News Flash

प्रोजेक्टची गोष्ट

एक दिवस मल्हार शाळेतून घरी आला तो गाल फुगवूनच

गोष्ट प्रोजेक्टची

एक दिवस मल्हार शाळेतून घरी आला तो गाल फुगवूनच. त्याचं काहीतरी बिनसलंय हे आजीनं लगेच ओळखलं. ‘‘काय झालं आमच्या मल्हारला? शाळेत कुणी काही बोललं का? ओरडलं का?’’ आजीनं जवळ घेत विचारलं.

त्यावर ‘‘आज्जी, तू पाहिलंस ना! दोन दिवस एवढी मेहनत करून मी वॉटर सायकलचं प्रोजेक्ट करून नेलं, पण टीचरनी आज जयच्याच प्रोजेक्टला सगळ्यात छान म्हटलं. मला ना खूप राग आलाय आईचा.’’ मल्हारची तक्रार ऐकून ‘‘अरे, खरंच त्याचं प्रोजेक्ट छान झालं असेल तर मग कौतुक होणारच की नाही! आणि तुझ्या प्रोजेक्टचा आणि आईवर रुसण्याचा काय रे संबंध?’’ आजीनं गोंधळून विचारलं. ‘‘अगं आज्जी, ते प्रोजेक्ट एकटय़ा जयनं केलं नव्हतं. त्यासाठी ना त्याला त्याच्या बाबांनीच सगळी मदत केली होती. मला माहितेय ना.. हवं तर या चार्वीलापण विचार.’’ त्याच्या मागोमाग आलेल्या त्याच्या वर्गातल्या चार्वीची त्यानं साक्ष काढली. ‘‘हो की नाही गं चार्वी?’’ तिनंही लगेच मान डोलावली. ‘‘अरे, पण तुला आईवर रुसायला काय झालंय?’’ – आजी.
‘‘अगं, मीसुद्धा आईला प्रोजेक्टसाठी मदत करायला सांगितलं तर म्हणाली कशी, ‘मल्हार, वॉटर सायकल कशी चालते ते तुला नीट समजायला हवं असेल तर तुझा प्रोजेक्ट तूच कर.. माझ्याकडून तुला मदत म्हणून ही दोन पुस्तकं देते- ती वाचून बघ. त्यातून तुलाच काहीतरी नवीन आयडिया नक्की मिळेल. आईनं स्वत: मदत मात्र केली नाही एवढी आर्टिस्ट असून.’’ मल्हारची तक्रार.
‘‘ए, पण त्या पुस्तकातल्या चित्रांचा आपल्याला छान उपयोग झाला हं मल्हार.’’- इति चार्वी.
‘‘हो, पण बेस्ट प्रोजेक्ट म्हणून कौतुक जयचंच झालं ना.’’ मल्हार अजूनही घुश्शातच होता. तेव्हा कुठे आजीला त्याच्या रुसव्याचं कारण कळलं. त्याला समजावताना ती म्हणाली, ‘‘अरे, एखादा विषय थोडय़ा वेगळ्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी ही प्रोजेक्टस् असतात ना. आता मला सांग पाहू- ते जलचक्र.. अं.. म्हणजे.. वॉटर-सायकल तू स्वत: करताना तुला नीट समजलं की नाही?’’
‘‘हो, म्हणजे काय? मी सांगू तुला त्याबद्दल? म्हणजे बघ हं.. आधी सूर्याच्या हीटमुळे समुद्राच्या पाण्याची व्हेपर बनते आणि..’’
