‘‘आता इतिहासाचं पान नं १४!’’ मराठीच्या पाठय़पुस्तकाने हसत हसत म्हटलं. रितूला हात-पाय आपटत येताना पाहून सगळयाच पुस्तकांना पुढे काय घडणार ते तोंडपाठ होतं. त्यामुळे सगळीच पाठय़पुस्तकं पानातल्या पानांत हसायला लागली. हे कायमच घडायचं. घरात रितू रिकामी दिसली रे दिसली की कोणीतरी lok07बोलायचंच अभ्यासाबाबत. ‘अभ्यासाला बस’ अशी आठवण करून दिली जायची तिला. आणि कोणी ती करून दिली की रितूची जाम चिडचिड व्हायची. म्हणजे तिच्या भाषेत जाम सटकायची तिची. पपा रागावले नसते तर ती एकदम पिक्चरसारखं ओरडलीच असती-‘आता.. माझी.. सटकली!’ खरं म्हणजे मनातल्या मनात ओरडायचीच ती तसं. पण उघडपणे म्हणता यायचं नाही तिला. कारण असं म्हटलं तर पपा ओरडायचे ना! त्यामुळे ते गिळायलाच लागायचं तिला. ते गिळून त्या बदल्यात ती दणदणाट करायची. आताही तिची अशीच सटकली होती. त्यामुळे दाणदाण पाय आपटत टेबलजवळ येत तिने खटकन लाइटचं बटन ऑन केलं. हे पाहूनच मराठीचं पुस्तक पुटपुटलं होतं. कारण आता रितू अभ्यास करणार म्हणजे इतिहासाच्या पुस्तकाचं पान नं १४ उघडणार आणि त्यातला बालशिवाजीचा ‘स्वराज्याची शपथ’ हा धडा वाचणार. वाचणार म्हणजे काय तर पुन्हा पुन्हा वाचून पाठ झालेल्या त्या धडय़ावरून पुन्हा एकदा नजर फिरवणार. ही गंमत पाहण्यासाठी विज्ञानाच्या पुस्तकावरच्या प्रकाशकिरणांनी थोडीशी दिशा बदलली आणि भूगोलाच्या पुस्तकावरचा पृथ्वीगोल थोडासा रितूच्या दिशेने झुकला.
रितूने धुसफुसत आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटत खरंच इतिहासाचं पुस्तक उघडलं आणि त्यातलं पान नं १४ समोर घेतलं. पण काय होत होतं कोण जाणे, रितूने पान नं १४ उघडलं की कोणीतरी जोरात फुंकर मारावी तशी पानं सटकन पुढे जायची आणि ‘पन्हाळगडाला मुघलांचा वेढा’ असा तिचा नावडता मजकूर असलेलं पान समोर यायचं. रितूला काही समजेचना. इतक्यात विज्ञानाचं पुस्तक आपोआपच चुळबुळतंय की काय, असं तिला वाटलं. मराठीच्या पुस्तकावरचं पेनही थोडंसं हलल्यासारखं वाटलं तिला. ‘‘भूतबीत आहे की काय?’’ न कळून तिचे डोळे विस्फारले. इतक्यात तिला कोणीतरी हळूच बोलल्यासारखं वाटलं, ‘‘६ी २ँ४’ ि२स्र्ीं‘ ६्र३ँ ँी१ ऋ१ंल्ल‘’८.’’ इंग्लिशचं पुस्तक होतं ते आणि गणिताच्या पुस्तकाने दुजोरा दिला, ‘‘अगदी बरोबर बोलतोयस तू. मलाही वाटतंय हीच योग्य वेळ आहे.’’ रितूने चहुबाजूने नजर फिरवली. कोणीच नव्हतं तिथे. आजूबाजूला तर कोणीच नाहीए. मग कोण बोलतंय हे न कळून रितू कावरीबावरी होत इकडे-तिकडे पाहू लागली.
इतक्यात मराठीचं पुस्तक थोडंसं तिच्या दिशेने झुकल्यासारखं वाटलं तिला. वाटलं कशाला, झुकलंच होतं ते. आणि हळू आवाजात कुजबुजत होतं, ‘‘अगं रितू, आम्हा सगळ्या पुस्तकांना थोडंसं बोलायचंय तुझ्याशी.’’
