गेल्या दोन-तीन दशकांत शिक्षणाचे अक्षरश: बाजारीकरण झाले. ‘कॉन्व्हेंट’ संस्कृती रुजली.  इंग्रजी माध्यमाचे शिक्षण म्हणजे नफ्याचा धंदा हा दृष्टिकोन निर्माण झाला आणि अनेक नेते-पुढाऱ्यांनी या धंद्यात उडी घेऊन ‘शिक्षणसम्राट’ होण्याचे स्वप्न साकारून घेतले. शिक्षणाचे असे बाजारीकरण सुरू असताना वऱ्हाडातील अकोल्यात मात्र आधुनिक शिक्षणाला पारंपरिकतेची जोड देण्याचा आगळावेगळा प्रयोग सुरू झाला होता. अकोट येथील डॉ. गजानन नारे यांनी शिक्षणपद्धतीत बदल घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. ग्रामीण भागातील सामान्य विद्यार्थीही स्पध्रेच्या या युगात अव्वल ठरावेत यासाठी प्रचलित रटाळ शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करून माफक शुल्कात विद्यार्थ्यांना सर्वागीण शिक्षण देता यावे, या ध्येयाने झपाटलेल्या डॉ. नारे यांनी १२ वर्षांपूर्वी परिवर्तनाच्या या लढाईचा श्रीगणेशा केला. कोणताही बदल सहजासहजी होत नाही. त्यासाठी प्रखर विरोधाचा सामनाही करावा लागतो. डॉ. नारे यांच्या वाटेतही असेच काटे येत गेले. मात्र, त्यांनी जराही न डगमगता आपल्या व्यवस्थापन आणि नेतृत्वगुणांना कठोर परिश्रमांची जोड दिली. त्यांच्या अविश्रांत प्रयत्नांमुळे वऱ्हाडात शिक्षणाची नवी मंगल ‘प्रभात’ उजाडली आणि हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सर्वस्पर्शी शिक्षणाचा प्रकाश पडला.

डॉ. गजानन नारे हे मूळचे अकोटचे. योगायोग म्हणजे त्यांचा वाढदिवसही शिक्षकदिनी- ५ सप्टेंबरलाच असतो. बहुधा त्यामुळेच त्यांची नाळ शिक्षणाशी जुळली असावी. घरात शिस्तीचे शैक्षणिक वातावरण असल्यामुळे बालपणीच त्यांना शिक्षणाचे बाळकडू मिळाले. ‘शिक्षणाशिवाय पर्याय नाही’ हा विचार आई-वडिलांनी मनावर कोरला आणि कोणते शिक्षण घ्यायचे, याची मोकळीकही दिली. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. अकोटसारख्या छोटय़ा शहरात गजानन नारे यांनी स्वयंअध्ययनावर लक्ष केंद्रित करून शालेय शिक्षण पूर्ण केले. दहावीत ८३ टक्के गुणांसह ते गुणवत्तायादीत झळकले. त्यामुळे विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन डॉक्टर, अभियंता वगैरे होणे त्यांना सहज शक्य होते. मात्र, असे चाकोरीबद्ध जगणे त्यांना मान्य नव्हते. वाणिज्य शाखेतून शिक्षण घेऊन व्यापार, उद्योग, शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचा निर्धार त्यांनी शालेय जीवनातच केला. त्यानुसार त्यांनी अकोटला अकरावीत प्रवेश घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच इंग्रजी हा मुख्य अडथळा. त्यामुळे गुणवत्ता असूनही त्यांना नीटपणे व्यक्त होता येत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांतील ही कमतरता गजानन नारे यांच्या मनाला महाविद्यालयीन जीवनातच टोचत होती. शिक्षणपद्धतीतील उणिवांमुळे दर्जेदार पिढी घडत नसल्याच्या चिंतेत त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. बुद्धिमत्तेच्या जोरावर शहरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत वाणिज्य पदवी परीक्षेत त्यांनी विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आणि तीन सुवर्णपदकेही प्राप्त केली.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Palghar, teachers election training,
पालघर : निवडणूक प्रशिक्षणाकरिता शिक्षकांची तारांबळ, मुल्यांकन चाचणी व निवडणूक प्रशिक्षण एकाच वेळेत
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