‘‘बस्स बस्स.’’ त्याला थांबवत आजी म्हणाली, ‘‘याचाच अर्थ तुझ्या डोक्यात ते अगदी फिट्ट बसलंय. आईनं जर तुला त्यात मदत केली असती ना तर कदाचित तुला ते इतकं छान कळलंही नसतं. तू स्वत: वॉटर-सायकल समजून घेऊन मेहनत करून तुझ्या पद्धतीने प्रोजेक्ट बनवलंस ना, मग छानच झालं की! अरे महत्त्व कशाला आहे? तूच सांग- विषय नीट समजायला की फक्त प्रोजेक्टच्या कौतुकाला? आणि कौतुकाचं काय मोठंसं? पुढच्या वेळी तूसुद्धा आजच्यापेक्षाही छान प्रोजेक्ट बनवू शकशील की!’’ इतकं समजावूनही मल्हारचा रुसवा जात नाहीए हे पाहून त्यांना खायला देताना आजी म्हणाली, ‘‘ए, यावरून ना मला एक गोष्ट आठवलीय बरं का! खाता खाता ऐकणार का?’’.
‘‘हो.. चालेल आज्जी’’ – चार्वी.
आजीनं गोष्टीला सुरुवात केली. ‘‘तुमच्यासारखाच एक छोटा मुलगा होता हं. एकदा त्याला एका कोषातून बाहेर पडण्यासाठी धडपड करणारी अळी म्हणजे सुरवंट दिसलं.’’
‘‘त्याचंच पुढे फुलपाखरू होतं ना आज्जी?’’- मल्हार.
‘‘बरोब्बर.. तर त्या सुरवंटाची ती धडपड पाहून त्या मुलाला त्याची खूप दया आली. त्याचा त्रास कमी व्हावा, त्याला कोषातून पटकन बाहेर पडता यावं म्हणून त्या मुलानं तो कोष हळूच आपल्या नखानं फाडला. त्याबरोबर तो सुरवंट अलगदपणे बाहेर आला खरा, पण त्याची अगदीच जीव नसल्यासारखी अवस्था झाली होती. अगदी कमजोर असं ते बिचारं थोडा वेळ गोल गोल असं जमिनीवर फिरत राहिलं आणि मग निपचितच पडलं.’’
‘‘आई गं बिच्चारं.’’- चार्वी.
‘‘आत्ता तुला जसं वाटलं ना तसंच त्या मुलालाही वाटलं आणि त्यानं रडत रडत आईला विचारलं, की सुरवंटाला इतकी मदत करूनही ते कसं काय मरून गेलं? माझ्या मदतीचा काहीच कसा उपयोग झाला नाही?’’ त्यावर आईनं त्याला जवळ घेऊन सांगितलं, ‘‘तुला माहितेय का.. की सुरवंट या जगात येण्यासाठी, स्वतंत्रपणे उडण्यासाठी जेव्हा कोषातून बाहेर पडायची जी धडपड करत असतं, कष्ट करत असतं ना त्यातूनच त्याला बळ मिळत असतं. त्याची ताकद वाढत असते. त्यानं स्वत: केलेली धडपड त्याच्या- म्हणजे फुलपाखराच्या पुढच्या सशक्त वाढीला आवश्यक असते. तुझा हेतू चांगला असला तरीही तू केलेल्या आयत्या मदतीमुळे त्याचे कष्ट वाचले खरे, पण त्याची स्वत:ची मेहनत कमी पडली म्हणून त्याच्या पंखांची धड वाढ झाली नाही आणि त्यावर सुंदर रंग चढले नाहीत. ते धड सुरवंटही नाही आणि धड फुलपाखरूही नाही बनलं. म्हणजेच तुझ्या मदतीमुळे ते अखेपर्यंत कमजोरच राहिलं आणि म्हणूनच ते या जगात टिकूही शकलं नाही.’’
‘‘काय मग मल्हार, कशी वाटली मदतीची गोष्ट? आवडली का..? आणि मुळात समजली का नीट?’’ आजीनं मिश्कील हसत विचारल्यावर ‘‘हो आज्जी, अगदी छानपैकी समजलीय हं मला तुझी मदतीची गोष्ट.’’ म्हणत मल्हार लाडानं आजीला बिलगला.

alaknanda263@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2015 12:08 am

Web Title: tells of project
टॅग : Project
Next Stories
1 डोकॅलिटी
2 किल्ला
3 डोकॅलिटी
Just Now!
X