01vijay1 मेष पशाकरिता जीव टाकणारी तुमची रास नाही. पण गेल्या काही महिन्यात पशाच्या देण्याघेण्यावरून तुम्हाला जे अनुभव आले असतील त्यावरून तुम्ही तुमचे नवीन धोरण ठरविले असेल. त्याच्याकरिता भांडवलाची उभारणी करावी लागेल. नोकरदार व्यक्तींना कामाच्या स्वरूपात बदल होण्याची नांदी वरिष्ठ करतील. त्याची पूर्वतयारी करावी लागेल. घरामध्ये काही नवीन बेत आखावेसे वाटतील.

वृषभ  चांगल्या ग्रहमानामुळे तुमच्या मनामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी विचार दौडत असतील. ते कृतीत आणण्यासाठी तुमची काहीही करण्याची तयारी असेल. व्यापारउद्योगात स्पध्रेमध्ये टिकून राहण्यासाठी नवीन पद्धतीने काम सुरू करावे लागेल. नोकरीमधल्या कामाच्या पद्धतीमध्ये अचानक काही बदल होतील. पण जे घडेल ते चांगलेच असेल असा आशावाद ठेवा. सांसारिक जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडून आणण्यासाठी तुम्ही थोडेसे हळवे बनाल.

मिथुन चांगले आणि वाईट तुम्हाला दोन्ही समसमान प्रमाणामध्ये लाभणार आहे. तुमचा दृष्टिकोन तुम्ही जर सकारात्मक ठेवलात तर बरेच काही मिळवू शकाल. नवीन वर्षांकरिता जे बेत तुम्ही मनाशी आखले आहेत ते साध्य करण्याकरिता तुम्हाला कष्टाची तयारी ठेवावी लागेल. त्यामध्ये कसूर झाली तर हातात आलेली संधी लांब लांब पळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या बोलण्यामुळे मानापमानाची भावना जागृत होऊ देऊ नका.

कर्क  ग्रह फारसे अनुकूल नसल्यामुळे तुमच्या मनात यशाविषयी एक प्रकारची साशंकता असेल. कठोर परिश्रमाला पर्याय नाही याची आठवण ठेवून व्यापार उद्योगात कोणतेही काम स्वीकारण्याची तयारी ठेवा. नोकरीच्या ठिकाणी कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता आपले काम आपण करायचे असा निश्चय करा. काही फेरबदल कामाच्या स्वरूपात होण्याची नांदी होईल. घरामधल्या प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडून अपेक्षा ठेवतील. कोणत्याही परिस्थितीमधे त्रागा करू नका

सिंह एकंदरीत हे सर्व ग्रहमान तुमच्यामध्ये एक प्रकारचे नवचतन्य निर्माण करणारे आहे. मनामध्ये बरेच बेत असतील ते पूर्ण करण्याकरिता तुम्ही आतुर असाल. व्यापार-उद्योगात एखादे मोठे पाऊल उलचण्यासाठी योग्य संधीची तुम्ही वाट बघत असाल. काहीतरी चांगला बदल घडावा असे नोकरदार व्यक्तींच्या मनात असेल. घरामध्ये काही जुने प्रश्न तुमचे लक्ष वेधतील. पण इतर कामाच्या व्यापामुळे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष कराल.

कन्या खूप काम करायचे आहे पण त्याची कुठून आणि कशी सुरुवात करायची यासंबंधीचे कोडे तुमच्या मनात असेल. व्यापारउद्योगात जरी अडचणी आणि अडथळे असले तरी तुमचा हेतू सकारात्मक ठेवा. नुकतेच काही बदल केले असतील तर त्याचे परिणाम लक्षात येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आधी ठरविलेले काम आयत्यावेळी बदलतील. घरामध्ये तुमची इच्छा नसली तरी एखादे जबाबदारीचे काम तुम्हाला हाताळावे लागेल.