१९८८ मध्ये उच्चशिक्षणासाठी त्यांनी अकोल्याची वाट धरून श्री शिवाजी महाविद्यालयातून एम. कॉम. होताना गुणवत्तायादीत स्थान कायम राखले. त्यानंतर सी. ए. करायचे हे त्यांचे ठरलेच होते. त्यासाठी कोणावर अवलंबून न राहता स्वकमाईतून पुढील शिक्षण घेण्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसार एका फर्ममध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांनी नोकरीस प्रारंभ केला. कठोर परिश्रम घेऊन ते सी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. दरम्यानच्या काळात त्यांनी ही कंपनी सोडून अकोल्यातील निशांत पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला. त्या पतसंस्थेला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांना फळ आले. पुढे त्याच संस्थेच्या वृत्तपत्राच्या व्यवस्थापनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. याच समूहाच्या शैक्षणिक उपक्रमासाठी पुढाकार घेतला. लहानपणापासून आपल्या मनात असलेली इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग त्यांना दिसू लागला, त्यामुळे समूहाने सुरू केलेल्या गुरुकुलमध्येही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.

सुमारे १० वर्षे तेथे काम केल्यावर, जीवनाची ध्येयपूर्ती अशाने साध्य होणार नाही, या विचारातून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २००३ मध्ये साधारणत: ३० हजार रुपये वेतनाची नोकरी सोडली. जीवनाची पुन्हा शून्यापासून सुरुवात होत होती. उच्चशिक्षणामुळे कुठेही नोकरी मिळणे सहज शक्य होते. मात्र, आता नोकरी करण्याऐवजी शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाचा मैलाचा दगड ठरेल, असे स्वत:चे शैक्षणिक दालन निर्माण करण्याचा विचार मनात पक्का केला आणि त्याच दिवसापासून शिक्षणासाठी झटणाऱ्या नवजीवनाला सुरुवात झाली.

