श्रीनिवास बाळकृष्ण

मी तुला इतकं ‘मित्रा.. मित्रा’ करतो आणि तू मला एक फ्रेंडशिप बँडपण नाही बांधलास ना? मी तुझ्यावर नाराज आहे. या नाराजीवरून पोटलीबाबाला आठवलं की, ‘ए अ‍ॅण्ड ए बुक्स’ प्रकाशनाचे ‘दोस्ती आणि दुश्मन’वर एक आगळंवेगळं हिंदी पुस्तक आहे. केया, बेंदिक आणि ट्रन्ड ब्रॅंन्ने या नॉर्वेतल्या तीन लेखकांनी मिळून रचलेली गोष्ट.

चिमणी, कोंबडा, घोडा, डुक्कर आणि ससा  पाच जणांची दोस्ती असते. एका साध्या कारणावरून त्यांच्यात राडा होतो. मॅटर थोडक्यात सांगतो.. चिमणीला तिचं घरटं रिनोवेट करायचं असतं. त्यासाठी ती काही वेळासाठी फांद्या झाडाखाली ठेवते. कोंबडय़ाला फांदी दिसते आणि काहीतरी कामाला येईल म्हणून तो ती उचलतो. पुढे ‘फुकट तिथं प्रकट’ अशा वृत्तीचे घोडा, डुक्कर, ससा एकामागोमाग येत जातात. काहीतरी कामाला येईल म्हणून फांदी प्रत्येकाकडून नकळत ढापली जाते. आणि पुढे मग सर्वच त्या फांदीचोराचा शोध घेतात. वास्तविक चोर वेगळा असा कुणी नसतोच. सर्वच असतात. हे आपल्याला कळतं; पण या प्राण्यांना नाही. आणि शेवटी पाचही जण भांडणात फांदीचे आणि मैत्रीचे तुकडे करतात.

हेही वाचा >>> पोटलीबाबा : या टोपीखाली..

यातला एकही प्राणी या पोटलीबाबासारखा शांत, संयमी, प्रेमळ, सज्जन नाही. सर्वच भांडकुदळ, रागीट, संशयी, उचलेगिरी करून स्वत:चा फायदा बघणारे. त्यामुळेच की काय, या पुस्तकातले प्राणी जगावेगळे चितारले गेलेत. प्राण्यांचे असे विचित्र चित्रण मी आजवर पाहिलं नव्हतं.

काळ्या शाई पेनचा यथेच्छ धुडगूस घातलाय. अक्षरश: घासला आहे. थोडेफार पाणचट रंग वापरलेत.

आता हा ससा तर पाहा.. हॉरर फिल्ममध्येही इतका भयानक ससा नसेल. आणि घोडा..? असा घोडा मी दुसरीला असतानाही काढला नव्हता. डुकराच्या नाकाला इतकं लोंबवायला काय झालं? त्याचा काय गणपती करायचा आहे का? चिमणी काढलीये की काळा बगळा? नकोच काही बोलायला! हा चित्रकार माझ्या शाळेत असता तर नक्कीच चित्रकलेत नापास झाला असता. चित्रकार पेर दिब्विगने असे प्राणी का काढले असतील? त्याला तुझ्यासारखे छान छान प्राणी काढताच येत नसतील का? रागा-भांडणात आपले चेहरेही असेच विचित्र होत असतात?

हेही वाचा >>> पोटलीबाबा : सशाने मारली उडी..

आपलं मन निर्मळ नसल्यावर आपला चेहरा असाच दिसतो का? की असं ‘दिसलं की ढापलं’वाले असे दिसतात? (यापुढे मी तरी अशा कुणाच्याही कुठल्याही वस्तू उचलणार नाही रे बाबा. असो.)

चित्रकार पेर माझा मित्र नसल्याने मी काही त्याला फोन करून विचारू शकत नाही. पण तू या चित्रशैलीचा विचार करू शकतोस. उत्तर मिळालं तर मलाही पाठव.

shriba29@gmail.com