकृष्णन

कुत्री, मांजरी, उंदीर, बदक, वाघ, अस्वल यांपासून सुरू झालेली कार्टूनगाथा आता माणसांच्या कार्टून विश्वात विस्तारली. त्यातील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे स्कुबी डू! स्कुबी डू हा कुत्रा खरं तर मेन हिरोच आहे, परंतु यात त्याचे चार मित्र म्हणजे खरोखरची माणसं आहेत. फ्रेड, श्ॉगी, डेफने, वेलमा हे समवयीन, किशोरवयीन (यंग अ‍ॅडल्टस्) मित्र; आणि त्यांचा मानवी भाषेत बोलणारा ग्रेट डेन जातीचा भला मोठा कुत्रा.. असा हा संच! म्हणजे प्रचंड गाजलेली व गाजत असणारी ‘स्कुबी डू’ मालिका. स्कुबी हा (ग्रेट डेन) कुत्रा प्रत्यक्षात गाढवा एवढय़ा उंचीचा वाढतो. भरदार उंची, थंड नजर, प्रचंड शक्ती आणि धडकी भरवणारं भुंकणे.. अगदी तसेच कार्टूनमध्येही त्याचे शरीराचे आकारमान आहे. पण बाकीचे गुण मात्र नावालाही शिवलेले नाहीत हो. अत्यंत घाबरट असा कुत्रा आपण याआधी कधीच पाहिला नसावा. अंधाराला, भुताच्या मुखवटय़ांना, गूढ वाडय़ाला काय घाबरतो का कधी आपण? पण हा मात्र जाम घाबरतो; तरी शूरतेचा आव आणतो.

समाजातील दुष्ट, क्रूर, फसवणूक करून लुबाडणाऱ्या खलनायकांना पकडून देणे, भूत- राक्षसाच्या वेशभूषा केलेल्या गुंडांचा चलाखीने आणि एकत्रित प्रयत्नाने खोटेपणाचा बुरखा शब्दश: फाडणे हे त्यांचे मुख्य काम!

या पाच जणांची खास फुलांच्या आकारातील रंगीत व्हॅन यांचे अनेक प्लॅन ठरविण्याची जागाच. आपली महत्त्वाची कामगिरी यशस्वी पूर्ण केल्यावर इथले पोलीस हिंदी सिनेमातील पोलिसांसारखे सर्व घडून गेल्यावर अगदी शेवटाला येतात. तरीही कायद्याचे महत्त्व बिंबवण्यासाठी पोलीस असतात.

मोठी संकटे, कठीण तिढा असणारे प्रसंग आपण अनेक कार्टून किंवा टीव्ही मालिकांतून पाहतो, पण या कार्टून मालिकेत एक मुख्य विचार दिलाय तो म्हणजे, सर्वाचा एकत्रित लढा. तेही प्रत्येकाच्या दुर्गुणांना टाळून त्यांच्यातील गुणांचा वापर करत पुढे जाणे. चार जणांपैकी फ्रेड हा नेतृत्वगुण असलेला व शोधक प्रवृत्ती असणारा आहे. त्याला लॉजिकल उत्तरं हवी असतात. ती मिळेपर्यंत तो स्वस्थ बसतच नाही आणि कशावर विश्वासही ठेवत नाही. वेलमा बुद्धिमान आहे. घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण करण्याचे कसब तिच्याजवळ आहे. डेफने धाडसी आहे. श्ॉगी आणि स्कुबी लिमिटेड शूरता दाखवतात. पण खूप खादाडही. आज शाळेत वर्गावर्गात असे परिपूर्ण विचार केलेले दिसत नाहीत. हुशार, कमी हुशार, खेळाडू, कलाकार, संगीतकार, नाटककार असे मिळून एक वर्ग तयार होत नाही. तर केवळ हुशारांचाच वेगळा वर्ग केला जातो. बाकीचे कसेही कुठल्याही वर्गात टाकतात. असो.

१९६८मध्ये अ‍ॅक्शन फॉर चिल्ड्रेन टेलिव्हिजन (अउळ) वर दाखवण्यात येणारी कार्टून्स हिंसेने भरलेली होती. पालक गटांनी त्यावर कडक निषेध नोंदवला. या दबाव गटामुळे १९६९ वर्षी हँना-बाब्रेरा प्रॉडक्शनतर्फे ‘स्कुबी डू- व्हेअर आर यू’ हा मालिकापट तयार करण्यात आला. ज्यावर पालक गटातील प्रतिनिधी सेन्सॉरबोर्डसारखे असत.

जोई रुबी आणि केन स्पिअर्स या लेखकांनी ही साहसी व विनोदी मालिका लिहिली. प्रसिद्ध अशा आर्किजच्या कार्टून मालिकांचा लोकांवर प्रभाव होताच. एनिड ब्लायटनच्या प्रसिद्ध पुस्तकांशी अनेक बाबतीत साधर्म्य साधून आहे. यातलं गाजलेलं शीर्षकगीत डेव्हिड मोक आणि बेन रेले यांनी लिहिले आहे. कार्टून कॅरेक्टर कसे असावेत हे ठरवलं इवाओ टाकमोटो ने!

स्कुबीच्या शरीर रचनेत विशेष बदल केल्याने तो ‘ग्रेट डेन’ असूनही आपल्याला मजेदार वाटण्याचे मुख्य प्रयत्न याचेच. १९६९ ते १९९६ पर्यंत डॉन मेस्कीक हा व्हॉइस आर्टस्टि स्कुबी डूला आवाज द्यायचा.

अमेरिकेत शनिवारी सकाळी टीव्हीवर हे कार्टून यायचे. अशा प्रकारचे शोची संकल्पना घेऊन सत्तरच्या दशकात गुप्तहेर आणि तत्सम विषयांच्या अनेक मालिका आल्या. पुढे वॉर्नर ब्रदर्स कंपनीदेखील सहकार्याने काही सिनेमे केले. कार्टून चॅनेलवर ही सिरीज पुन्हा प्रदर्शित केली. स्कुबी कार्टूनवर आधारित अनेक गेम, व्हिडीओ गेम, वस्तू, कपडे तयार करण्यात आले. २०२० साली चित्रपटही येत आहे. आपल्याकडे भारतात स्कुबीची ओळख झाली ते कार्टून नेटवर्कमुळे. बरं हे कार्टून नेटवर्क काय माहित्येय का? ज्या भारतात कार्टून केवळ आठवडय़ातून १-२ तास चालायचे तिथं दिवसभर चालणारे हे चॅनेल म्हणजे मुलांच्या आयुष्यात कार्टूनक्रांतीच होती आणि पालकांसाठी डोकेदुखी! (त्यात आज अनेक चॅनेलची भर पडतच आहे.) पण कार्टून नेटवर्क हे पहिलं कार्टून चॅनेल ठरलं.

chitrapatang@gmail.com