मुलांना सर्वागीण शिक्षण देण्याचा हा वेगळा विचार फारसा कोणाला रुचणारा नव्हता. प्रेमविवाह केलेल्या गजानन यांना त्यांची पत्नी वंदना यांची मात्र भक्कम साथ लाभली. प्रत्येक प्रसंगी त्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. हा काळ अत्यंत संघर्ष व परिश्रमाचा होता. शिवाय, नवीन शाळा उभारण्यासाठी पैशांचीही समस्या होतीच. कुठून तरी सुरुवात करायची म्हणून उन्हाळी वर्गापासून या कार्याला प्रारंभ झाला. वेगळ्या पद्धतीने सुरू केलेल्या या उन्हाळी वर्गामध्ये मोकळ्या असलेल्या मुलांना गुंतवून ठेवण्यासोबतच त्यांच्यातील कलागुणांना, कौशल्यांना प्रोत्साहन देण्याला प्राधान्य दिले. विविध उपक्रम राबवून मुलांना मनोरंजनासोबतच क्रीडा व शिक्षणाचे धडे दिले. अल्पावधीतच हा उन्हाळी वर्ग पालकांच्या पसंतीस उतरला. गजानन यांची समाजसेवेची महत्त्वाकांक्षा असल्याने त्यांनी नोकरीत असतानाच ‘प्रभात चॅरिटेबल सोसायटी’ची स्थापना केली होती. नोकरीमुळे त्या सोसायटीमार्फत काही करणे शक्य झाले नाही. त्यानंतर त्यांनी सोसायटीमार्फत २००३ मध्ये ‘प्रभात किड्स’ची स्थापना केली. केवळ २६ विद्यार्थी घेऊन नर्सरीला सुरुवात झाली. त्यानंतर एक-एक वर्गाला परवानगी मिळत राहिली आणि ‘प्रभात किड्स’ शाळेची यशस्वी वाटचाल सुरू झाली. नोकरीच्या काळात अकोल्यातील मूर्तिजापूर मार्गावर घेतलेल्या भूखंडावर नोकरी सोडल्यावर आलेल्या पी.एफ.च्या रकमेतून शाळा उभारणीच्या कार्याला प्रारंभ केला. त्या रकमेतून शाळेचा डोंगर उभारणे शक्य नव्हते, त्यामुळे विविध बॅँकांचे अर्थसाहाय्य घेऊन शाळेचे काम पूर्णत्वास नेले. केवळ पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करण्याची शाळेची मुख्य संकल्पना होती. इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण कुठलेही डोनेशन न घेता विद्यार्थ्यांना द्यायचे, हे नारे दाम्पत्याने निश्चित केले होते. केवळ मुलांच्या शैक्षणिक शुल्कातून उत्तम शिक्षण देणारी विनाअनुदानित शाळा चालवणे, ही तारेवरची कसरतच. तरीही त्यांनी हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. शिक्षण क्षेत्रातून परिवर्तनासाठी विविध प्रयोग राबविणारी शाळा चालविण्यासाठी त्या क्षेत्रातील शिक्षण घेणे आवश्यक ठरते, त्यामुळे गजानन नारेंनी बी.एड., एम.एड. करून शिक्षणशास्त्रातच आचार्य पदवी प्राप्त केली. हा अभ्यास करताना राज्य व देशातील विविध शाळांना भेटी देऊन त्या शाळांचे चांगले उपक्रम आपल्या शाळेत राबविले. दिवसेंदिवस शाळा प्रगती करीत होती. विद्यार्थ्यांचा ओढा शाळेकडे वाढला. परिणामी जागा अपुरी पडायला लागली. आपल्या संकल्पनेला व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रशस्त जागेत भव्य शाळा उभारायला हवी, हे त्यांच्या लक्षात आले. पुन्हा त्यांनी बॅँकांची मदत घेऊन अकोल्यापासून नऊ कि.मी. अंतरावर दहा एकर जागेत शाळेची प्रशस्त इमारत उभारली. २००९ पासून शाळा नवीन इमारतीत नेण्याचा निश्चय केला. सोबतच सकाळी ८ ते ५ पर्यंतचे वेळापत्रक असलेल्या डे बोर्डिग स्कूलची संकल्पनाही पश्चिम विदर्भात रुजवली. शाळेतच जेवणासह विद्यार्थ्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली. सुरुवातीला याला विरोधही झाला व पालकांच्या मनातही शंका होती. नंतर विरोध करणारेच समर्थनार्थ उभे राहिले आणि डे बोर्डिग स्कूलने यशाचे नवनवीन टप्पे गाठले.