‘‘पुस्तकांना? बोलायचंय? माझ्याशी?’’ रितूने प्रश्नांची सरबत्तीच केली.
‘‘अगं, खरं तर आम्ही छापलेल्या शब्दांमधून बोलतच तर असतो. पण तू ते वाचत नाहीस ना म्हणून म्हटलं तुझ्याशी असं बोलावं. आणि ते आजच बोलावं असं आम्हा सर्वाना वाटतंय. कारण ह्या नवीन वर्षांत तुला त्याचा नक्की उपयोग होईल आणि त्यापुढेही.’’
‘‘हो, हो, खरंच’’ संस्कृतच्या पुस्तकाला सुरुवातीला घसा खाकरावा लागला. कारण अनेक दिवसांत ते मोकळं झालंच नव्हतं ना! म्हणजे रितूने अनेक दिवसांत का अनेक महिन्यांत ते उघडलंही नव्हतं. संस्कृतचा अभ्यास ती गाईडस् वापरूनच करायची.
‘‘सांग पाहू रितू, तू अभ्यास का करतेस?’’ रितूला त्याने मूलभूत प्रश्न विचारला. तीही आता सरावली होती. त्यामुळे मनातली भीती गेल्यानं ‘‘का म्हणजे? मार्क्‍स मिळवण्यासाठी, चांगली अ‍ॅडमिशन मिळवण्यासाठी, शाबासकी मिळवण्यासाठी आणि बक्षिसं मिळवण्यासाठी.’’ येडचापच आहेत, असा भाव चेहऱ्यावर ठेवत बेफिकिरीने ती उद्गारली.
‘‘म्हणजे ज्ञान मिळवणं, आनंद मिळवणं, उत्सुकता शमवणं वगरेचा काही संबंध नाहीए तर?’’ काय असतं हे, असा त्रासिक भाव चेहऱ्यावर आणत तिने एकदा पुस्तकांच्या गठ्ठयाकडे पाहिलं.
 ‘‘हे सगळं तुला माहीत नाही. कारण तू ते अनुभवलं नाहीएस.’’ भूगोलाच्या पुस्तकाने म्हटलं.
‘‘आता माझा विचार कर हं. माझ्या पानापानांमध्ये जगातले अनेक देश सामावलेले आहेत. त्या त्या देशात न जाताही नुसत्या वाचनाने, विचाराने आणि कल्पनाशक्तीने ते देश तू अनुभवू शकतेस आणि मोठ्ठी झाल्यावर तू जेव्हा खरंच तिथे जाशील ना तेव्हा तो अनुभव सत्यातही पडताळून पाहता येईल तुला. काय पटतंय का?’’
‘‘हं..’’ रितू सहमतीदर्शक उद्गार काढत असली तरी त्यात तेवढा जोर नव्हता.
‘‘आणि तुला एक गंमत सांगू का?’’ आता विज्ञानाच्या पुस्तकाने संभाषणात उडी घेतली. ‘‘रितू, तुला मोठ्ठयांच्या गप्पांत भरपूर इंटरेस्ट आणि मित्र-मत्रिणींबाबत चर्चा करणं हे तुला आवडतं. खरं की नाही?’’ रितूला खरं तर राग आला होता. पण काय करणार, ते खरं असल्याने तिला मान्य करावंच लागलं.
‘‘पाहा हं, ह्या अशा गोष्टींमध्ये तुला एवढा रस तर तुझ्या शरीरात कोणकोणते भाग आहेत, त्यांची रचना कशी आहे, ते कसे कार्य करतात, तुझ्या आसपास घडणाऱ्या घटनांमागे कोणकोणती कारणं आहेत हे सगळं मी सांगत असतो त्याकडे मात्र तू चक्क डोळझाक करतेस. बघ बरं हे तुला योग्य वाटतंय का? पटतंय का?’’
‘‘पण, मला नाही ना तू आवडत. कितीदा सागू मी सगळयांना?’’ रितू चडफडली.
