कुशलच्या शाळेत चित्रकलेची स्पर्धा होती. कुशलच्या हातात जादू होती ती रंगरेषांची. खरे म्हणजे तो नववीत होता. पण या वयातसुद्धा तो अशी चित्रे काढायचा की चित्रकलेत त्याचा पहिला नंबर ठरलेला. कुशल विशेषत: पोर्ट्रेट काढण्यात फार वाक्बगार होता. त्याचे आजोबा उत्तम चित्रकार होते. लहानपणापासून तो आजोबांच्या शेजारी बसायचा आणि चित्रे काढायचा. अलीकडे तर तो पोटर्र्ेट काढण्यात चांगलाच माहीर झाला होता.
एक दिवस गंमत झाली. त्याने आपल्या वळसणकरसरांचे चित्र काढले आणि घरी आजोबांना दाखवले. ते चित्र पाहून आजोबा कुशलला म्हणाले,‘तू आता माझे चित्र काढ पाहू.’
‘काढीन की. मला तर तुमचे चित्र छान काढता येईल. तुमचा स्वभाव, बोलणे सारे मला माहीत आहे.’
‘त्याचा चित्र काढण्याशी काय संबंध?’, आजोबा जरा गंमतीनेच म्हणाले.
‘वा आजोबा. तुम्हीच तर म्हणता, चांगल्या पोर्ट्रेटमध्ये व्यक्तीचे भाव कळतात. भाव म्हणजे स्वभावच की!’
‘तेही खरेच म्हणा! म्हणजे पोटर्र्ेटमध्ये स्वभावाचे-मनाचे रंग त्याच्या चेहऱ्यावर उमटतात. ठीक आहे. उद्या रविवार आहे. तू माझे चित्र काढायचे. मी बसेन तुझ्यापुढे.’
‘तुम्ही बसायला कशाला हवे? मी काढतो बरोबर.’
आणि कुशलने खरेच आजोबांचे चित्र काढले. आजोबा खूश होत म्हणाले, ‘कुशल, चित्र छान आहे, पण त्यात काही बारकावे मी तुला शिकवतो. पोर्ट्रेट चित्र व्यक्तीला पुढे बसवून काढायचे. त्यात गंमत आहे. व्यक्तीची बसण्याची ढब, हातांची नेमकी रचना (पोझिशन), छाया- प्रकाश हे सारे फार महत्त्वाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे चेहऱ्यावरील भाव. आणि मर्म म्हणजे डोळे. डोळ्यांतूनच मनातील भाव पाझरतात ना?’
आजोबांचे बोलणे कुशल अत्यंत मन लावून ऐकत होता. आजोबा मनात म्हणाले,‘हा बहाद्दर मला मागे टाकणार. या अवखळ वयात ही एकतानता.’
झाले! पुढील सहा महिने कुशल सतत आजोबांजवळ बसू लागला. कुरकुर न करता चार-चार तास. मुळातच ईश्वराने त्याच्या हाताला या कलेचा स्पर्श केला होता. कुशलची प्रगती जोरात सुरू होती. शाळेतले चित्रकलेचे शिक्षकसुद्धा म्हणत- ‘हे पाणी काही वेगळेच आहे.’
एक दिवस वळसणकरसर हातात फुले आणि पेढे घेऊन कुशलच्या दारात हजर. बरोबर शाळेचे मुख्याध्यापक आणि दातारसर, पवारसर. कुशल चटकन पुढे झाला. त्याने सर्वाना दिवाणखान्यात बसवले. सर्वाना वाकून नमस्कार केला. वळसणकरसर म्हणाले, ‘कुशल, तू शाळेचे नाव मोठे केलेस. तू महाराष्ट्रात पहिला आलास. आणि पोर्ट्रेट विभागाचे खास बक्षीस तुला जाहीर झाले आहे.’
आई-बाबा कामावरून आले नव्हते. घरात फक्त आजोबाच. ते माडीवरच्या आपल्या खोलीत होते. कुशल जिन्याशी गेला.
‘आजोबाऽ खाली या लवकर. कोण आलेय पाहा.’
कुशलचा आवाज आनंदाने फुलला होता. आजोबा खाली आले. त्यांनी सर्वाचे स्वागत केले. कुशलने मिळवलेलं यश पाहून ते फार खूश झाले होते. इतक्यात देवळात गेलेली आजी आली. तिला वार्ता कळली. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. साऱ्यांच्या गप्पा सुरू झाल्या. आजीने सर्वासाठी गोडाचा शिरा आणि चहा दिला. इतक्यात आई-बाबा आले. त्यांनाही बातमी कळली. त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
कुशलने शाळेच्या चित्रकला स्पध्रेत भाग घेतला होता. पण आदल्या दिवशी सायकलने घरी येताना स्वारी धडपडली आणि कुशलच्या पायाला प्लॅस्टर घालावे लागले. आता आली का पंचाईत! कुशल सारखा घरी. आजोबा सोबतीला होते. आजी होती, भागू होता. पण सारखे बसून वेळ कसा घालवणार? मग थोडा अभ्यास, छान छान गोष्टी वाचणे सुरू होते. त्याचे टेबल रस्त्याच्या समोर होते. त्यांच्या समोरचा बंगला रघुपतीकाकांचा. ते सतत फिरतीवर असत.
