देवदूत गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीचा धबधबा जेव्हा जोमात होता तेव्हा नवउद्यमी कंपन्यांची घोडदौड सुरू होती. मात्र, हा ओघ आटू लागल्याने नवउद्यमींतील अनेक कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. नवउद्यमी कंपन्यांची घसरण झाल्याच्या मुद्दय़ावर स्पष्ट मत मांडणाऱ्या ‘देखावा आणि वास्तव’ या अग्रलेखावर व्यक्त होणारा मुंबईच्या ‘डी. जी. रूपारेल महाविद्यालया’चा विद्यार्थी प्रवीण घुगे ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाचा विजेता ठरला. तर या स्पर्धेत ‘कला व वाणिज्य महाविद्यालय, थडीपवनी जलालखेडा, नागपूरचा’चा विद्यार्थी नितीन आगे याने दुसरे पारितोषिक पटकावले.

‘देखावा आणि वास्तव’ अग्रलेखावर मत मांडणाऱ्या प्रवीण व नितीन यांनी चांगले लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’स्पर्धेत बाजी मारली. प्रवीणला सात हजार आणि प्रमाणपत्र तर नितीनला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.

‘देखावा आणि वास्तव’ या अग्रलेखावर मत मांडताना नेहमीप्रमाणेच बहुतांश विद्यार्थ्यांनी चांगले लेखन करत आपल्यातील विचारी वृत्तीला चालना दिल्याचे दिसून आले.

या स्पर्धेमध्ये आपल्या वैचारिक वृत्तीला चालना देणाऱ्यांची संख्या वाढती असून राज्यभरातून अधिकाधिक विद्यार्थी आपला सहभाग नोंदवत आहेत. त्यामुळे, योग्य विजेता निवडण्यासाठी परीक्षकांना विशेष मेहनत घ्यावी लागत आहे. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

उल्लेखनीय लेखन

ह्रषिकेश साठे, यश हाके, समृद्धी देशमुख आदींनी स्पर्धेत विशेष उल्लेखनीय लेखन केले. आशुतोष बाफना या विद्यार्थ्यांने आपल्या ब्लॉगमध्ये ‘लघु व मध्यम उद्योग अधिक महत्त्वाचे’ हा विषयाला साजेसा उल्लेख केला होता. तसेच व्यंकटेश झांबरे या विद्यार्थ्यांने लेखन करताना अभियांत्रिकीच्या ५० टक्के रिक्त जागांशी आपल्या आर्थिक वातावरणाचा संबंध असल्याचे सूचित केले.