श्रीनिवास बाळकृष्ण shriba29@gmail.com

मित्रा, मला महित्येय की तू आत्तापासूनच फेसबुक, इन्स्टावर असणार.. किंवा पालकांचे अकाऊंट तूच हॅण्डल करत असणार. तसं असेल तर आजच्या पुस्तकामागची गरज तुला नक्की समजून येईल. सोशल मीडियामुळे आजूबाजूचं बोलणं ऐकता येऊ लागलं. पडद्यामागे असल्याने मोठे लोक धाडसी होत वाट्टेल तसे व्यक्त होऊ लागले. त्यासाठी शब्द हेच हत्यार झालं आणि ईमोजी हे बॉम्ब! गोड गोड बोलण्यासाठी आपल्याकडे एकच दिवस असल्याने असं होतं असेल का?

मोठय़ांना रोज गोड, चांगलं का बोलता येत नाही हे पुस्तकातील ओमागीस नावाच्या जादूगाराने सांगितलं. तो हवा, झाड, झऱ्याच्या पाण्याने प्रेमाचे शब्द तयार करायचा. जगभरात वापरले जाणारे मैत्री, दोस्ती, प्रेम, मदत, आनंद, सुंदर, शुभ, काळजी, वात्सल्य.. असे सर्व शब्द त्याचेच. फेसबुकवरचा अंगठा, बदाम, आणि ‘ख1 झालं का?’ त्यानेच निर्माण केलं. पण निसर्गातील वादळ, गडगडाटी ढगांनी त्याउलट ‘वाईट शब्द’ तयार केले. हा जादूगार जसजसे चांगले शब्द करायचा तसतसे इथून हे वाईट शब्द तयार करायचे आणि मोठय़ांनी वाईट शब्द खूप वापरल्याने जगभर दु:ख तयार झालं. मग याने शेवटी ‘चांगले शब्द’ तयार करायची जादू मुलांना शिकवली. मोठय़ांना वापरू देत वाईट शब्द!

फेसबुक, इन्स्टावर चांगले गोड नवनवे शब्द बनवणाऱ्या मुलांची संख्या अजून वाढली पाहिजे, याकरता मार्ता व्हिलेगस आणि मोनिका कार्रेटेरो यांनी ‘वोमागीस’ला सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी आणखी एक खास शक्ती दिली. यात किती भाषा वापरल्या असतील? दोन?, चार? नव्हे, महत्त्वाच्या १८ भाषा, एक चित्रभाषा सर्व एकाच पुस्तकात! असं पुस्तक मी तरी पहिल्यांदाच पाहिलं.

मध्यभागी मोठं चित्र आणि बाजूला वेगवेगळय़ा भाषेतले एक वाक्य. असं प्रत्येक पानावर!

चित्र.. बहुतेक काम डिजिटल केलं असलं तरी अगदी हातांनी काढल्यासारखा स्पर्श चित्राला आहे (अशा डिजिटल चित्रासाठी तुमच्याकडे चांगला टॅब, सॉफ्टवेअर आणि स्टायलस असायला हवा.).

पुस्तकातील चित्रात ‘शब्द’चे चित्र म्हणून पक्ष्याचं पीस वापरलं आहे. चांगले शब्द म्हणजे रंगीत पीस, वाईट शब्द म्हणजे करडे-काळे पीस. अशी मुलांना कळायला सोपी विभागणी. चित्रातून आनंद, उत्साह, उदासवाणे, दु:खी, नकारात्मकता अशा साऱ्या भावना ‘रंग देण्याच्या पद्धती’ने दाखवल्या आहेत. त्यासाठी वेगवेगळी रंगमाध्यमंही वापरली आहेत. कधी एकाच चित्रात एकत्र केली आहेत. यामुळे १८ भाषा न येणाऱ्यालाही चित्र पाहून भावना लक्षात येईल. चित्रातील आकार सोपे आहेत. खूप रंग व रंगात खूप सारे शेडिंग आहे. सावल्या आहेत. त्यामुळे चित्रातील आकार सपाट न वाटता त्याला खऱ्या आकारासारखी गोलाई मिळते.

मागे आपण पाहिलं की मुलांसाठी पुस्तक करताना लेखक, चित्रकार, डिझायनर लागतो तसं या पुस्तकात वेगवेगळय़ा भाषेत अनुवाद करणारे इथं १८ लोक लागले असतील! पुन्हा या पुस्तकातून मुलांना काय मिळणार आहे, त्यांच्याकडून एखादी अ‍ॅक्टिव्हिटी करवून घेता येईल का, यासाठी वेगळा ‘शिक्षण सल्लागार’देखील सहभागी आहे.

मुलांची पुस्तकं म्हणजे चिऊ- काऊ- अकडू- पकडू करून भागत नाही, हे अशा पुस्तकातून कळतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपण आपल्यासाठी ही कल्पना सोपी करून घेऊयात. तुम्हाला मराठी, हिंदूी, इंग्रजी थोडंफार येत असेल ना? नाहीतर जगभरातल्या भाषा धमाल वळवायला गूगल ट्रान्सलेटर आहेच. तुमच्या भाषेत तुमच्या मनातले चांगले शब्द लिहा (वाक्य सुचत असेल तर तसं लिहून घ्या). मध्यभागी त्याला साजेसे चित्र काढा. चित्रात तुमच्या मनातले आकार, तुमच्या मनातले रंग भरा. हे आकार मोठय़ांना नाही समजले, नाही आवडले, रंग बाहेर गेले, तरी चालेल. मनातले शब्द सुंदर आहेत ना, मग पुरे! असे ‘सुंदर गोड शब्द’ सोशल मीडियावर टाका. चला, तिथल्या वाईट शब्दांना आपण हरवूयात.