‘मनूची आजी आणि तातू दोन-तीन दिवस काही कामासाठी बाहेरगावी जाणार आहेत. तेव्हा तिला सांभाळायला तू इकडे येशील का?’ असा मनूच्या आईचा फोन आला की ठाण्याच्या आजीला आनंद तर होतोच; पण त्याचबरोबर तिच्या पोटात भीतीचा गोळाही उभा राहतो. याचं कारण- तीन तासांच्या शाळेतून दुपारी १२ लाच घरी येणाऱ्या या मुलीचा संध्याकाळपर्यंतचा वेळ आनंदात कसा घालवायचा, हा आजीपुढचा यक्षप्रश्न!
मात्र, एक दिवस हा प्रश्न मनूनेच सोडवला. त्याचीच ही गोष्ट! तिने व आजीने बुक डेपोतून आणलेल्या मराठी गोष्टींच्या ढीगभर पुस्तकांपैकी ‘कृष्णलीला’ हे चित्रकथेचं पुस्तक तिचं सगळ्यात आवडतं. त्यातील सगळ्या गोष्टी तिच्या तोंडपाठ झाल्या होत्या. त्यादिवशीदेखील तेच पुस्तक घेऊन बसली होती स्वारी. चाळता चाळता उत्तेजित स्वरात एकदम ओरडली, ‘‘आजी, आपण नाटक-नाटक खेळायचं का?’’
‘‘म्हणजे?’’ आजीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.
‘‘म्हणजे कृष्णबाप्पाच्या जन्माची गोष्ट आहे ना या पुस्तकात, त्या गोष्टीचं आपण नाटक करायचं.’’ मनूने आजीला समजावलं.
‘‘पण घरात तर आपण दोघीच आहोत. आणि या कथेत तर कितीतरी पात्रं आहेत!’’ आजी गोंधळलेली.
‘‘अगं, आपण आलटूनपालटून वेगवेगळे रोल करायचे.’’ मनूने चुटकीसशी प्रश्न सोडवला.
लगोलग भूमिकांची वाटणी झाली. देवकी, वसुदेव, यशोदा, जगन्माता (यशोदेच्या मुलीला गरगर फिरवल्यावर प्रकटणारी देवी) हे रोल मनूने आपल्याकेडे घेतले. तर कंस, तुरुंगाबाहेरचे पहारेकरी, गोकुळातले गोप-गोपी या भूमिका आजीच्या वाटय़ाला आल्या. कृष्णबाप्पासाठी मनूच्या प्राणप्रिय ‘पू’ची (सॉफ्ट टॉय) निवड होणार हे उघड होतं. यशोदेच्या बालिकेसाठी बार्बी डॉलचा नंबर लागला.
पात्रनिवडीनंतर नेपथ्याची जुळवाजुळव झाली. हॉलमधील सेंटर टेबलच्या चार पायांभोवती काळी ओढणी बांधून मथुरेचा तुरुंग तयार झाला. कृष्णबाप्पाला ज्यातून न्यायचं ती टोपली मऊशार नॅपकिन पांघरून सजली. बेडरूमला गोकुळचा दर्जा बहाल करण्यात आला. मथुरेपासून गोकुळापर्यंत दुथडी भरून वाहणारी यमुना नदी आईच्या चार-पाच ओढण्यांच्या रूपात प्रकटली. मनूच्या गेल्या वर्षीच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी बाबांनी बनवलेला मुकुट देवीच्या कामी आला. कृष्णजन्माची वार्ता कळल्यावर गोकुळातील गोप-गोपींचे तोंड गोड करण्यासाठी एका वाटीत कॅडबरीचे तुकडेदेखील भरून झाले. ‘पू’च्या डोक्याला रबरबॅन्डने मोरपीस बांधल्याने तोही साजिरा गोजिरा दिसायला लागला.
सगळी तयारी झाल्यावर देवकी आपल्या फ्रॉकच्या आत कृष्णबाप्पाला घेऊन टेबलाखालच्या तुरुंगात शिरली आणि त्या एवढय़ाशा जागेत मुटकुळं करून झोपली. बाहेर आजी नामक पहारेकरी घोरायला लागला. इतक्यात देवकीची बाहेर एंट्री..
