आज वयाची ७६ वर्षे पूर्ण केल्यावर निवृत्ती नंतरच्या १६ वर्षांकडे मागे वळून पाहताना मनातले विचार कदाचित इतरांना लाभदायक ठरू शकतील म्हणून येथे मांडत आहे. आज पुणे हे निवृत्तिधारकांचे शहर म्हणून अभिमानाने ओळखले जाते. जीवनातील अखेरची वर्षे येथे सुखाने व्यतीत होतील या विचाराने महाराष्ट्रातीलच नव्हेत तर भारतातील अनेक वरिष्ठ  नागरिक येथे कायमच्या वास्तव्यासाठी येतात. तुम्ही वेळ कसा घालविता असे त्यांना विचारल्यास, बहुतेक जण उत्तरादाखल सांगतात, ‘‘मी काहीच करत नाही. आयुष्यभर कष्ट केले, आता कशाला काय करायचे?’’ अशी हजारोंच्या संख्येने फिरणारी ही वयस्क मंडळी आपल्या उरलेल्या आयुष्यात फक्त ‘टाइमपास’ करीत असतात. सतत पुढे सरकणाऱ्या काळाची जाणीव असणे म्हणजे जीवनाचा अर्थ गवसणे होय. आज आयुर्मान वाढल्यामुळे ३५ वर्षे नोकरी करणारा माणूस साधारणपणे आपल्या उर्वरित आयुष्यातील १०, १५ वा २० वर्षे अशा रीतीने सहज वाया घालवीत असतो. मानवी ऊर्जेची, मिळवलेल्या ज्ञानाची, कौशल्याची व समृद्ध अनुभवाची सतत होणारी प्रचंड हानी लोकांच्या लक्षातही येत नाही.

इंग्रजीचा प्राध्यापक आणि रिसर्च गाइड म्हणून निवृत्त होण्यापूर्वी दोन वर्षे आधीच मला नंतर काय करता येईल, असा मी विचार सुरू केला होता. पदव्युत्तर पातळीवर प्राध्यापक म्हणून माझा लौकिक उत्तम होता. आपल्याला काय येतं आणि त्याचा स्वत:साठी, इंग्रजी भाषा आणि साहित्य समृद्ध करण्यासाठी कसा उपयोग करता येईल याचा मागोवा घेताना शिकविणे आणि लिहिणे हे दोन मार्ग माझ्यासमोर होते. मी हाडाचा शिक्षक असल्यामुळे वर्गात जाणे हा माझ्यासाठी निखळ आनंद असे. म्हणून एम.ए.बरोबरच मी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना अडसर वाटणाऱ्या सेट/नेट टेस्टच्या मार्गदर्शनासाठी अध्यापन सुरू केले. अशा टेस्टसाठी नगण्य फी घेऊन प्रत्यक्ष वर्ग चालविणारा दुसरा एकही प्राध्यापक मला आजही माहीत नाही. नाशिक येथे १० वर्षांत माझे ३५ विद्यार्थी सेट/नेट उत्तीर्ण होऊन पूर्ण पगारी प्राध्यापक होऊ शकले हे माझे योगदान मला आजही समाधान देते. कवी कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने माझ्या निवृत्तीआधीच त्यांच्या निवडक ८० कविता मी इंग्रजीत अनुवादित करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केल्या होत्या. पाश्चिमात्य जगताकडे फक्त झोळी फैलावून त्यांच्या प्रत्येक पुस्तकांचा मराठी अनुवाद करण्यापेक्षा मराठीतील उत्तम साहित्य इंग्रजीत अनुवादित करून आपल्यातील उत्तमोत्तम लेखकांना जागतिक पातळीवर नेण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न मी केला. प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना फारसे लिखाण न झाल्याची खंत मनात होतीच. १६ वर्षांतील दहा-बारा अनुवादित पुस्तकामध्ये

जी. ए. कुलकर्णी यांच्या २८ कथांचे दोन कथासंग्रह, सदानंद देशमुख यांची ‘बारोमास’, भारत सासणे यांची ‘दोन मित्र’, सानियांची ‘स्थलांतर’ आदी कादंबऱ्यांचा समावेश आहे. स्टीव्ह जॉब्ज्चे अधिकृत चरित्र, मॅनबुकर पारितोषिक विजेती एलीनर कँटनची ८०० पानी कादंबरी ‘द लूमीनरीझ’ आणि अनेक उत्तम इंग्रजी कथा मी मराठीतही अनुवादित केल्या आहेत. मला वाटते, निवृत्तीनंतर मी अनुवादात हरवलो आणि त्यातच मला माझे स्वत्व गवसले. वयस्कांनी त्यांना अवगत असलेले काम सोडले तर ते पटकन निसटून जाते. तसे होऊ नये म्हणून आजही दोन दिवस मी एम.ए.चे तास घेतो.

स्वत:च्या मानसिक नि शारीरिक स्वास्थ्यासाठी वयस्कांनी काम करीत राहणे गरजेचे असले तरी त्यापुढे जाऊन आपल्या विशेष प्रावीण्याचा नि अनुभवाचा विनियोग ज्ञान वा कौशल्यवृद्धीसाठी करून आपल्या खास क्षेत्रात आपल्या परीने मोलाचे योगदान देणे त्याहूनही गरजेचे आहे. माझा व्यवसाय जर माझी जीवनपद्धत होऊन मला आयुष्यभर साथ समाधान देणारी ठरली असेल तर आयुष्याच्या या संध्याकाळी, रॉबर्ट फ्रॉस्टच्या प्रसिद्ध कवितेतील ओळी अनुवादित करून, मी म्हणेन :

ही वनराई खूप सुंदर,

गडद आणि गहिरी आहे,

परंतु माझ्या कर्तव्याचे भान

मला जपायचेच आहे,

आणि निद्राधीन होण्याआधी

अनेक मैल जायचे आहे,

अनेक मैल जायचे आहे.

विलास साळुंके, पुणे