छोटय़ा दोस्तांनो, परीक्षा संपली. मग अता फुल टू धमाल! ऊन, वारा कशाचीच पर्वा नाही. पण ऊन्हात खेळता खेळता सावलीसाठी आजूबाजूला एखादं झाडं शोधताना, त्याचा आसरा घेताना क्षणभर त्याच्याकडेही कुतूहलानं बघितलंत तर तुम्हाला ऋतुबदल टिपता येतील. काय म्हणालात, झाडं तर तुम्ही नेहमीच बघता! ‘पण या झाडाचं नाव काय? त्याची पानं कोणत्या प्रकारची, आकाराची आहेत? फुलं केव्हा येतात? कोणत्या रंगाची? फळं लागतात का?’ असं डोळसपणे बघता का? नसलात तर लगेच बघायला सुरुवात करा. त्यासाठी काही वेगळे कष्ट किंवा वेळ द्यायला नको बरं का. तेव्हा, शुभस्य शीघ्रम्.

तुमच्या घराभोवतालच्या जा-ये करण्याच्या रोजच्या वाटेवरच्या झाडांकडे निरखून पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल की झाडांच्या पानांना गळतीच लागली आहे. ही सगळी शिशिर ऋतूची करामत बरं का! इतकंच नाही तर सगळी पानं धुळीने माखलेली, निस्तेज आहेत. थंडीमध्ये आपण जास्तीचे गरम कपडे घालतो तर ही झाडे आपली पाने खाली उतरवून टाकतात, आपल्या नेमकं उलट. मग या झाडांना पुन्हा पानं केव्हा येणार हा प्रश्न पडला असेल ना! ओहोटीनंतर भरती येते किंवा रात्रीनंतर दिवस उजाडतो, त्याचप्रमाणे सातत्याने फिरत असणाऱ्या ऋतुचक्रात आता शिशिर ऋतू संपून पहिल्या नंबरवर असलेला ऋतुराज वसंत येणार आहे. झाडांच्या फांदीला फुटलेल्या कोवळ्या नवीन पालवीतून तो तुम्हा-आम्हाला दर्शन देणार आहे. आणखी कोणत्या रूपात त्याचं अस्तित्व जाणवतं ते आता बघू या.

सणावारी घराला तोरण लावतो ते सदाहरित आंब्याचं झाड माहिती आहे ना! बघा कसं मोहोराने अंगोपांग फुलून आलंय ते. त्याच्या अनामिक गंधाने वातावरण भरून गेलंय. जरा नीट निरखून पाहिलंत तर छोटय़ा-छोटय़ा हिरव्या कैऱ्या लांब देठांना गच्च पकडून लोंबकळताना दिसतील. ही वसंत ऋतूची नांदीच बरं का. कैऱ्यांना मीठ-तिखट लावून खायच्या कल्पनेनंच तोंडाला पाणी सुटलं असेल ना! याच कैऱ्यांचं थंडगार पन्ह म्हणजे ‘वसंत’ पेय पिताना वसंत ऋतूची आठवण मनात पक्की होत राहील. या कैऱ्या पिकून सोनपिवळ्या झाल्या की मग अवीट गोडीच्या आमरसाच्या मेजवानीची पर्वणीच. घरी कोणीही पाहुणे आले की अ ला काना आ, ब ला काना बा, आंबा असं मुद्दाम सगळ्यांसमोर घोटून आईला आंबा कापायला लावताच की नाही! मग एखादी उरलेली फोड आणि बाठ चोखायला तुमच्या वाटणीला येतेच. नखशिखांत आंबा रंगात रंगायचं ही वसंताची खरी शोभा. याशिवाय वसंताचं अस्तित्व जाणवतं ते झाडाला लटकलेल्या जांभळांच्या लोंगरातून. बाहेरच्या काळपट जांभळ्या आवरणाखाली थोडा फिकट रंगाचा विशिष्ट गोड, तुरट चवीचा गर असलेली जांभळे जीभ रंगवत अलगद पोटात शिरतातच ना! पिंपळाची किरमिजी रंगाची पालवी वाऱ्याने सतत हलत राहते आणि सुंदर दिसते. त्याचं हिरवं पान आठवणीने वहीत ठेवा, बघा कसं जाळीदार होईल ते.