तूळ जरी सध्याची वाटचाल खडतर असली तरी पुढे काहीतरी चांगले होईल, ही आशा मनात ठेवून तुम्ही भरपूर काम करायला तयार व्हाल. व्यापार- उद्योगामध्ये पशाची थोडीशी चणचण असल्यामुळे एखादा नवीन मार्ग शोधावा लागेल. नोकरीमध्ये एखादे काम सहकाऱ्यांच्या मदतीशिवाय तुम्हाला पार पाडावे लागेल. घरामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तींशी एखाद्या मुद्दय़ावर मतभेद होतील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक मनामध्ये विचारांचा गोंधळ उडालेला असेल. तुम्हाला अनेक गोष्टी करायच्या असतील. पण नशिबाची साथ मिळेल की नाही याविषयी शंका असेल. आगे बढो असा ग्रहांचा सल्ला आहे. राशीमधल्या शनीच्या भ्रमणामुळे गेल्या दोन वर्षांत तुमच्या जीवनामधे अक्षरश: धुमाकूळ माजला होता. नोकरीच्या ठिकाणी कोण काय करतं याकडे लक्ष न देता आपण बरे आणि आपले काम भले असे धोरण ठेवा.  कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवनात मोठे बदल होण्याचे संकेत मिळतील.

धनू ग्रहमान तुमच्यामधे ईर्षां निर्माण करणारे आहे. ज्या कामाकरिता तुम्ही बरेच कष्ट घेतले होते त्यामध्ये यश नजरेच्या टप्प्यात येईल. पण व्ययस्थानातला शनी आणि राशीतील वक्री बुध तुम्हाला सहजगत्या केलेल्या कामाचे फळ देणार नाही. बुध आणि शुक्र यांच्यामध्ये लाभयोग होणार आहे. हा ग्रहयोग तुमच्या आचारविचारांमध्ये संक्रमण करेल. व्यापारउद्योगात नवीन कार्यपद्धती अमलात आणाल. घरामध्ये तुमच्या शब्दाला मान मिळेल.

मकर एकंदरित ग्रहमान तुमच्यावर प्रसन्न असल्यामुळे ‘मन की खुशी, दिल का राजा’ असे तुमच्या राशीचे वर्णन करता येईल. अनेक गोष्टी करण्याचा तुमचा इरादा असेल. त्याची सिद्धता करण्याकरिता तुम्ही आता सर्वतोपरी तयार होणार आहात. व्यापार-उद्योगात भावनेच्या भरामध्ये एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावासा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांसमोर तुम्ही बढाया मारल्यात तर नंतर ते महागात पडेल. घरामध्ये एखाद्या मोठय़ा कार्याची नांदी होईल.

कुंभ  ग्रहमान तुम्हाला उत्तेजित करणारे आहेत. जे काम आपण करतो ते चांगलेच असले पाहिजे अशी तुमची कायम धडपड असते. त्याला अनुसरून ग्रहांची मांडणी झालेली आहे. मात्र अष्टम स्थानामधला गुरू तुम्हाला विशेष चांगला नाही. व्यापार-उद्योगात एका नव्या जोमाने कामाला लागाल. नवीन नोकरीमध्ये कामाच्या स्वरूपात ठरविलेले बदल कार्यान्वित होतील. घरामधे लहान मोठे वाद वगळता बाकी वातावरण ठीक असेल.

मीन नवीन   वर्षांच्या सुरुवातीला तुमच्या राशीची ग्रहस्थिती उत्साहवर्धक असेल. शनीसारखा कर्मकारक ग्रह भाग्यस्थानात विराजमान झाला आहे. ग्रहमानाला व्ययस्थानातील शुक्र आणि मंगळ गालबोट लावणारे आहेत. प्रगतीचा मार्ग निर्वेध आहे असे तुम्ही समजाल, पण मेहनतीच्या जोरावर मार्ग काढता येईल. व्यापार-उद्योगात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काही सुटसुटीत बदल कराल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढतील. घरामध्ये काही खर्च बजेटबाहेर जातील.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com