20 October 2019

News Flash

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ!

माझ्या बालमित्र-मत्रिणींनो, मी आज माझ्या नवीन मित्राची तुमच्याशी ओळख करून देणार आहे.

|| डॉ. नंदा हरम

माझ्या बालमित्र-मत्रिणींनो, मी आज माझ्या नवीन मित्राची तुमच्याशी ओळख करून देणार आहे. त्याचं नाव आहे ‘पॉम-पॉम क्रॅब’! नाव मजेशीर आहे ना? त्याचं चित्र पाहिल्यावर तुम्हाला कसली बरं आठवण होतेय? बरोब्बर ओळखलंत. क्रिकेटच्या मदानात ‘चीअर अप’ करणाऱ्या मुलींची! त्या मुलींच्या हातात असणाऱ्या तंतुमय गुच्छांना ‘पॉम-पॉम’ म्हणतात. हे विविध आकारांचे व रंगांचे असतात. ते लोकर, सुती कापड, कागद, प्लॅस्टिक तर काही वेळा पिसांपासून ही बनवलेले असतात. पण आपल्या मित्राच्या हातात असलेले पॉम-पॉम म्हणजे जिवंत ‘सी अ‍ॅनामोनी’’(बहुतेकदा ट्रायअ‍ॅक्टिस प्रॉडक्ट या जातीचे) हे समुद्रातील सजीव असतात. आता हे कशाला पंजात पकडायचे? असं तुमच्या मनात आले असेल ना! आपल्या पॉम-पॉम क्रॅबचं कवच फारसं कठीण नसतं, तर ते नाजूक आणि लवचीक असतं. आकारालाही अगदी लहान म्हणजे अर्धा इंच रुंदीएवढंच. म्हणूनच माझा हा हुशार मित्र रक्षणाकरिता हे सी अ‍ॅनामोनी पंजात पकडतो. शत्रूने हल्ला केला की हे सी अ‍ॅनामोनी त्यांच्यावर उगारतो किंवा गरागरा फिरवतो- एखाद्या बॉक्सरसारखे. त्यामुळे याला बॉक्सर क्रॅब ही म्हणतात. सी अ‍ॅनामोनीच्या स्पíशकेमध्ये दंशकोशिका असतात. रक्षणाबरोबरच अन्न गोळा करण्याकरिता त्यांचा उपयोग होतो. आपल्या मित्राकडे जास्त शक्ती नाही, पण किती छान युक्ती शोधली ना त्याने!

अभ्यासावरून असं लक्षात आलं की, क्रॅबजवळ जर एकच सी अ‍ॅनामोनी असेल तर तो त्याचे फाडून दोन तुकडे करतो. त्या तुकडय़ांपासून अख्खा सी अ‍ॅनामोनी तयार होतो आणि हेच कारण आहे की क्रॅबच्या पिल्लाच्या हातातही सी अ‍ॅनामोनी दिसतात. सारं खरं, पण सी अ‍ॅनामोनीला काही फायदा होतो की नाही? होतो तर.. याच्या पंज्यात असल्यामुळे त्यांना जास्त अन्न व ऑक्सिजन मिळतो. तसेच पाण्यात काही घडामोडी घडल्या तरी बुडण्याची भीती त्यांना राहात नाही; म्हणजेच दोघांनाही फायदा! कोणती म्हण आठवतेय आता?

nandaharam2012@gmail.com

First Published on June 30, 2019 12:03 am

Web Title: story for kids 33