श्रीराम वनवासात असताना सीतेसह पंचवटीत वास्तव्य करीत होते. स्वयंवराच्या वेळी रावणाची फट्फजिती झाली होती. शिवधनुष्य पेलता न आल्याने ते पोटावर कोसळून रावण त्याखाली पडला होता. सारे प्रेक्षागार खद्खदून हसले होते. रावणाच्या मनात हा अपमान खद्खदत होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सीतेला प्राप्त करून घेण्याचा निश्चय त्याने केला होता. सीता रामासह वनवासात असतानाच हा निश्चय पूर्णत्वास नेण्याचा कट त्याने रचला.
मारिच नावाच्या राक्षसाला त्याने कांचनमृगाचे रूप घेऊन पंचवटीत पाठवले. त्या कांचनमृगाचे कातडे इतके सुंदर होते की, त्याचे कातडे आपल्याला चोळी शिवण्यासाठी मिळावे, अशी अनावर इच्छा सीतेच्या मनात उत्पन्न झाली. तिने रामाजवळ हट्ट धरला की, आत्ताच्या आत्ता जाऊन त्या मृगाची हत्या कर आणि मला त्याचे कातडे चोळी शिवण्यासाठी आणून दे. राम-लक्ष्मणाने तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण सीतेने हट्ट सोडला नाही. लक्ष्मणाने असेही सांगितले की, ‘‘वहिनी, ते हरीण नसून एखादा मायावी राक्षसही असू शकेल. त्यामुळे आपण त्याच्यामागे जाऊ नये, हे उत्तम.’’ पण लक्ष्मणाच्या या शंकेमुळेही सीता सावध झाली नाही. तिने आपला हट्ट सोडला नाही आणि त्या हट्टापायी रामाला तिने त्या मृगाचा वध करण्यासाठी जाण्यास भाग पाडले.
राम हरिणाच्या मागे गेला. पर्णकुटीपासून फार दूर गेल्यावर ते हरीण त्याच्या कक्षेत आले. त्या मृगावर त्याने अचूक बाण मारला. त्या बाणाने तो मृग विद्ध झाला, पण मरता मरता रामासारखाच आवाज काढून ओरडला, ‘‘लक्ष्मणा, लक्ष्मणा धाव, धाव, सीते धाव.’’ या आवाजाने घाबरून जात सीतेने लक्ष्मणाला रामाच्या मदतीसाठी जाण्याची विनंती केली. लक्ष्मणाने नकार दिला असताही तिने त्याला जाण्यास भाग पाडले. जाताना लक्ष्मणाने पर्णकुटीभोवती बाणाच्या टोकाने एक रेषा आखली व कोणत्याही परिस्थितीत ती न ओलांडण्याबद्दल सीतेला बजावले.
लक्ष्मण निघून गेल्यावर साधूच्या वेषातील रावण भिक्षा मागण्यासाठी पर्णकुटीपुढे आला. त्याला भिक्षा देताना सीतेने नकळतपणे लक्ष्मणाने मारलेली रेषा ओलांडली व रावणाने सीतेला पळवून नेले.
अशा प्रकारे मोहापायी अनवधानाने का असेना मर्यादेचे उल्लंघन केले असता संकटाला आमंत्रण मिळते. या मर्यादेच्या उल्लंघनाला ‘लक्ष्मणरेषा ओलांडणे’ असे म्हटले जाते.