ढगांचा गडगडाट ऐकला आणि नानेटी (एक छोटासा बिनविषारी साप) घाबरली. तिची पिल्ले आताच तर मोठी झाली होती. आता जर पाऊस सुरू झाला तर आपले बीळ पाण्याने भरेल आणि मग आपल्याला पिल्ले घेऊन बाहेर पडावे लागेल, हे तिला माहीत होते. दोन-तीन दिवस बरे गेले. थोडा पाऊस पडला. पण पाणी बिळापर्यंत आले नाही. तरी तिने आपल्या पिल्लांना तयार करायला घेतले. ‘‘हे बघा बाळांनो, उद्या-परवा आपल्याला कधीतरी हे घर सोडावे लागेल. तेव्हा लक्षात ठेवा, माझ्या मागोमाग चालायचे. इथे-तिथे पाहायचे नाही. वळायचे नाही. थांबायचे नाही. सगळीकडे धोके असतात म्हणून काळजी घ्यायची.’’ सगळ्या पिल्लांनी जोरात डोके हलवून ‘‘हो ऽऽ’’ म्हटले.
दुसऱ्या दिवशीच जोराचा पाऊस सुरू झाला. पूर्ण दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट चालू होता. पिल्ले घाबरून नानेटीच्या अंगाशी गुंडाळी करून चिकटली होती. सकाळ झाली आणि नानेटीने बीळ सोडण्याची तयारी सुरू केली. प्रेमाने पिल्लांच्या अंगावरून जीभ फिरवली. बाहेर पडल्यावर आपली किती पिल्ले वाचतील याची तिला चिंता लागली होती. ती पिल्लांना म्हणाली, ‘‘चला, माझ्या मागोमाग या.’’ सगळी पिल्ले तिच्या मागे निघाली.
बिळाच्या बाहेर आल्यावर पिल्लांना मजा वाटली. एवढा प्रकाश त्यांनी अजून पाहिला नव्हता. वेगवेगळी झाडे, फुले, माणसे. ‘‘अरे बापरे! ही तर जादुई नगरी वाटते.’’ पिल्लांच्या मनात आले. रांगेने चालणाऱ्या पिल्लांमधील शेवटचे पिल्लू तर फारच उत्साहित झाले होते. अधूनमधून थांबत, डोके उंचावून ते इथे-तिथे पाहत होते. नानेटी मधेमधे मागे वळून सगळी पिल्लं मागोमाग येताहेत की नाही, पाहत होती. त्यांना धाक घालत होती- बरोबर चालायला.
थोडे अंतर चालल्यावर एका ठिकाणी छोटी मुले खेळत होती. शेवटचे पिल्लू तेथे थबकून पाहू लागले. ती लहान मुले पावसाच्या पाण्यात होडय़ा करून सोडत होती.पाण्याबरोबर होडी गेली की आनंदाने टाळ्या पिटत होती. ते पाहून पिल्लालादेखील मजा वाटली. तेही डोके हलवून नाचू लागले आणि थोडे पुढे सरकले. इतक्यात एका मुलाचे लक्ष त्याच्याकडे गेले. तो मुलगा जोरात ओरडला, ‘‘साप-साप.’’ आणि सगळी मुले ‘‘बाबा! बाबा! साप!’’ असे ओरडत घराकडे धावली. पिल्लाला अचंबा वाटला. ‘‘अरे, ही मुले तर मला घाबरली!’’ त्याला आनंद वाटला. उगाच आई आपल्याला भीती घालत होती. हे लोक तर आपल्याला घाबरतात. ते आनंदाने डोलायला लागले. पण थोडय़ाच वेळात मुलांबरोबर त्यांचे बाबा हातात काठय़ा घेऊन आले. ‘‘कुठे आहे साप?’’ म्हणत ते सापाला शोधू लागले. काठय़ा पाहिल्यावर पिल्लू घाबरले. ते इथे-तिथे पाहू लागले, पण तेथे लपायला जागा नव्हती. तेवढय़ात एका बाबांचे लक्ष पिल्लाकडे गेले. ‘‘अरे, हे तर नानेटे! याला काय मारायचे! जाऊ दे रे त्याला,’’ असे म्हणत सगळे त्याला सोडून निघून गेले.
‘‘हुश्श!’’ पिल्लाने नि:श्वास टाकला. ते पुढे सरकले; पण दूर दूर त्याला आई आणि भावंडे दिसेनात. ते सगळे बरेच पुढे गेले होते. धापा टाकत, जोरजोरात सरपटत पिल्लू पुढे जायला लागले. एवढय़ात पिल्लावर एक मोठी सावली पडली. त्याने वर पाहिले. आकाशात घार घिरटय़ा घालत होती. ते बिचकले. आता आपले काही खरे नाही. पिल्लू समजून चुकले. घारीने झडप घातली आणि पटकन दोन्ही पायांत पिल्लाला उचलले. हवेत तरंगताना पिल्लाने डोळे मिटले. त्याला डोळ्यासमोर आई दिसू लागली. सारखी समजावयाची, ‘इथे-तिथे वळू नका, थांबू नका.’ त्याला रडायला यायला लागले. आता आपल्याला आई आणि भावंडे कधीच भेटणार नाहीत. डोळ्यातल्या पाण्यामुळे त्याला दिसेनासे झाले.
इतक्यात कसे कुणास ठाऊक, घारीची पकड सैल झाली आणि पिल्लू जमिनीवर धापदिशी पडले.  त्याला थोडे लागले, पण ते पटदिशी एका छोटय़ा झाडात लपले. घारीने थोडा वेळ तेथे त्याला शोधायला घिरटय़ा घातल्या आणि मग ती निघून गेली.
पिल्लू विचार करायला लागले, ‘‘आता काय करायचे?’’ तेवढय़ात बाजूला सळसळ झाली. पाहतो तो काय! त्याची आई आणि भावंडे घारीला पाहून तेथेच लपली होती. पिल्लाने आनंदाने सरपटत जाऊन आईला वेंग मारली आणि म्हणालं, ‘‘आता मी नेहमी तुझे ऐकेन. तुला कधी सोडून जाणार नाही.’’
आईने त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाली, ‘‘बाळा, मोठी माणसं नेहमी मुलांच्या भल्यासाठी सांगतात. म्हणून त्यांचं म्हणणं ऐकायचं असतं. आता तू वाचलास, पण पुढे लक्षात ठेव.’’
..आणि मग सगळी परत आनंदाने पुढच्या प्रवासाला निघाली.