|| श्रीपाद तुम्हाला बर्गर आवडतो का? आवडतच असणार. मात्र, तुमच्यापकी कितीतरी जण आई-वडिलांच्या धाकाने म्हणा किंवा शहाण्यासारखं वागायचं म्हणून म्हणा, ‘मला बर्गर आवडत नाही,’ असं सांगाल. मी मात्र छातीठोकपणे सांगतो, ‘मला बर्गर खूप आवडतो.’ मला आवडतो तो बर्गर जास्तीत जास्त भारतीय करायचा प्रयत्न मी केला आहे. शिवाय त्यात अजिबात चीटिंग नाही बरं का! तर सुरुवात करा बाजारातून छान, मऊ, लुसलुशीत पावाची लादी आणण्यापासून. छान मोठय़ा आकाराचे, खरपूस भाजलेले, ताजे पाव नीट पारखून आणा. पाव न मिळालेच तर आपण सॅण्डविचकरता वापरतो तो स्लाईस्ड ब्रेडही चालेल. आता खरी गंमत सांगतो. बटाटा हा मुळी संपूर्ण भारतीय पदार्थ नाहीच. तो आला आहे दक्षिण अमेरिकेतून. आपल्याकडे त्याला पर्याय म्हणून त्याआधीपासून अनेक प्रकारचे कंद वापरतात. उपासाला खातात ते गोडूस रताळं. खाजऱ्या भाजीकरता प्रसिद्ध, वरून मातीच्या ढेकळासारखा दिसणारा सुरण. गुजराती उंधियोमध्ये साजरा ठरणारा जांभळा कंद. खासकरून पावसाळ्यात मिळणारी आरबी किंवा अळूच्या मुळ्या. एक ना अनेक कंद आपल्याकडे बटाटय़ाआधीपासून आपण खात आलो आहोत. आजच्या बर्गरकरता आपण यांचाच उपयोग करून घेणार आहोत. रताळं सोडून कोणत्याही प्रकारचा कंद मिळाला तरी चालेल. त्यापासून चविष्ट बर्गर करायची पद्धत जवळजवळ एकसारखीच असेल. तेव्हा तुमच्या जवळच्या बाजारात किंवा सुपरमार्केटात जो कंद मिळेल तो चालेल. आजची ही पाककृती मोठय़ांना हाताशी घेऊन तुम्ही अगदी सहज करू शकता. विस्तवाशी काम करायचं असल्याने घरातल्या मोठय़ा मंडळींची देखरेख हवीच हे लक्षात असू द्या. चारजणांकरता साहित्य : चार वाटय़ा शिजलेल्या कंदाच्या फोडी. एक वाटी शिजलेले ताजे मटार. दोन लसणीच्या पाकळ्या आणि चमचाभर आल्याचे बारीक तुकडे. चवीनुसार हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे. चिमूटभर हिंग, हळद आणि एक छोटा चमचा आमचूर पावडर किंवा मोठय़ा लिंबाचा रस. बारीक चिरलेली चार चमचे कोिथबीर. दोन-चार चमचे मदा, विशेषत: लिंबाने आंबटपणा आणल्यावर तर गरजेचाच. चवीनुसार मीठ. पॅटीच्या मसाल्याकरता एक वाटी बारीक रवा. अर्धा चमचा आलं-लसूणाची पेस्ट. चवीनुसार लाल तिखट, किंचितशी हळद आणि एक मोठा चमचा कोथिंबीर. पॅटी बनवण्याकरता दोन-तीन चमचे तेल किंवा घरचं लोणी. प्रत्येकी एक असा प्रत्येक पॅटीसाठी पाव. बर्गर पुरा करण्याकरता कांदा, टोमॅटो, काकडी यांचे पातळ काप. भरपूर लोणी. पुदिन्याची पानं. चवीनुसार चाट मसाला. उपकरणं : गॅस किंवा इतर कुठलीही शेगडी. एक मोठंसं जाड बुडाचं नॉनस्टिक फ्रायपॅन, तवा किंवा जाड बुडाचा बीडाचा तवा. पॅटी पलटण्याकरता उलथणं. भाज्या आणि मसाला बनवण्याकरता दोन मोठी पसरट भांडी. भाज्या शिजवण्याकरता प्रेशर कुकर. सर्वप्रथम कोणताही कंद आणलात म्हणजे तो स्वच्छ धुऊन घ्या. सगळेच कंद मातीमध्ये, जमिनीखाली वाढत असल्याने त्यांना खूप माती लागलेली असते. त्यांच्या सांदीकोपऱ्यात चिखल-मातीचे कण अडकलेले असतात. सुरण, जांभळा कंद धुण्याकरता तर मी जुन्या टूथब्रशचा वापर करतो, म्हणजे ते स्वच्छ होतात. आरबी, जांभळा कंद, सुरण यांची साल काढावीच लागते, तेव्हा स्वच्छ धुतल्यावर कापण्या-शिजवण्यापूर्वी यांची साल काढून