या शाळेतील विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेण्यात येत असल्याने त्यांना वेगळ्या शिकवणीची गरज भासत नाही. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडागुणांना वाव देण्यात येतो. परिणामी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनात येते. डॉ. नारे यांनी ‘एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज्’ या विषयात आचार्य पदवी प्राप्त केल्यामुळेच त्यांनी शाळेत शाळाबाह्य उपक्रम राबविण्याला प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांना कुठल्याही एका क्रीडा प्रकारात सहभागी होण्याची सक्ती आहे. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर शाळेचे नाव गाजवले आहे. ४० बसेसच्या साहाय्याने अकोल्यासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. शाळेत येण्या-जाण्याच्या प्रवासातही मनोरंजनासोबतच विविध उपक्रम राबविले जातात. मुलांना शिस्त लागावी म्हणून शाळेत भोजनगृहाचे नियम पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार दिले जातात. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून ‘बेस्ट रीडर’ पुरस्कारही दिला जातो. विद्यार्थ्यांचे वाढदिवसही ग्रंथालयाला पुस्तक भेट देऊन साजरे केले जातात. त्यातून ३ हजार पुस्तकांचे समृद्ध ग्रंथालय तयार झाले आहे. लोकशाही पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी प्रचार मोहीम, निवडणूक, मंत्रिमंडळाची स्थापनाही केली जाते. इंग्रजी माध्यमाची शाळा असतानाही कवी कट्टा, मराठी कट्टा, संस्कृत-हिंदी भाषांचे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. संस्कृतीशी नाळ जोडण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार केले जातात. विविधांगी उपक्रम राबविणाऱ्या शाळेचा विकास होण्यासोबतच विद्यार्थ्यांची संख्याही वाढतच गेली. आज शाळेत ३५० कर्मचारी आहेत. त्यांचेही कला-कौशल्य विकसित करून प्रशिक्षण देण्यात आले. शाळेच्या बसेसचे ८० चालक-वाहक मोकळ्या वेळेत त्यांच्या आवडीनुसार प्रिंटिंग, फॅब्रिकेशन, सुतारकाम, माळीकाम आदी करतात. त्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षणही त्यांना देण्यात आले आहे. त्या कार्याचे त्यांना वेगळे मानधन देण्यात येते, त्यामुळे शाळेतच फर्निचर तयार करण्यासोबत इतर कार्यही पार पडते. शाळेत बाग तयार झाली. तेथे भाज्या-फळे तयार होतात. त्याचा कर्मचाऱ्यांसोबतच संस्थेलाही लाभ होतो.

डॉ. गजानन नारे यांनी सामाजिक कार्यालाही एक वेगळा आयाम दिला. ग्रामीण भागातील, तळागाळातील सर्वच विद्यार्थ्यांपयर्ंत शिक्षणाचे हे दालन पोहोचावे म्हणून डॉ. नारे यांनी होतकरू व गरजू शिक्षकांना ग्रामीण भागात प्रभात किड्सची नि:शुल्क फ्रॅंचायझी देऊन मार्गदर्शन केले. समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानून डॉ. नारे यांनी आपल्या आईचे देहदान केले आणि तेराव्याऐवजी ३०० मुलींची आरोग्य तपासणी केली. अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी ‘मिशन २६’ आखण्यात आले. त्यात डॉ. गजानन नारे यांनी सक्रिय सहभाग घेऊन दहावीच्या ४० विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली. त्यांना आपल्या शाळेत शिक्षण देण्यासोबतच नेण्या-आणण्याची, जेवणाची व विशेष प्रशिक्षणाचीही व्यवस्था केली, त्यामुळे ते विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ५ उत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारीही डॉ. नारे यांनी उचलली. डॉ. गजानन नारे व त्यांच्या मित्रपरिवाराकडून अनाथ मुलींसाठी ‘आनंदाश्रम’ चालवले जाते. १५ मुलींची सर्व व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. इतरही अनेक सामाजिक कार्यासाठी हातभार लावण्यात डॉ. नारे सदैव अग्रेसर असतात. विदर्भ साहित्य संघाच्या माध्यमातून त्यांनी साहित्य क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला.

२६ विद्यार्थ्यांपासून सुरू केलेल्या प्रभात किड्सचे आता ३ हजार विद्यार्थ्यांच्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. विद्यार्थ्यांना बहुआयामी शिक्षण देताना शाळेचा सर्वागीण विकास करण्यात आल्यामुळे डोक्यावर होणाऱ्या कर्जाचा बोजा वाढत होता, पण योग्य नियोजनामुळे कर्जाची नियमित परतफेड केली. लहानपणापासून मनाशी बाळगलेले ध्येय गाठण्यात त्यांना यश आले असले तरी ते यावरच समाधानी नाहीत. भविष्यात आणखी हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात सर्वागीण शिक्षणाचा उज्ज्वल प्रकाश टाकून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अधिक जोमाने सामाजिक कार्य करणार असल्याचे डॉ. गजानन नारे सांगतात.

प्रबोध देशपांडे – prabodh.deshpande@expressindia.com
दिनेश गुणे – dinesh.gune@expressindia.com