शिवाय सुरुवातीला मोगऱ्याच्या कळ्यांसारख्या सफेद कळ्यांनी भरलेलं झाड आणि हळूच त्यातून फुटलेले त्रिशंकूसारखे फिकट पिस्त्या रंगाचे ‘जाम’ म्हणजे वसंताची खूणच. हातगाडीवर पत्त्याच्या एकमजली बंगल्याप्रमाणे मिरवणारे जाम बघितले की तहान लागतेच की नाही? बाजारात आलेली कोकमाची फळं आणि कुणाच्या घरी गेलं की पटकन् आमसुली रंगाचा सरबताचा ग्लास समोर आला की वसंत आलाच समजायचं. शेवग्याच्या शेंगाची आमटी भुरकता नं, मग त्या झाडावर शुभ्र सुवासिक फुलांच्या माळा दिसल्या की वसंताचं अस्तित्व गृहीतच धरायचं. गुढीपाडव्याला कडुलिंबाच्या करवतीसारख्या पानांची कडू गोळी गिळताना, त्याची नाजूक, सफेद, विशिष्ट गंधाची फुलं शोधक नजरेने बघताना ‘वसंत वसंत’ असा जप चालूच ठेवायचा.

रंगगंधाचे सेलिब्रेशन करणारा हा वसंत येताच पेल्टाफोरमच्या पिवळ्या रंगाच्या क्रेपच्या फुलांचा गालिचाच जागोजागी पसरतो. बहावा अतिशय सुंदर पिवळ्या रंगाच्या नाजूक फुलांनी नखशिखांत सजतो. चाफा तर पिवळट पांढऱ्या किंवा गुलबक्षी रंगाच्या सुबक फुलांनी इतका डवरतो की एकाही पानाला जागाच राहात नाही. काटेसावर, पळस, पांगारा, गुलमोहर ही लाल फुलांची झाडे म्हणजे वसंताचे प्रमुख साक्षीदार, काटेसावरीची पाच पाकळ्यांची, गडद गुलाबी रंगाची वेलवेटसारख्या स्पर्शाची, तळहाताएवढी फुलं आणि त्यांनी बहरलेलं निष्पर्ण झाड म्हणजे सौंदर्याचा मेरूमणीच. फुलांच्या जागी कापसाने भरलेल्या, केळ्यांसारख्या दिसणाऱ्या जोडीजोडीने लगडणाऱ्या शेंगा त्यातून बाहेर उडणारा कापूस, सगळंच मन लुभावणारं. सहज पाहायला मिळणारं, परंतु पळसाची पोपटाच्या चोचीसारखी बाकदार केशरी फुलं जणू लसलसत्या ज्वाळाच किंवा पांगाऱ्याची, केळीचा घड उलटा धरावा अशी लाल फुले बघायला किंवा शोधायला जरा वाट वाकडी करूनच जायला हवं. वसंताच्या स्वागतात शेवटी राहिल्यामुळे जणू रागावून लालभडक झालेली गुलमोहराची फुले, त्यांचा हटके आकार आणि रूप बघा कागदावर उतरवता येतं का?

याशिवाय जाई, जुई, मोगरा, मदनबाण ही सुवासिक फुले आणि अशी कितीतरी वसंताच्या स्वागतासाठी मातीच्या पोटातून हळूच वर डोकावत असतात. एक एक करत तोंडओळख करून घेण्यासाठी हात पुढे करणार ना! कोकीळ पक्षी पंचम स्वर छेडून वातावरण सुरेल करत असतो. कानांना हा श्रवणसुखाचा अवीट आनंद देण्यासाठी पहाटे उठण्याचे कष्ट घेणार ना!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तामण या महाराष्ट्राच्या राज्यफुलाचं आगमन म्हणजे पावसाची बातमी. बघू या तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचतेय का?