घ्या. त्यावर कधी डोळे असतात, त्यांना कापून बाजूला काढा. कितीतरी स्वच्छ धुतल्यावरही या डोळ्यांच्या खाचांमध्ये माती राहतेच, तेव्हा ते बाजूला केलेलेच बरे. सुरण, जांभळा कंदाच्या फोडी चिंचेच्या पाण्यात चांगल्या दोन-तीन तास भिजत घातल्या म्हणजे त्या खाजत नाहीत. आता कंदाच्या फोडी कुकरामध्ये शिजवा. पाणी न घालता भांडय़ावर झाकण ठेवून चांगलं शिजेपर्यंत शिजवा. दोन शिट्टय़ा किंवा साधारण २० मिनिटं मध्यम आचेवर शिजवल्यावर या फोडी चांगल्या शिजतात. कंद शिजेतोवर त्याच्या मसाल्याची आणि इतर तयारी करून घ्या. एका मोठय़ा थाळ्यामध्ये किंवा पसरट भांडय़ामध्ये पॅटीच्या मसाल्याकरता असलेलं साहित्य मिसळून हाताने चुरत चुरत चांगलं एकजीव करा. बर्गर पुरा करण्याकरता कांदा, टोमॅटो, काकडीचे पातळ काप करून ठेवा. पावाचे दोन तुकडे करा, संपूर्ण कापू नका तर पुस्तक-वही उघडतो तसा पाव उघडता येईल एवढाच कापा. कुकरामध्ये भाजी शिजली की थोडी गार व्हायची वाट पाहा. कोमट झाल्यावर मग त्यामध्ये काम करायला लागा. मोठय़ा भांडय़ामध्ये आपल्या मापाने पॅटीकरता सारं साहित्य घ्या आणि हाताने कालवून किंवा पावभाजीच्या मॅशरच्या साहाय्याने एकजीव करून घ्या. हे मिश्रण मऊ लाडूसारखा गोळा करता येईल एवढं घट्ट हवं. फारच लुसलुशीत झालं असेल तर त्यामध्ये मिळून येण्याकरता थोडा मदा घालून चांगलं मिसळून घ्या. आता शेगडीवर तवा तापत ठेवून त्यावर तेल किंवा लोण्याचा हलकासा थर द्या. कंदाच्या उकडलेल्या मिश्रणाचा मोठासा गोळा करून, हलक्या हाताने दाबून त्याची पॅटी तयार करा. ती रव्याच्या मसाल्याच्या मिश्रणामध्ये बुडवून, दोन्ही बाजूने त्यावर रव्याच्या मसाल्याचं मिश्रण लावून हलक्या हाताने किंवा उलथण्यावरच घेऊन तव्यावर ठेवा. मध्यम आचेवर दोन्हीकडून खरपूस होईतोवर भाजून घ्या. एकेका वेळी दोन किंवा तवा मोठा असल्यास चार पॅटी तयार होतील. माझा तर ताबाच राहत नाही. मी एखादी खरपूस पॅटी तशीच खाऊन टाकतो. आता पॅटी तयार झाल्यावर त्याच तव्यावर पाव भाजून घ्या. साधारण खरपूस असा आतून भाजला गेला की तव्यावरून खाली घ्या. तव्यावरून खाली घेतल्यावर पॅटी आणि भाजलेल्या पावावर हवं तेवढं लोणी लावून घ्या. आता कांदा-टोमॅटो-काकडीच्या कापांवर चाट मसाला टाकून त्यांना मिसळा. पावामध्ये प्रथम हे चाट मसाल्याने चविष्ट झालेले काप ठेवा. त्यावर खरपूस आणि गरमागरम पॅटी ठेवा. त्यावर पुदिन्याची एक-दोन पानं ठेवा. पाव बंद करा आणि यथेच्छ ताव मारा. बटाटय़ापेक्षा सुरणाची चव फारशी वेगळी नसते. मात्र त्यात जीवनसत्त्वं खूपच जास्त असतात. जांभळा कंद आणि आरबी जरा बुळबुळीत असले तरी त्याची पॅटी केली की चवीला छान लागतात. जाता जाता मी रताळ्यासोबत केलेला प्रयोगही सांगतो. उकडलेल्या रताळ्याची पेटी करताना त्यात चवीनुसार चमचाभर मध किंवा गूळ घालायचा. न घातला तरी छान लागतो. ही पॅटी, सोबत बदाम-पिस्ता-काजूचे काप, आणि मध यांनी सजवलेलं डेझर्ट कमालच दिसतं. व्हॅनिला आइसक्रीमसोबत झक्कास लागतं. शिवाय या जिनसा पावामध्ये घातल्या की गोड बर्गर तयार! आहे की नाही आयडियेची भन्नाट कल्पना? बटाटा सोडून जरा आपल्या या भाज्यांशी दोस्ती करायची तर त्यांना या नव्या रूपात एकदा खाऊन पाहा. contact@ascharya.co.in