एक दिवस दुपारच्या वेळी यादवकाकांच्या घरात कंपाऊंडमध्ये तीन माणसे दिसली. ही कोण माणसे? कुशलला शंका आली. एक व्यक्ती पाठमोरी होती. पण त्याच्या टी-शर्टवर लांब मगरीचे अक्राळविक्राळ चित्र होते. त्याच्या समोर दोन व्यक्ती होत्या.
कुशलने ड्रॉइंगपेपर पुढे ओढला आणि भराभर चित्रं काढू लागला. त्यातील एक व्यक्ती बंगल्याच्या मागे गेली. परंतु पाठमोरी व्यक्ती आणि समोरच्या माणसाचे कुशलने चित्र काढले. त्या व्यक्ती चांगले तीन-चार तास कंपाऊंडमध्ये होत्या. नंतर त्या मागे गडप झाल्या, त्या काही पुन्हा दिसल्या नाहीत.
दुसऱ्या दिवशी समोरच्या यादवकाकांच्या बंगल्यात पोलीस. ते सकाळी गावावरून आल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांच्या तपासाची यंत्रणा फिरू लागली. रात्री कुशलने आजोबांना सर्व हकीगत सांगितली. काढलेले चित्र दाखवले. आजोबा थक्क झाले.
‘अरे वेडय़ा, सकाळीच नाही का मला चित्र दाखवायचे?’ आजोबा म्हणाले.
आजोबांनी पोलीस स्टेशनला फोन लावला. ‘इन्स्पेक्टरसाहेब, आमच्यासमोरील यादवकाकांच्या घरी काल चोरी झाली ना..’
‘त्याचा तपास चालू आहे. एक दिवसात तपास लागणार का?’ इन्स्पेक्टर म्हणाले.
‘अहो, त्यासंदर्भातच मी सांगतोय. माझा नातू छान चित्र काढतो. त्याने जे चित्र काढलंय त्यातून काही धागेदोरे हाती येतील असे मला वाटते.’
‘मग नातवाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये या. नाव काय त्याचे?’
‘कुशल. त्याला घेऊन येणे अवघड आहे हो, कारण त्याच्या पायाला प्लॅस्टर आहे.’
‘बरे! बरे! मी येतो.’ इन्स्पेक्टर म्हणाले.
अर्धा तासात इन्स्पेक्टर घरी आले. आजोबांनी कुशलने काढलेली चित्रे दाखवली. चित्रे पाहून इन्स्पेक्टर चकित झाले. कुशलने अप्रतिम चित्रे काढली होती. चित्रामधील पाठमोरी व्यक्ती व तिच्या लाल टी-शर्टवर रेखाटलेली अक्राळविक्राळ मगर हा एक महत्त्वाचा धागा होता. एका व्यक्तीचे उत्तम चित्र कुशलने काढले होते.
दोन दिवसांतच पोलिसांना महत्त्वाचे दुवे सापडत गेले आणि तीनही व्यक्ती जेरबंद झाल्या. आजोबांनी इन्स्पेक्टरना बजावून सांगितले होते की, या सर्व केसमध्ये माझ्या नातवाचा फोटो, नाव, पत्ता काही येता कामा नये. सर्वसामान्य माणूस पोलिसांना मदत करीत नाही, ती या गुप्ततेअभावीच.
इन्स्पेक्टर फार विचारी होते. ते म्हणाले, ‘हे कुणाला समजणार नाही. इन्स्पेक्टरांनी कुशलशी हस्तांदोलन केले आणि ते बाहेर पडले.
कुशल तर खट्टू झाला. त्याला वाटले, आता फोटो, मुलाखत धमाल येणार. पण आजोबांनी त्याची समजूत घातली. ते म्हणाले, ‘कुशल, आता तू नववीत आहेस. म्हणजे चांगला समंजस आहेस. जबाबदार नागरिकाने सरकारला काय, पोलिसांना काय, मदत करायची ती त्यांचे कर्तव्य म्हणून. आणि मी तुला बक्षीस देणारच की.’
कुशलला आजोबांचं म्हणणं पटलं आणि तो त्यांना बिलगला.