सत्तरच्या दशकात गाजलेल्या ‘आनंद’ या चित्रपटातील कर्करोगग्रस्त राजेश खन्नाच्या तोंडी एक संवाद आहे. ‘बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही’ माझ्या आयुष्याची साडेआठ दशके उलटताना मला त्या संवादाची प्रचीती आली आहे. कारण मी खरोखरीच दोन्ही आयुष्ये अनुभवली आहेत; लंबी और बडी!

एका समाजसेवकाने आपल्या भाषणात यशस्वी ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या सांगताना म्हटले होते की, ‘ज्या वयोवृद्ध निवृत्त नागरिकाला सकाळी उठल्यावर, आता दिवसभर करायचे काय? असा प्रश्न पडला नाही तर तो सुखी ज्येष्ठ जन.’ मी या प्रवर्गातही फिट्ट बसतो. कारण मला असा प्रश्न पडत नाही. माझा दिवसातील प्रत्येक क्षण कारणी लागलेला असतो. माझे मित्र ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात त्यांच्या सत्काराच्या प्रसंगी दिलेला मंत्र उपयुक्त ठरला. तो मंत्र म्हणजे ‘तुमचा सर्वात जिवलग मित्र असावा तो म्हणजे पुस्तक. कारण हा मित्र तुम्हाला कोठल्याही वेळी उपलब्ध असतो’. हा मंत्रही मी तंतोतंत पाळला आहे. एवढेच नव्हे तर याची दीक्षा इतरांनाही दिली आहे, एका ग्रामीण भागात ग्रंथालय स्थापून आणि ते वृद्धींगत करून.

या वाचनाच्या नादातून, लेखनाचा नाद लागला. त्याचे बीज रोवले ते एका पत्रकाराने. फक्त छायाचित्रे प्रसिद्धीस देणाऱ्या मला त्यांनी लिहिते केले आणि बघता बघता मान्यवर वृत्तपत्रांतून / मासिकांतून चारशे लेख प्रकाशित झाले. लेखांपेक्षा पुस्तक हे चिरकाल टिकते, त्यामुळे तेही माझ्या हातून लिहिले गेले पाहिजे असा ध्यास घेतला आणि ‘ग्रंथाली’ प्रकाशकाने तोही पुरा झाला. आणि एकदा त्याचा गौरव झाला, तेव्हा उत्साह दुणावला. गच्च भरलेल्या साहित्य संघाच्या नाटय़गृहात मुंबईवरील एका नाटय़प्रयोगाच्या मध्यंतरात ‘गिरगांव मैत्रीग्रुप’ या संस्थेने माझ्या गाजलेल्या ‘पांढरपेशांचे गिरगांव’ या पुस्तकासाठी माझा सत्कार केला तेव्हा मी भारावलो. ‘ग्रंथाली’कडून आणलेल्या त्याच्या उर्वरित प्रती नाटय़गृहाच्या लॉबीमध्ये हातोहात खपल्या, असा निरोप मिळाला तेव्हा मी थरारलो. दुसरेच पुस्तक सोल्ड आऊट!

समाजकार्याचा वसा मला वडिलांकडून मिळाला. त्यांनी स्थापन केलेल्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मारक समिती या संस्थेत मी गेली साठ वर्षे विविध पदांवर कार्यरत राहिलो आहे. शिरढोण या त्यांच्या जन्मगावी ग्रामीण भागातील खेडुतांसाठी आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात नवनवीन कामे राबविली. वर उल्लेखलेले ग्रंथालय तेथेच उभे केले आणि ते बहरून आता शासनमान्य ‘ब’ श्रेणीतील ग्रंथालय म्हणून मान्यताप्राप्त आहे. त्यातील पुस्तकांची निवडप्रक्रिया मी स्वत: पंचवीस वर्षे केली. ते ग्रंथालय आता डिजिटल करण्याच्या प्रयत्नात आहोत.

रुग्णसेवा प्रत्यक्ष जरी करू शकलो नाही तरी गरजू रुग्णांना आर्थिक मदत करणे, वृत्तपत्रात अनेकदा रुग्णांसाठी मदतीचे आवाहन वाचले की निश्चित पोहोचेल अशा जागी धनादेश पाठवीत राहिलो. नाना पालकर स्मृती समितीच्या रुग्णसेवा केंद्राला एक वर्षांआड आर्थिक साहाय्य करून डॉ. अजित फडकेंना दिलेले वचन पाळले आहे. शिरढोण येथील दवाखान्यासाठी विविध धमार्थ संस्थांकडून आर्थिक अनुदान मिळविण्यासाठी सतत धडपडावे लागते. ते गेली वीस वर्षे यशस्वीपणे केले.

यातूनही रिकामा वेळ राहिला तर मला दिलासा मिळतो तो संगीतात. पारंपरिक शिक्षण संपल्यावर संगीत शिक्षण घेतले. त्यातून बऱ्यापैकी हार्मोनिअम वाजवायला येऊ लागला. त्यामुळे पुस्तकांप्रमाणेच माझी बाजाची पेटीही हाताशीच असते. विरंगुळा म्हणून त्यातून सूर छेडले की, शारीरिक व्यथांचाही विसर पडतो आणि माझ्या संगीतातील अल्प ज्ञानाला उजाळा मिळतो. मग आता करू काय? असा संभ्रम पडेलच कशाला?  विचारला नाही तरी माझ्यापेक्षा यंग सीनियर्सना संदेश दिला तर अप्रस्तुत होणार नाही. पुस्तकाशी मैत्री करा, रोज काही तरी लिहाच.  रात्री झोपण्यापूर्वी दिनक्रम लिहा, रोज निश्चित, काल्पनिक पत्र लिहा, लेखणी वापरून मोबाइल नाही.

– मधुसूदन फाटक, मुंबई