‘‘हे मला पटत नाही. मी तुला आवडत नाही कारण मला समजून न घेता फक्त जास्त मार्क्‍स पाडायचे म्हणून तू कोरडेपणाने माझ्याकडे पाहतेस. तेच तू मार्काऐवजी माझ्यामधली गंमत समजून घेणं, तुझी उत्सुकता शमवणं यासाठी माझ्याशी थोडीशी जरी मत्री केलीस ना तरी आपली गट्टी होऊन जाईल. बघ तर करून.’’
‘‘काय तरी बाई याचं म्हणणं.’’ असं मनात म्हणत रितूने पानाचाचा कोपरा दुमडला. इतक्यात मराठी, िहदी, इंग्रजी, संस्कृत आळीपाळीने बोलू लागले, ‘‘आमच्याबद्दल तुझा विचार म्हणजे फारसे गुण न देणारे विषय, त्यामुळे आम्ही दुर्लक्षितच.’’
‘‘संस्कृत, तुझं नाहीए बरं आमच्यासारखं. तू बाबा गुण पाडण्यासाठी प्रसिद्ध.’’
‘‘ते आहे रे, पण आवडीने आपल्याला ही जवळ करते का सांग बरं. आपल्या बाबतीतलं हिचं उद्दिष्ट म्हणजे परीक्षा असेल तर गुण मिळवणं आणि स्पर्धा असेल तर बक्षीस. आनंद वगरेची बातच नाही.’’
‘‘थांब रे, एकदम असा अंगावर येऊ नको तिच्या. बघ हं रितू, महाकवी कालिदास, व्याकरणकार पाणिनी अशा अनेक दिग्गजांनी भाषेचा अभ्यास केला, सांग बरं त्यांना कोणतं बक्षीस मिळालं की पुरस्कार?’’
‘‘ते कशाला कुसुमाग्रज, पुलं, कानेटकर, मर्ढेकर अशी हजारोंनी नावं घेता येतील. या सगळयांनाच काही अत्युच्च पुरस्कार वा बक्षिसं मिळाली असं नाही. किंवा मिळाली ती अनेक र्वष अभ्यास केल्यावरच.’’
‘‘अजून नाही पटलं, बरं मला सांग अखंड कष्टानं, अभ्यासानं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, तुकारामांनी गाथा, एकनाथांनी भागवत, रामदासांनी दासबोध, कबिराने दोहे रचले. मग सांग बरं, त्यातून त्यांना कोणता पुरस्कार, कोणतं बक्षीस अगर सत्कार मिळाला होता. त्यांना मिळाला होता तो आनंद. आणि या आनंदानेच त्यांना अजरामर केलं.’’
‘‘ए, फार घाबरवून सोडू नका रे तिला.’’ व्यक्तिमत्त्व विकासाच्या बाजूला पडलेल्या पुस्तकाने आता हस्तक्षेप केला.
‘‘रितू, आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की अभ्यास का करायचा याचा आधी अभ्यास कर. त्यासाठी काही तासही पुरतील. वाटलं तर त्यासाठी इतरांचीही मदत घे आणि मग अभ्यासाला लाग. म्हणजे आपोआपच इतरांना तुला सारखीसारखी अभ्यासाची आठवण करून द्यावी लागणार नाही आणि तुलाही अभ्यासाचा कंटाळा येणार नाही. आणि जाता जाता सचिन तेंडुलकरने एका मुलाखतीत सांगितलेलं वाक्य सांगतो. ‘‘अभ्यास म्हणजे फक्त इतरांचं विश्लेषण करणं नव्हे, तर त्याबरोबर स्वत:ही नवनवीन गोष्टी शिकणं, टिपणं आणि स्वत:कडे लक्ष असणं.’ आणि हो त्याने हे खेळाबाबत म्हटलं असलं तरी तुला ते इतरत्रही वापरायला हरकत नाही ना?’’ रितू विचारात एवढी गढली होती की मान हलवायचं भानही नव्हतं तिला. हे जाणून सगळे चिडीचूप झाले. मात्र, पुस्तकांचं म्हणणं ऐकून रितूने नववर्षांत अभ्यासाकडे डोळसवृत्तीने पाहण्याचा संकल्प केला. सांगा पाहू तुमचा अभ्यास काय म्हणतोय?

IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?