रात्रीची वेळ. एकजण खूप आजारी आणि भोवताली जमलेल्या प्रत्येकीच्या डोळ्यात आत्मीयता, भीती, काळजी, प्रेम आणि बरंच काही. दवाखान्यात न्यायची वेळ येते. गाडी दारात येऊन उभी राहाते. दोघीजणी तिच्याबरोबर जायला तयार होतात. उरलेल्या सगळ्याजणी पटकन लागणाऱ्या वस्तूंची जमवाजमव करू  लागतात. थैला भरला जातो. कुणाचीतरी पर्स काढून त्यात हाताला येतील तेवढे पैसे भरले जातात. कुणाचातरी स्वेटर, कुणाचातरी स्कार्फ, पाण्याची बाटली, कुणाचं नेमकं काय दिलं जातंय याची कुणालाच तमा नाही. गाडी हलताना प्रत्येकीच्या डोळ्यात आपुलकीचं सांगणं ‘काळजी घ्या, नीट या’ निरोप देताना हालणारे हात फक्त. त्या काळोखात दूरवर दिसत राहातात आणि गाडी पुढे रस्ता कापत असते..

कुठल्याही नाटकाला, सिनेमाला किंवा कादंबरीला शोभेल असा हा प्रसंग! पण हे आहे एका लेडिज होस्टेलचं आणि थोडय़ाफार फरकानं सर्वच मुलामुलींच्या होस्टेलचं चित्र!

‘होस्टेल’ म्हटलं की आपल्याकडे कपाळावर चार आठय़ा पडतात. घरातून बाहेर पडायच्या अगोदरच होमसिक झाल्यासारखं वाटतं. सगळ्यांना जवळपास नकोसं वाटणारं हे ठिकाण!  पण खरंतर घराचं महत्त्व जाणवून देणारी, नात्यांचं आयुष्यातलं स्थान पटवून देणारी, तडजोडीची भावना रुजवणारी आणि सर्वात महत्त्वाचं ‘माणूस हा सामाजिक प्राणी आहे म्हणून तो समूहात राहातो’ याची प्रचीती देणारी ही एक उदात्त संस्था आहे, असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही.

आपल्याकडे अजूनही मुलांनी घराबाहेर पडणं ही संकल्पना मनापासून आवडत नाही. नाइलाजास्तव ते बाहेर पडतात हे वेगळं; पण आयुष्याचं मर्म कळण्यासाठी घराचे उंबरठे ओलांडून जगाच्या पसाऱ्यात पाऊल ठेवलंच पाहिजे, हा विचार फारसा पटत नाही. होस्टेलमध्ये राहायचं म्हणजे घरापासून किती लांब! असाच सगळ्यांचा रोख असतो, पण घर आणि होस्टेल यातलं हे अंतरच नात्यांमधलं अंतर कमी करत जातं आणि आपल्या माणसांना भेटण्याची ओढ लावून जातं. होस्टेलमध्ये राहाणारे आपण काही एकटे नसतो. एकाच वेळी शेकडोजण आपल्यासारखीच आपल्याच वयाची मंडळी घर सोडून आलेली असतात. ‘घरापासून लांब’ हाच धागा सगळ्यांच्यात दुवा बनून राहातो. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, कौटुंबिक वातावरण वेगळं, संस्कार वेगळे, ध्येय वेगळं आणि तरीही सगळेजणं एकाच छपराखाली राहातात, या कल्पनेनंच किती मन भारावून जातं.

आपल्या माणसांपासून लांब राहिल्यावरच आपलं आपण सावरायचं कळतं, नाहीतर आयुष्यभर आपण पसरायचं आणि दुसऱ्यांनी आवरायचं हीच वृत्ती अंगात भिनून जाते. आपल्या आयुष्याचे आपणच शिल्पकार असतो आणि त्यासाठी निर्णय आपणच घ्यायचे असतात हे उमजतं होस्टेलमध्ये आल्यावर. अर्थात त्यासाठी पालकांनीही मुलांना तेवढय़ा समंजसपणे आणि स्वेच्छेने होस्टेलमध्ये पाठवण्यासाठी तयार व्हायला पाहिजे. त्यांनी मनात एकच भावना ठेवावी-

‘निळ्याभोर आकाशाची स्वप्न पाहण्यासाठी

प्रत्येकाच्या मनात स्वतंत्र रात्र जगू द्यावी,

स्वप्नाप्रत पोचण्यासाठी त्या

प्रत्येकाला स्वतंत्र वाट चालू द्यावी!’

रुमपार्टनरपासून ते रेक्टपर्यंत आणि पाण्यापासून ते मेसच्या जेवणापर्यंत प्रत्येक ठिकाणी जुळवून घ्यायला लागतं. ही तडजोडीची भावना आयुष्यभर साथ करते. होस्टेलमध्ये समस्या (problems) सगळ्यांनाच निर्माण होत असतात. पण प्रत्येकजण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देतो. हे सगळं आपण स्वीकारू तसं आपल्या मनाला भावत जातं. आनंदानं स्वीकारलं सारं तर मग घराच्या उंबरठय़ाबाहेर पडताना ओल्या होणाऱ्या पापण्या होस्टेलचा उंबरठा पण ओलांडताना आसवात भिजून जातात.

होस्टेलमध्ये प्रत्येकाला दुसऱ्याचं सुख-दु:ख आपलंच वाटतं. कुणाचंतरी यश साजरे करताना आनंदात बुडून गेलेलं होस्टेल कुणाच्यातरी दु:खात तेवढंच गलबलून जातं. ही नाती फक्त मैत्री, प्रेम, ओळख अशी नसतात. त्याच्यापलीकडे जाऊन कुठलातरी अनामिक ओढीचा धागा त्यांच्यात निर्माण हातो. बळी तो कान पिळी या सिद्धांतानुसार होस्टेलमध्ये एक वर्षतरी काढलेली व्यक्ती कुठल्याही परिस्थितीतील संकटामध्ये तरून जाण्याचं सामथ्र्य असणारी असते.

शेवटी एक विचार प्रत्येकानंच करायला हवा की आपल्याला हवं ते शिक्षण मिळवण्यासाठी, हवी ती नोकरी मिळवण्यासाठी घर सोडावं लागणार आहेच, तर कपाळावर आठय़ा पाडून काय उपयोग? शेवटी आयुष्याचं अंतिम सत्य समाधान, यश आणि कर्तव्यपूर्ती एवढंच असतं. त्यासाठी होस्टेलला जाताना मुलांनी मनात एकच म्हणावं..

‘‘धुंडाळतो मी नवीन वाटा

ध्येयाप्रत पोचण्यासाठी,

हे नवीन जग होईल माझे

आहे फक्त माझ्यासाठी।’’
कल्पना लाळे-येळगावकर – response.lokprabha@expressindia.com