खूप खूप वर्षांपूर्वी पानं, फुलं, फळं यांना कुणालाच रंग नव्हते. सगळे पांढरे. पानं पांढरी, फुलं पांढरी, फळं पांढरी. फांद्या, खोड, मुळं सगळंच पांढरं. फुलं, पानं एकमेकांकडे बघत. नुसता पांढराच रंग बघून त्यांना कंटाळा आला. ती पानं- फुलं निळं आकाश बघत. निळा समुद्र बघत, झगझगीत पिवळा सूर्य बघत. सूर्य bal02उगवण्यापूर्वी आकाशात दिसलेला लाल नारिंगी रंग बघत. ढगांचे बदलते रंग त्यांना दिसत. इंद्रधनुष्याचे सात रंग तर त्यांना खूपच आवडायचे. त्यांना वाटायचं, बाहेर इतके छान रंग आहेत. देवानं आपल्यालाच का असं पांढरं ठेवलं? मग एकदा सगळे मिळून देवाकडे गेले. देवाची प्रार्थना करून त्याला त्यांनी आपली तक्रार सांगितली. मग देवानं त्यांना रंग द्यायचं ठरवलं.
दुसऱ्या दिवशी एक सुंदरशी, चमकते पंख असलेली अगदी एवढीशी परी त्यांच्याकडे आली. तिनं बरोबर इंद्रधनुष्यच आणलं होतं आणि ती कुंचल्यावर बसूनच आली होती. फुलं आनंदली. सगळ्यांनी आपल्यासाठी एकेक रंग निवडला. गुलाबानं लाल, गुलाबी आणि पिवळा निवडला. सूर्यफूल आणि सोनचाफ्यानं सूर्यासारखा पिवळा, गारवेलीनं जांभळा, गोकर्णीनं निळा, गुलमोहोरानं नारिंगी-पिवळा, शेवंतीनं पिवळा, जास्वंदीनं लाल-पिवळा. बोगनवेलीला तर ठरवताच येईना की हा रंग घेऊ का तो? शेवटी बोगनवेलीनं ४-५ रंग निवडले- लाल, पिवळा, गुलबक्षी, गुलाबी. त्यामुळे बोगनवेल वेगवेगळ्या रंगांत शोभू लागली. कांचन आणि बहाव्यानं पिवळाच रंग निवडला. तेवढय़ात पानांनी आरडाओरडा केला, ‘‘आम्हाला रंग, आम्हाला रंग.’’ पण आता परीजवळ थोडेच रंग राहिले होते. हिरवा रंग खूप होता. पानं हिरमुसली. ‘‘हे काय, फुलांना एवढे छान रंग दिले. आम्हाला मात्र हिरवाच!’’
परी म्हणाली, ‘‘अरे, खट्ट नका होऊ. हे पाहा- माझ्याजवळ बाकीच्या रंगांतले एवढेसे रंग शिल्लक आहेत. हिरव्यात ते रंग मिसळून खूप निराळ्या छटा देईन ना मी. हे पाहा- हिरव्यात पिवळा मिसळला की कसा छान पोपटी रंग मिळतो. लाल रंग मिसळला की पानं कशी तांबूस हिरवी दिसतील. निळा मिसळला की काळपट हिरवा रंग तयार होईल.’’
परीचं बोलणं ऐकून पानांना आनंद झाला. सगळी पानं हिरवीच; पण इतक्या वेगळ्या छटांची झाली, की ती वेगवेगळी ओळखू येऊ लागली. फळांनी फुलांच्याही आधी रंग मिळवले होते. मोहरीएवढय़ा किंवा नखाएवढय़ा रानफुलांना रंग वाटताना उडालेले शिंतोडे पुरले रंगायला. लाल, गुलाबी, पिवळी, जांभळी, हिरव्यागार गवतपात्यावर इवलीशी रानफुलं छान दिसायला लागली. पण या रंग द्यायच्या वेळी काही फुलं मात्र झोपली होती. काही आपापसात बडबडत होती. काही इतकी लाजाळू, की पुढे होऊन ती काही बोललीच नाहीत. तेवढय़ात प्राजक्ताच्या लक्षात आलं -आपल्याला रंग मिळालेला नाही. त्यानं घाईनं सांडलेल्या रंगात आपले देठ बुडवले. ते केशरी झाले. पण रंगच संपला. परी रंग देऊन निघून गेली तरी त्यांना कळलंच नाही. पण त्यांनी जेव्हा इतर फुलांचे सुंदर रंग पाहिले; तेव्हा त्यांना आपला पांढरा रंग आवडेनासा झाला. जाई, जुई, सायली, मोगरा, निशिगंध, कुंदा सगळी फुलं देवाकडे गेली. देव म्हणाला, ‘‘अरे, परीला मी पाठवलं तेव्हा तुम्ही काय झोपा काढीत होतात काय? लक्ष कुठे होते तुमचे?’ सगळी फुलं गोरीमोरी झाली. त्यांना रडूच आलं.
देव म्हणाला, ‘‘अरे, आता रंग तर संपले.’’
फुलं म्हणाली, ‘‘मग आम्ही काय असं पांढरंच राहायचं का?’’
देव म्हणाला, ‘‘आता त्याला इलाज नाही. पण मी तुमच्यासाठी काहीतरी करतो. मी तुम्हाला वेगवेगळा सुगंध देतो. एक सुगंधपरी येईल तुमच्याकडे.’’
पांढऱ्या फुलांना वाटलं, इतकी सुंदर रंगीबेरंगी फुलं अवतीभवती असताना आमच्याकडे कोण लक्ष देणार? नंतर गंधपरी आली. तिनं गंधाच्या वेगवेगळ्या कुप्या आणल्या होत्या. तिनं त्या पांढल्या फुलांना वेगवेगळे सुगंध दिले. तरी फुलं अजून नाराजच होती. पण हळूहळू असं झालं, की त्यांचा शुभ्र रंग आणि त्यांचा मोहक सुवास हेच त्यांचं वेगळेपण ठरलं. सगळी या सुगंधी फुलांसाठी जीव टाकू लागली. आणि देवसुद्धा सुगंधी फुलांनीच प्रसन्न होऊ लागले. शंकराला तर पूजेमध्ये पांढरे फूलच आवडू लागले. रंगीत फुलांनाही थोडाफार सुगंधाचा वाटा मिळाला; पण तो थोडा. पांढऱ्या फुलांचा घमघमाट असायचा तितका त्यांना सुगंध नव्हता. तेव्हापासून फुलांना रंग आणि सुगंध मिळाले.
मीनाक्षी केतकर

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Video Of Baby Turtles Making Their First Voyage Will Give You Goosebumps
Video : डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात आहे ही कासवांची प्रजाती, चिमुकल्या कासवांचा पहिला समुद्र प्रवास एकदा बघाच
what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…