डॉ. नीलिमा गुंडी

‘‘आजी, तू चल ना आमच्याबरोबर ट्रेकिंगला. ताई येणार नाही म्हणाली!’’ शाळेतून आल्या आल्या आजीशी लाडीगोडी लावत उन्मेष म्हणाला.

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

‘‘अरे, ‘‘तरण्या झाल्या बरण्या नि म्हाताऱ्या झाल्या हरण्या,’’ असं म्हणतील लोक!

‘‘ काय? तू बोलताना ऐकायला छान वाटलं. अगदी ताई कथक करते त्याची आठवण झाली, पण कळलं नाही.’’ उन्मेष म्हणाला.

‘‘मी एक म्हण वापरली. तिचा अर्थ असा की तरुण मुली बसून राहणार नि म्हाताऱ्या हरणींसारख्या जोरात पळणार, हे बरं दिसेल का?’’

‘‘बरं! पण आजी, उद्या आमच्या शाळेत भाषण आहे, त्याला तरी तू नक्की ये गं. वेगळा विषय आहे-  अक आणि मुलांचा अभ्यास.’ काय गं याचा अर्थ?’’ उन्मेष म्हणाला.

‘‘अरे,  अक म्हणजे आर्टिफिशियल इंटलिजन्स- कृत्रिम  बुद्धिमत्ता. तुला कसं बरं सांगू? अरे, आता आपल्या हातात हे स्मार्ट फोन आले आहेत ना, त्यातून किनई आपल्याला खूप माहिती मिळत असते. ही निर्जीव यंत्रं आता इतकी हुशार झाली आहेत की काही विचारू नका! आता तर चॅटजिपिटी नावाचं मोठं साधन आलंय. ते कोणालाही हवी ती माहिती तयार देईल म्हणे! त्यामुळे तुमच्या डोक्याचं काय करायचं हा प्रश्न आहे.  ‘अकची संपणार सद्दी, अक बळकावणार गादी!’ नाही ना कळलं? अरे, आपली स्वत:ची भाषा  विसरायला होणार नि छापाचे गणपती तयार होणार अशी भीती वाटतेय!’’

‘‘बाप रे! सगळ्यांना तयार उत्तरं मिळाली तर माझा पहिला नंबर कसा येणार?’’ उन्मेष काळजीत पडला. तेवढय़ात आबा आले. आजीनं विचारलं, ‘‘कसं होतं नाटक? गर्दी होती का हो?’’

‘‘नाटक छान होतं अगं, ते गर्दीसाठी  नव्हतं!’’ आबा म्हणाले.

 ‘‘वा!’’ ‘आमचे चार जण दर्दी नि इतरांची ती गर्दी’ असं आहे तुमचं!’’ आजी असं म्हणताच आबा हसून म्हणाले, ‘‘ऐकलं का उन्मेष, तुझी आजी जुन्या म्हणींच्या चालीवर नव्या म्हणी तयार करते बरं!’’

आजी हसत म्हणाली, ‘‘आजकालच्या मुलांची धाव गूगलपर्यंत! शब्दकोश हाताळायची सवय नाही. भाषेशी गट्टी करत तिला नवी टवटवी देणं माहीत नाही त्यांना. त्या दिवशी शेजारचा प्रथमेश आला होता. ‘मी मी करणे’ म्हणजे काय, असं विचारत होता. मी सरळ त्याच्यासमोर शब्दकोश ठेवला नि म्हटलं, ‘‘शोध, जरा व्यायाम होईल डोक्याला! डोंगर पोखरून उंदीर काढावा तसा त्याला अख्खा शब्दकोश पाहिल्यावर ‘मी’चा अर्थ मिळाला. वरच्या मजल्यावरची वेणू दोन दिवस झाले गाण्याच्या क्लासला जात आहे. सकाळी मला म्हणाली, ‘‘आजी, मला गाणं येतं आता!’’ म्हणजे ‘आज लाव जिम नि उद्या हो दारासिंग’ असंच झालं की तिचं!’’

‘‘आजी, मला यामागची जुनी म्हण आठवतेय, तूच सांगितली होतीस. ‘पी हळद नि हो गोरी.’ बरोबर आम्ही मुलं जसं ‘नवा गडी, नवं राज्य’ खेळतो तसं तू नव्या म्हणींचं राज्य असा खेळच खेळतेस गं.’’ यावर आजीची शाबासकी त्याला साहजिकच मिळाली.

तेवढय़ात आबा त्याला म्हणाले, ‘‘उद्या परीक्षा आहे ना गणिताची, अभ्यास झाला असेलच!’’ यावर ‘गणित बोअर विषय आहे,’ असं उन्मेष पुटपुटला. आजीला ते कळलंच. ती म्हणाली, ‘‘असेल गणित भारी, तर जाशील चंद्रावरी.’’ चांद्रयानाचं उड्डाण पाहिलंस ना! म्हणे गणित विषय बोअर! कोल्ह्याला द्राक्षं आंबट, म्हणतात ना त्यासारखं झालं हे. नवी म्हण वापरायची तर – ‘स्वत:ला नाही गणित जमत नि म्हणे ‘पाय’ आहे अर्धवट!’ ’’

 उन्मेषने अर्थासाठी मोठय़ा आशेनं आबांकडे पाहिलं. ‘‘अरे, असं हातपाय गाळून कसं चालेल?’’ आबांनीही त्याची फिरकी घेत म्हटलं, ‘‘तुला फक्त ‘चहा गाळणे’ माहीत दिसतंय! हातपाय गाळणे म्हणजे घाबरणे. भाषेत शब्द, क्रियापद यांना खूप वेगवेगळे अर्थ असू शकतात. ते आपण हुशारीनं वापरत राहिलो तर सहजासहजी आपली भाषा कोणाला गिरवता येणार नाही! आजीच्या या म्हणीत ‘पाय’ म्हणजे गणितातली एक प्रसिद्ध संख्या आहे.  २२/७ ही ती संख्या आहे. बरं, तुला होईल माहीत लवकरच ती संख्या. पूर्णाकात देताच येत नाही. ती कायम अपूर्ण असते, पण म्हणून तिला ‘अर्धवट’ म्हणणं बरोबर नाही. अर्धवट हा शब्द आपण एखाद्याला कमी लेखायला वापरतो. आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही की त्या गोष्टीलाच नावं ठेवायचा स्वभाव असतो काहींचा. आजीला यातून काय म्हणायचं आहे ते कळलं का आता तरी?’’

‘‘आत्ता कळलं. आबा, आपल्या आजीची भाषा अगदी गूगलला गुगली टाकेल अशी आहे.’’ या उन्मेषच्या वाक्याला दाद देताना आबांमधला क्रिकेटप्रेमीही जागा झाला तो असा- ‘‘अरे, तू तर आजीचं कौतुक करताना सिक्सरच मारलीस!’’ यावर आजीला मोठ्ठा करंडक जिंकल्याचा आनंद झाला!  nmgundi@gmail.com