विशाल पोतदार
गुट्टू नावाची एक खार होती. लांब पल्लेदार मिशा, नेहमी वळवळ करणारी झुबकेदार शेपटी आणि पाठीवरचे तीन पट्टे यामुळे ती एकदम गोड दिसायची. तशी ती पूर्ण रानाचीच राजकन्या असल्याप्रमाणे झाडे, वेली, प्राणी आणि पक्षी सर्वाची लाडकी होती. गुट्टू फांदीवर आली की झाडे आपल्या फुलांनी तिला गोंजारत, तर वेली तिला झोका खेळायला देत. इतकं सगळं छान असलं तरी गुट्टू मात्र कमालीची भित्री भागूबाई होती. कुठेही थोडं जरी खुट्ट झालं तरी हातातलं काम सोडून ती क्षणार्धात लपून बसे.
एकदा काय झालं- बेक्या नावाचं माकड कुठून तरी मोठालं कलिंगड घेऊन आलं. त्यानं कलिंगड फोडून त्याचे दोन भाग केले आणि जोरदार शिट्टी वाजवून गुट्टूला आरोळी दिली. गुट्टूनं बेक्याचा आवाज ऐकला आणि त्यानं काहीतरी खाऊ आणला असणार या खुशीत तुरुतुरु पळत आली. तिला तो कलिंगडाचा लालभडक गोड गर जाम आवडल्यानं तिनं तो अगदी नॉनस्टॉप खाल्ला. गपागपा खाल्ल्यानं तिला दम लागला आणि पोटही टम्म फुगलं. ती त्या अर्ध्या पोकळ झालेल्या कलिंगडात जाऊन डोळे मिटून लोळू लागली. अहाहाहा.. गुट्टूला भर उन्हातही एकदम गारेगार वाटू लागलं! बसून बसून दोघांना आता कंटाळा येऊ लागला होता, इतक्यात गुट्टूला काहीतरी कल्पना सुचली.
‘‘बेक्या, मला या कलिंगडासोबत ढकलत ने ना.. मज्जा येईल बघ.’’ बेक्यालाही काहीतरी नवीन खेळ मिळाला आणि तो त्या कलिंगडाला घसरत पुढे नेऊ लागला. गुट्टूला जाम मजा वाटू लागली. ती आता कलिंगडाच्या पुढे उभे राहून ‘‘अजून जोरात.. अजून जोरात..’’ अशी ओरडू लागली. ढकलता ढकलता आता कलिंगड वेगवान झालं. इतक्यात ते नदीसमोरच्या उतारावर आलं. त्यानं वेग कमी करायचा प्रयत्न करता करता ते कलिंगड हातातून सुटलं आणि बेक्याही घसरून पडला. आता ते कलिंगड सुर्रसुर्र करत नदीच्या दिशेनं निघालं आणि काही क्षणापूर्वी मजेत असणारी गुट्टू आता घाबरीघुबरी झाली. बघता बघता ते कलिंगड नदीच्या पाण्यात उतरलं. गुट्टूनं मागे वळून पाहिलं तर बेक्या घाबरून ओरडत होता. तिचं घर, ते रान, झाडं, तिचे मित्र.. सगळं काही लांब लांब जात होतं. आता ती आपण जगू की नाही, या विचाराने घाबरून पार रडवेली झाली होती.
कलिंगड हलतडुलत तरंगत गुट्टूला घेऊन चाललं होतं. आता कलिंगडाची नाव नदीपात्राच्या मध्यावर आली. गुट्टूने डोळे उघडून आसपास पाहिलं तर तिला फक्त पाणीच पाणी दिसत होतं. नदीचं पात्र मोठालं असल्यानं नदी तशी संथच वाहत होती. गुट्टूला एवढय़ा वेळात समजलं की कलिंगड तरंगत असल्यानं ते बुडणार तर नाहीये.
