१९९० पूर्वी भारतीय उपखंडात सर्वात जास्त संख्येने दिसणाऱ्या काही पक्ष्यांपैकी एक म्हणजे गिधाड. एकेकाळी यांची संख्या एक कोटींपेक्षा जास्त होती. पण आज फक्त एक टक्का गिधाडेच शिल्लक असावीत असा अंदाज आहे. त्यामुळे या पक्ष्याला अतिसंकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत टाकण्यात आले आहे.
आक्र्टिक, अंटाक्र्टिका आणि सहाराचे अति शुष्क प्रदेश सोडल्यास गिधाडे जगात सर्वत्र सापडतात. यांचे दोन गट आहेत. नव्या जगातील गिधाडे (उत्तर आणि दक्षिण अमेरिका) आणि जुन्या जगातील गिधाडे (आशिया, आफ्रिका आणि युरोप). जगातील सर्वात मोठे गिधाड म्हणजे जटायू (The Lammergeier) आणि सर्वात लहान आहे- सर्वाशनी (Egyptian Vulture). जगात गिधाडांच्या सुमारे २३ जाती सापडतात. यांपैकी सुमारे नऊ जाती भारतात सापडतात. भारतातील नऊ जातींपैकी चार जाती अतिसंकटग्रस्त गटात मोडतात. त्यात पांढर पाठ गिधाड (White-rumped Vulture Gyps bengalensis), भारतीय  गिधाड (Indian Vulture Gyps indicus), निमुळत्या चोचीचे गिधाड आणि लाल डोक्याचे गिधाड यांचा समावेश आहे. आज आपण गिधाडांच्या दोन जातींची माहिती घेणार आहोत- पांढर पाठ गिधाड आणि भारतीय गिधाड.
पांढर पाठ गिधाड हे भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र सापडतं. याचे वास्तव्य मुख्यत: सपाट मैदानी भागात असते. हे कत्तलखाने, कचरा डेपो किंवा गावाबाहेरची मोठी झाडे येथे आढळतात. हे १५-२० च्या छोटय़ा थव्यात राहतात आणि इतर गिधाडांच्या जातींसोबत अन्न शोधतात. यांचा विणीचा हंगाम प्रामुख्याने ऑक्टोबर ते मार्च यादरम्यान असतो. ही गिधाडे वड, पिंपळ, शिसम, नारळ अशा मोठय़ा आणि उंच झाडांवर जमिनीपासून सुमारे ५०-६० फूट उंचीवर घरटी बांधतात. एकच घरटे ते वर्षांनुवर्षे वापरतात.
भारतीय गिधाड साधारणत: गंगा नदीच्या दक्षिणेस सापडते. याचा प्रमुख वावर राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात आहे. ही गिधाडे २०-३० च्या थव्यात राहतात आणि इतर गिधाडांसोबत अन्न शोधतात. यांचा विणीचा हंगाम नोव्हेंबर ते मार्च यादरम्यान असतो. यांचे वैशिष्टय़ म्हणजे ही उंच कडय़ाकपारीतच घरटी करतात. या घरटय़ांच्या जागा पिढय़ान् पिढय़ा वापरल्या जातात.
सर्वच गिधाडांचे मुख्य अन्न म्हणजे मेलेले प्राणी. आणि म्हणूनच यांना निसर्गातील सफाई कामगार समजले जाते. पण हेच अन्न त्यांच्या संकटग्रस्त होण्यामागचे प्रमुख कारण बनले आहे.
१९९० च्या दशकात असे आढळले की, गिधाडे मोठय़ा प्रमाणात मरत आहेत. यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या मते, जनावरांना देण्यात येणारे वेदनाशामक औषध ‘डायक्लोफेनाक सोडियम’, हे यामागचे प्रमुख कारण आहे. हे औषध सहजपणे उपलब्ध असल्यामुळे जनावरांच्या आजारात सर्वप्रथम हेच दिले जाते. ते जनावरांची मूत्रपिंड आणि यकृत यामध्ये बरेच दिवस साठून राहते. असे आजारी जनावर मरते तेव्हा त्यांचे कातडे काढून त्याला उघडय़ावर फेकले जाते. अशी मेलेली जनावरे गिधाडे खातात आणि त्यांच्या शरीरात साठलेले औषध गिधाडांचा कर्दनकाळ ठरते. हे औषध गिधाडांचे मूत्रपिंड निकामी करते आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो. डायक्लोफेनाक हे त्यांची संख्या कमी होण्यामागचे तात्कालिक आणि प्रमुख कारण होते. पण यासोबतच अन्य अनेक गोष्टीही यांची संख्या कमी करण्यास कारणीभूत होत्या. यातील दुसरे कारण म्हणजे कमी झालेला अन्नाचा पुरवठा. गिधाडे कमी झाल्याने प्राण्यांचे मृतदेह पडून रोगराई पसरण्याची शक्यता वाढली; त्यामुळे लोकांनी जनावरे पुरायला सुरुवात केली. याचा परिणाम म्हणजे शिल्लक राहिलेल्या गिधाडांवर उपासमारीचे संकट ओढवले. त्यामुळे उपाशी आणि कमजोर गिधाडे कमी होत गेली. त्याचबरोबर पक्ष्यांना होणारा मलेरिया, घरटी असलेल्या झाडांची विकासकामांसाठी होणारी तोड, विजेच्या तारांनी आणि पतंगाच्या मांजामुळे होणारे मृत्यू अशा अनेक गोष्टींनी एकाच वेळी त्यांच्यावर परिणाम केला.
या कठीणसमयी गिधाडांच्या संवर्धनासाठी एक मोठी मोहीम चालू केली गेली. याचा पहिला टप्पा म्हणून भारत सरकारने जनावरांच्या डायक्लोफेनाक औषधावर बंदी घातली. दुसरा टप्पा म्हणजे संवर्धनासाठी त्यांचे बंदिस्त प्रजनन. भारतात हरियाणा, पश्चिम बंगाल आणि आसाम येथे हे संवर्धन आणि बंदिस्त प्रजननाचे प्रकल्प चालू केले गेले. याचसोबत काही ठिकाणी गिधाडांना डायक्लोफेनाकविरहित अन्न पुरविण्याचे प्रकल्पही सुरू आहेत. त्याचसोबत पशूपालकांची डायक्लोफेनाक न वापरण्याबाबत जनजागृती, घरटय़ांचे संरक्षण अशा गोष्टीही चालू आहेत. कधीकाळी कोटींच्या संख्येत असणाऱ्या या पक्ष्याला वाचविण्यासाठी कसून प्रयत्न करण्याची गरज आहे.    
(छायाचित्रे – आदित्य रॉय)