कौरव-पांडव युद्ध टाळण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न जर कोणी केले असतील तर ते श्रीकृष्णाने. त्याने हरप्रकारे दुर्योधनाचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तो स्वत: हस्तिनापूरला गेला. कृष्णाने पुढाकार घेऊन समेट करावा यासाठी पांडवांनी विरोध केला. ते म्हणाले, ‘‘कृष्णा, आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तू आपला अपमान करून घेऊ नकोस. तो दुर्योधन तुला अजिबात बधणार नाही.‘‘ त्यावर कृष्ण म्हणाला, ‘‘हे सगळे मी तुमच्यासाठी करत नाही. लोककल्याण व न्यायासाठी करतो आहे. त्यासाठी मी मानापमानाची चाड बाळगत नाही.’’
आणि खरेच, श्रीकृष्ण स्वत: कौरवसभेत गेला. तिथे त्याने पांडवांना अध्रे राज्य देण्याची विनंती केली. तो धृतराष्ट्राला म्हणाला, ‘‘कुल राखायचे असेल तर एका कुपुरुषाचा त्याग करावा लागतो, गाव राखण्यासाठी एका कुळाचा त्याग करावा लागतो, देशहितासाठी एका गावावर पाणी सोडावे लागते, मात्र आत्मकल्याणासाठी सर्व पृथ्वीचा त्याग करावा लागतो. तेव्हा हे राजा, तू प्रथम दुर्योधनाला आवर आणि पांडवांशी सख्य कर. त्याच्या हट्टापायी सर्व कौरवकुलाचा नाश होऊ देऊ नकोस.’’ या कृष्णाच्या म्हणण्याला कण्व व नारद मुनींनी जोरदार पाठिंबा दिला, पण दुर्योधन ताडकन उठून म्हणाला, ‘‘हे कृष्णा, पांडवांना अध्रे राज्यच काय, पाच गावेच काय, पण सुईच्या अग्रावर राहील एवढी भूमीसुद्धा आम्ही देणार नाही.’’  हे ऐकल्यावर श्रीकृष्णाला मनातल्या मनात उमजले की आता युद्धाला पर्याय नाही. दुर्योधनादी कौरवांची दर्पोक्ती ऐकून त्याने शेवटचा इशारा दिला, ‘‘जर पांडवांना तुम्ही कोणताही वाटा देणार नसाल तर कुलक्षयाला तयार राहा.’’
ज्याप्रमाणे कृष्णाने स्वत:हून सामोपचाराचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे एखाद्या समस्येत तोडगा काढण्यासाठी कोणी त्रयस्थ स्वत:हून पुढे सरसावला तर त्याला ‘कृष्णशिष्टाई’ची उपमा देण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of lord krishna
First published on: 02-06-2013 at 12:30 IST