काळजी करून, विचार करून दमल्यानं तिला आता पुन्हा भूकही लागली. नदीच्या मध्यावर तिला कसलं खायला मिळणार होतं म्हणा? पण खाऊ तर तिच्या जवळच होता. कलिंगडाचा थोडा गर शिल्लक राहिला होता. तिनं तो गर खायला सुरुवात केली आणि भुकेपोटी तो पूर्ण आरपार बीळ पडेपर्यंत संपवला.
आता झाली का पंचाईत! त्या बिळातून पाणी आत येऊ लागलं आणि तिला आपली नाव बुडणार हे जाणवलं. पटकन् तिनं त्या बिळावरच बसकण मारली आणि पाणी आत येण्यापासून रोखलं. गुट्टूला कळून चुकलं- आता घाबरण्यापेक्षा धैर्यानं परिस्थितीचा सामना करण्यातच शहाणपणा आहे.
तात्पुरतं संकट टळलं खरं; पण आता पुढे काय? काही वेळ तिचा नदीतला प्रवास सुरू राहिला. तिची नाव वळणं वळणं घेत मोठय़ा डौलात चालली होती. इतक्यात तिला एक डौलदार बदक मासे पकडताना दिसलं. तिनं बदकाला साद घातली; परंतु त्याची नजर काही माशांच्या नादात इकडेतिकडे जात नव्हती. त्या बदकानं चोचीत मासा पकडलेला असतानाच गुट्टूनं जिवाच्या आकांतानं आरोळी ठोकली. त्यामुळे दचकून बदकाच्या चोचीतून मासा पुन्हा पाण्यात पडला. संकटातून वाचलेल्या माशानं बदकाला वाकुल्या दाखवत पाण्यात बुडी मारली. आपल्या तोंडचा घास घालवणाऱ्या त्या खारीचा बदकाला इतका राग आला, की वाईट तोंड करून तिला बडबडण्याकरता तो तिच्याकडे येऊ लागला. पण जवळ आल्यावर खारूताईची अगतिकता बदकाला जाणवली. आपल्या खाण्यापेक्षा तिचा जीव महत्त्वाचा आहे हे
त्याला कळलं. बदकाला दया आली आणि त्यानं जोर लावून ते कलिंगड ढकलायला सुरुवात केली. इतक्यात जोरदार वारे वाहू लागले आणि नाव मागे रेटली जाऊ लागली. बदकाचे खारूताईला वाचवायचे प्रयत्न पाहून तो (वाचलेला) मासाही तिथे आला आणि तोही कलिंगड ढकलू लागला. वारे असले तरी कलिंगड काठाकडे पुढं पुढं जात होतं. तोपर्यंत बेक्यानेही दंगा करून सर्व दोस्तांना नदीकाठी बोलवलं होतं. बदक आणि माशानं पराकाष्ठा करून एकदाचं ते कलिंगड काठावर आणलं. तशी गुट्टू पटकन् उडी घेऊन बेक्याच्या खांद्यावर जाऊन बसली.
बदक आणि मासा दोघंही एकमेकांचे शत्रू असूनही एकत्र काम केल्यानं जिंकल्याच्या आनंदात होते. इकडे सर्वानी जल्लोष सुरू केला आणि त्याचबरोबर गुट्टूची फजिती ऐकून सगळी माकडं पोट धरून हसत सुटली. बेक्या मात्र गुट्टूच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी पहिल्यांदाच आत्मविश्वास पाहून मनोमन सुखावत होता.
vishal6245@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2022 रोजी प्रकाशित
कलिंगडाची नाव
गुट्टू नावाची एक खार होती. लांब पल्लेदार मिशा, नेहमी वळवळ करणारी झुबकेदार शेपटी आणि पाठीवरचे तीन पट्टे यामुळे ती एकदम गोड दिसायची.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-04-2022 at 00:06 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Name watermelon squirrel guttu rana princess forest amy