‘‘आजी, कृष्णबाप्पा पोटात असतानाच त्याच्या डोक्यावर मोरपीस होतं का गं?’’ त्या चिमुकल्या मेंदूतून निघालेल्या या प्रश्नाने आजी चकितच झाली. म्हणाली, ‘‘खरंच, हे माझ्या लक्षातच नाही आलं. आत्ता काढून ठेव ते. मग आपण टोपलीत ठेवताना त्याला बांधू या हं.’’
‘‘आपण नाही. मी. तू पहारेकरी आहेस ना! तू त्यावेळेला गाढ झोपेत असणार.’’ मनूने आजीला निरुत्तर केलं.
पहारेकऱ्याने मान हलवून पुन्हा डोळे मिटले. घडाळ्याचा मुद्दाम जवळ आणून ठेवलेला काटा बारावर गेला आणि कृष्णजन्म झाला. त्यानंतर शर्ट-पॅन्ट घालून देवकीचं वसुदेवात रूपांतर.. वसुदेवाचा कृष्णाला डोक्यावर घेऊन यमुनेच्या पाण्यातून गोकुळापर्यंतचा प्रवास.. नंद यशोदेच्या घरी पोहोचल्यावर बाळांची अदलाबदल.. अशा सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे पार पडल्या.
आता कंसाचा रोल निभावण्याची आजीची पाळी होती. मनूने आजीच्या कानात डायलॉग सांगितला. आणि यशोदेच्या बाळाला- म्हणजे बार्बी गर्लला गरागरा फिरवत कंसाने गर्जना केली.. ‘‘देवकी, तुझं हे आठवं अपत्य. बस्स! मग ते कोणी असो.. मुलगा किंवा मुलगी.. मी त्याला यमसदनाला पाठवणारच!’’
एव्हाना डोक्यावर मुकुट परिधान करून जगन्माता सोफ्यावर चढली होती. ती गरजली, ‘‘अरे पाप्या, तुझ्या पापाचा घडा आता भरलाय. तुझा कर्दनकाळ तर या जगात केव्हाच अवतरलाय.’’
या आवेशपूर्ण संवादफेकीनंतर देवीची झेप थेट कोपऱ्यात ठेवलेल्या कॅडबरीच्या वाटीच्या दिशेने. मटामट कॅडबरी मटकावणाऱ्या मनूकडे पाहत आजी म्हणाली, ‘‘काय गं, संपलं वाटतं तुझं नाटक!’’
‘‘हो. ‘कृष्णलीला- भाग एक’ समाप्त. आता उद्या ‘भक्त प्रल्हाद’!’’
‘पू’ ला कॅटबरी भरवता भरवता मनूचं उत्तर.
‘‘झालं ना तुझ्या मनासारखं? मग आता पहिल्यांदा दोन्ही खोल्यांतला पसारा आवरायचा.’’ आजीने मनूला जमिनीवर आणलं.
‘‘प्लीज आजी, तू आवर ना! मला आईने काढून ठेवलेल्या वर्कशीट्स सोडवायच्या आहेत.’’ ..मनूची मखलाशी.
‘‘ते काही नाही. तुला खेळायचं होतं म्हणून या सगळ्या वस्तू आपण बाहेर काढल्या की नाही! आता आधी सर्व गोष्टी जागच्या जागी आणि मगच अभ्यास. नाहीतर नाटक-नाटक खेळ बंद.’’ आजीने तंबी दिली.
ही मात्रा मात्र बरोबर लागू पडली. मग जास्त पसाऱ्याची खोली आजीने आवरायची आणि कमीवाली मनूने असा तह होऊन घर नीटनेटकं झालं.
‘‘आजी गं, ऐकलं ना मी तुझं, मग उद्या करू या ना- भक्त प्रल्हाद.’’ आजीच्या मांडीत बसून मनूची लाडीगोडी सुरू झाली.
‘‘हो रे माझ्या राजा. नक्की करू.’’ मनूचा पापा घेत आजी समाधानाने म्हणाली. तिच्यापुढचं अवघड काम मनूने सोप्पं करून टाकलं होतं.
wagledampada@gmail.com
संपदा वागळे