पांढऱ्या पोटाचा बगळा (White-bellied heron- Ardea insignis) फक्त दक्षिणपूर्व आशियामध्ये सापडतो. हा मुख्यत्वे भारत, नेपाळ आणि भूतानमधील हिमालयाच्या पायथ्यापासून ते उत्तर-पूर्व भारत, बांगलादेश आणि म्यानमार येथील डोंगराळ प्रदेशांत वास्तव्य करतो. हा कदाचित दक्षिण-पूर्व तिबेट, चीन येथेही सापडत असावा. पूर्वी याचा विस्तार पश्चिम, मध्य म्यानमार आणि नेपाळ येथेही होता. पण आता या भागात त्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव अतिशय समर्पक असे आहे. अ१ीिं म्हणजे बगळा आणि ्रल्ल२्रॠल्ल्र२ म्हणजे जलद वाढणारा पाइन वृक्ष. हा पाइन वृक्षांवर घरटे बनवतो म्हणून त्याला हे नाव देण्यात आले असावे.
याचा प्रमुख अधिवास हा रुंदपर्णी जंगलाने आच्छादलेल्या नद्या व पाणथळ जागा हे होय. जंगलातील पठारी भागापासून १५०० मीटर उंचीवरच्या पाणथळ जागांमध्ये हे पक्षी आढळून येतात. ते प्रामुख्याने एकटे राहतात. एकटे राहण्याच्या सवयीमुळे हा इतर बगळ्यांबरोबर अन्नासाठी सहसा स्पर्धा करत नाही. पण हिवाळ्याच्या सुरुवातीस ते छोटे छोटे थवे करून एकत्र येतात. यात प्रामुख्याने त्यांच्या कुटुंबाचा समावेश असतो. त्यासाठी ते २५-३० कि. मी. लांब प्रवासही करतात. हे सर्व पक्षी मग छोटय़ा थव्यांनी अतिशय दूर आणि माणसाचा त्रास होणार नाही अशा प्रदेशांमध्ये अन्नाच्या शोधात फिरतात. हा पक्षी नदीकिनारी रेताड जमिनी आणि उथळ पाण्यात खाद्य शोधत फिरतो. सकाळी सूर्योदयापूर्वी आणि सायंकाळी सूर्यास्तानंतर हे बगळे अन्न शोधताना आढळतात. त्यांच्या खाद्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. पण ते गोडय़ा पाण्यातील झिंगे आणि मासे खात असावेत.
त्यांचा विणीचा हंगाम मार्च ते जून यादरम्यान असतो. हे पक्षी चीर-पाइन वृक्षांवर आपले घरटे बनवतात. ते आपल्या घरटय़ासाठी लागणारे झाड अतिशय काळजीपूर्वक निवडतात. जंगलातील नदी आणि ओढा यांच्या संगमावर असणाऱ्या तीव्र उतारावरील उंच झाडे ही त्यांची आवडती ठिकाणे होत. जमिनीपासून सुमारे ३०-४० फूट उंचीवर काटक्यांचे घरटे बनवले जाते.
मादी हिरवट निळ्या रंगाची २-३ अंडी घालते. नर व मादी दोघेही अंडी उबवतात आणि सुमारे ३० दिवसांनी अंडय़ातून पिल्लू बाहेर येते. नर- मादी सुमारे २-३ महिने या पिल्लांचा सांभाळ करतात.
जगभरातील यांची संख्या १०० ते ५०० च्या दरम्यान असावी असा अंदाज आहे. त्यामुळे या पक्ष्याचा अतिसंकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या पक्ष्याला प्रमुख धोका आहे तो त्यांचा अधिवास नष्ट होण्याचा आणि शिकारीचा. शेतीसाठी आणि मनुष्यवस्तीसाठी याचा अधिवास मोठय़ा प्रमाणावर नष्ट केला जात आहे. त्याचबरोबर पाणथळ जागांचे प्रदूषण आणि आगंतुक परदेशी वनस्पतींचे पाणथळ जागांवर होणारे अतिक्रमण या गोष्टीही अधिवास नष्ट होण्यामागचे कारण आहे. यासोबतच स्थानिक लोकांकडून होणारी शिकारही यांची संख्या कमी होण्यास कारणीभूत आहे. याचबरोबर भूतान येथे होणारे विकास प्रकल्प- खासकरून रस्ते आणि जलविद्युत केंद्रे यामुळे यांचा अधिवास छोटय़ा-मोठय़ा तुकडय़ांमध्ये विखुरला जात आहे. या सर्वाचा परिणाम म्हणजे यांची घटणारी संख्या.
भूतानच्या ‘रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ नेचर’ या संस्थेतर्फे या बगळ्याला वाचविण्यासाठी एक मोठा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत जनजागृती, अधिवासांचे संरक्षण, घरटय़ांचे संरक्षण असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. भूतान सरकारने पुनखा-वांग्दुई नदीचे पात्र याच्या संवर्धनासाठी आरक्षित केले आहे. भारतात ‘नामदाफा व्याघ्रप्रकल्प’ व इतर उत्तर-पूर्व राज्यांतील अभयारण्यांत हे बगळे तुलनेने सुरक्षित आहेत. हा पक्षी सुदृढ परिसंस्थेचे द्योतक असल्याने त्याच्या संरक्षणाबरोबर त्याच्या वास्तव्याची परिसंस्थाही संरक्षित होईल आणि आपणास शाश्वतरीत्या विविध परिसंस्था सेवा पुरवीत राहतील.
छायाचित्र सौजन्य : येशयी दोरजी
(समाप्त)