18 October 2019

News Flash

राशिभविष्य : दि. ३ ते ९ मे २०१९

रवी-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे कामाचा उत्साह वाढेल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे कामाचा उत्साह वाढेल. मानसिक शक्तीमुळे हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. जिद्दीने अडचणींवर मात कराल. नोकरी-व्यवसायात कल्पक विचार पुढे मांडाल. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. सहकारी वर्ग आपल्या मदतीस धावून येईल. जोडीदाराचे नावीन्यपूर्ण प्लान्स् आपल्याला चकित करतील. आप्त स्वकीयांच्या भेटीगाठी होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तीव्र उन्हापासून स्वत:चे संरक्षण करा.

वृषभ गुरू-शुक्रच्या नवपंचम योगामुळे आनंदी जीवन जगाल. दुसऱ्याला मदत कराल. नावलौकिकात भर पडेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सहकारी वर्गाकडून फारशा अपेक्षा ठेवू नका. कामे लांबणीवर पडतील. जोडीदार आपल्या आनंदात सहभागी होईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे पैसा आणि वेळ खर्च करावा लागेल. सेवावृत्तीने ती जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडाल.

मिथुन बुध-हर्षलाच्या नवपंचम योगामुळे बुद्धिमत्तेला नवी दिशा मिळेल. समयसूचकतेमुळे इतरांच्या उपयोगी पडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. तसेच सहकारी वर्गाकडून अपेक्षित कार्यभाग शिताफीने, चतुराईने साध्य करून घ्याल. कामानिमित्त लहान-मोठे प्रवास कराल. जोडीदाराची बाजू समजून न घता प्रश्नांचा भडिमार करू नका. थोडा काळ जाऊ द्या. व्यवहार न बघता ज्येष्ठांच्या भावनांचा आदर बाळगा. खांदेदुखीकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क गुरू-मंगळाच्या समसप्तम योगामुळे आपल्या आनंदी, उत्साही वृत्तीमध्ये उदारतेची छटा मिसळेल. दुसऱ्याच्या उपयोगी पडाल. लोककल्याणासाठी  वेळ आणि पैसा कारणी लावाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आनंदवार्ता समजतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे प्रगती साध्य होईल. सहकारी वर्ग तत्परतेने मदत करतील. त्वचेच्या तक्रारींकडे विशेष लक्ष द्या.

सिंह रवी-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे दिलदार वृत्तीने लोकांचे भले कराल. चिंतनातून सर्जनशीलता वाढेल. हाती घेतलेल्या कार्यात यश संपादन कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाला केलेल्या मदतीची जाण ते नेहमी ठेवतील. जोडीदार कुटुंबासाठी जास्त वेळ देईल. आपल्याकडूनही तीच अपेक्षा असेल. या गोष्टीवरून वाद वाढू देऊ नका. साकल्याने विचार करून, प्लॅनिंग करून कुटुंबीयांसाठी वेळ काढाल. मानसिक स्वास्थ्य सांभाळा.

कन्या गुरू-चंद्राचा नवपंचम योग यश, कीर्ती, नावलौकिक मिळवून देतील. ओळखीतून तसेच मित्रमंडळींकडून लाभ होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या अवघड प्रश्नांना सामोरे जावे लागेल. सहकारी वर्गाची मदत घेऊन आपल्या समस्या सोडवाल. जोडीदार आपली परिस्थिती समजून घेईल आणि योग्य सहकार्य करेल. अतिविचार टाळा. पोटाचे विकार बळावतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

तूळ बुध-हर्षलाची युती बौद्धिक चर्चाना रंगत आणेल. तंत्रज्ञानासंबंधित नव्या कल्पनांचा विकास कराल. बुद्धिमत्तेला नवे खाद्य मिळेल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश संपादन कराल. वरिष्ठ आपल्या कामावर खूश होतील. सहकारी वर्गाकडून वेळेत काम पूर्ण करून घ्याल. एकंदरीत कामाचा उत्साह वाढेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या पेलण्यात व्यग्र असेल. शारीरिक-मानसिक आरोग्य चांगले राहील. ओळखीतून लाभ होतील.

वृश्चिक गुरू-मंगळाच्या समसप्तम योगामुळे नेतृत्वाची, पुढारीपणाची अभिलाषा जागी होईल. इतरांनी आपले ऐकलेच पाहिजे असा अट्टहास नसावा. वरिष्ठांपुढे नमते घेणे नोकरी-व्यवसायात आवश्यक आहे हे विसरू नये. सहकारी वर्ग मदत करण्याची तयारी दाखवतील. त्यांची मदत धुडकावून न लावता त्याचा स्वीकार करावा. जोडीदार आपणास समजून घेईल. चिडचिड टाळावी. पित्तप्रकोप, उष्णतेचे इतर विकार उदा. गळू, फोड, डोकेदुखी यांसाठी वैद्यकीय उपचार घ्यावेत.

धनू गुरू-बुधाच्या नवपंचम योगामुळे सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. बुधाची चंचलता आणि गुरूचा उत्साह यांमुळे फार पुढचा विचार न करता, मनात आलेले कृतीत उतरवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. सहकारी वर्गाचे चांगले साहाय्य मिळेल. जोडीदाराच्या खास मागण्या पुरवाव्या लागतील. प्रेमाने समजूत काढाल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. आध्यात्मिक विषयाचे वाचन, चर्चा यात मन रमेल.

मकर शनी-शुक्राच्या केंद्र योगामुळे अडीअडचणींतून धैर्याने मार्ग काढून पुढे जाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या पािठब्यामुळे कामे वेळेत आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण कराल. सहकारी वर्गासमोर एक आदर्श उभा कराल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. आपल्याकडूनही जोडीदारासाठी वेळ राखून ठेवाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र असले तरी त्यात उत्साह निर्माण कराल. वैद्यकीय चाचणी करून घेणे हिताचे ठरेल.

कुंभ गुरू-मंगळाचा प्रतियोग कार्याचा वेग वाढवेल. अपेक्षित फळ मिळेल. आप्त जन, ओळखीतली माणसे यांच्याकडून मदतीची फारशी अपेक्षा ठेवू नका. ज्या गोष्टी आपल्याला जमणार नाहीत त्या गोष्टी जोडीदाराच्या मदतीने सहज साध्य होतील. नोकरी- व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. सहकारी वर्गाची साहाय्यता कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. वायुप्रदूषणामुळे फुप्फुसांचे आरोग्य सांभाळा.

मीन गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे हातून धार्मिक कार्ये घडतील. दानधर्म केल्याने मानसिक समाधान मिळेल. नोकरी-व्यवसायात मनात नसतानाही वरिष्ठांचे शब्द पाळावे लागतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. जोडीदार आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यश संपादन करेल. कामानिमित्त केलेले प्रवास लाभदायी ठरतील. उष्णतेच्या विकारांपासून स्वत:चे संरक्षण करावे. घशाचे विकार अंगावर काढू नका.

First Published on May 3, 2019 1:01 am

Web Title: astrology 3rd to 9th may 2019