News Flash

१२३२ किलोमीटरचा जीवघेणा संघर्ष

१२३२ किमीचं अंतर ५-६ दिवसांत सायकल, ट्रकने पार करणाऱ्या चार मजूरांची कहाणी

श्रुति गणपत्ये

“ये रोटी तो कुत्ता भी नहीं खा रहा, हम कैसे खायेंगे?” गेल्या वर्षी लागलेल्या टाळेबंदीमुळे रोजगार बंद झाला आणि मुंबई, दिल्लीसारख्या शहरांतून मजूरांचे लोंढे गावाकडे निघाले. त्यांचा प्रवास, त्यातील संघर्ष, सरकारी व्यवस्थेचा नाकर्तेपणा, उपाशी-तापाशी पायी ग़लत तर आधी सायकल किंवा मिळेल त्या वाहनाने या लोढ्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास केला. त्यात काही यशस्वीरित्या घरी पोहोचले तर काही रस्त्यातच मरण पावले. आज एक वर्षानंतर त्या भीतीदायक आठवणींना उजाळा देणारी विनोद काप्री या पत्रकार, फिल्म मेकर यांची “१२३२ किलोमीटर” ही डॉक्युमेंटरी हॉटस्टारवर नुकतीच प्रदर्शित झाली. दिल्ली जवळील गाझियाबाद येथून बिहारच्या शिरशा हे साधारण १२३२ किलोमीटरचं अंतर पाच-सहा दिवसांत सायकल, ट्रकने पार करणाऱ्या चार मजूरांची ही कहाणी आहे.

टाळेबंदी झाल्याचं कळताच काही काळ या मजुरांनी शहरामध्ये वाट बघितली. पण जवळचे पैसे संपायला लागल्यावर त्यांनी गावी जायचा निर्णय घेतला. त्यांना ट्रेन, बस किंवा इतर काही वाहन मिळणं केवळ अशक्य होतं. म्हणून त्यातल्या त्यात बरा पर्याय म्हणून सायकली विकत घेऊन ते निघाले. जवळ थोडे कपडे, पाण्याची बाटली एवढंच घेऊन सायलकवर स्वार होत, मोबाईलच्या जीपीएसवरून रस्ता शोधत रोज साधारण १०० किलोमीटरच्या प्रवासाचं लक्ष्य त्यांनी ठेवलं. ऐन उन्हाळ्यात, खाणंपिणं नसताना, १०० किमी सायकल चालवणं आणि रस्त्यात काय संकट वाढून ठेवलं आहे याची कल्पना नसताना केवळ घराच्या ओढीने आणि जगण्याच्या इच्छेने प्रवास करत राहणं याला धाडसचं लागतं. या मजुरांच्या मते मात्र काहीच पर्याय नसल्याने असं कराव लागलं. या संपूर्ण प्रवासामध्ये विनोद काप्री यांनी त्यांच्याबरोबर गाडीने प्रवास करून त्याचं चित्रिकरण केलं आहे.

या मजूरांची सायकल वारंवार बिघडणं, रस्त्यात खायला न मिळणं, उपाशीपोटी प्रवास सुरू ठेवणं, पोलिसांच्या भीतीने अनेक ढाबेवाले त्यांना झोपण्यापुरती जागा द्यायलाही नकार देतात. पण त्याचवेळी काही अनोळखी लोक अनपेक्षितपणे मदत करून फुकट जेवण, झोपायला जागा देतात. काही ट्रकवाले त्यांना मदत करून काही अंतरापर्यंत घेऊन जातात. “पोलिसांची भीती आहे, पण आता पाया पडायला लागले तर त्यांना सोडून कसं देणार, म्हणून बरोबर घेऊन जातो,” अशी प्रामाणिक कबूली ट्रक ड्रायव्हर देतो. गावात एखादा हातपंप दिसला की तिथे पाण्याची तहान भागवणं, पोलिसांचा ससेमिरा चुकवत यांचा प्रवास सुरू राहतो. अशा छोट्या छोट्या मदतीमुळे आपण घरी पोहचू अशी आशा कायम राहते. मध्येच एकजण सायकलवरून चक्कर येऊन पडतो. रात्रीच्या अंधारात निर्जन ठिकाणी काय मदत करायची हे कोणालाच कळत नाही. पण काहीही झालं तरी आपल्या साथीदाराला सोडून जायचं नाही, एकत्र राहयचं असं त्यांनी स्वतःला बजावलेलं असतं. त्यामुळे त्यावेळी तिथेच थांबून दुसऱ्या दिवशी ते प्रवास पुन्ह सुरू करतात. हा प्रवास सुरू असताना रोज घरच्यांचे येणारे फोन, बाहेरच्या परिस्थितीची जाणीव नसल्याने वडिलांना चॉकलेट आणायला सांगणारी मुलं, डोळ्यात पाणी काढून, मुलगा दिसेपर्यंत अन्नत्याग करणारी आई, ही माणसंच या सर्व मजुरांना या संघर्षामध्ये पुढे जाण्याची शक्ती देत राहतात.

मजूर बिहारच्या हद्दीत पोहोचतात तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नाही. पण खरी समस्य इथेच सुरू होते. सरकारी अधिकारी आणि पोलीस त्यांना कॅम्पमध्ये घेऊन जातात. तिथे त्यांना खायला वेळेवर मिळत नाही, एका ठिकाणी केवळ ज्यूस आणि फळं देतात. त्यांना थेट घरी जाण्यास मनाई असते. १४ दिवसांसाठी अलगीकरणामध्ये जावं लागेल, असं सांगितलं जातं. त्यामुळे आणखी काही दिवस परिवारापासून दूर राहवं लागणार या कल्पनेने ते हवालदिल होतात. अलगीकरणासाठी नेताना गाडीच्या टपावर बसून आपल्या परिवाराकडे बघत पुढचे १४ दिवस काढायचे असा निश्चिय करत हा त्यांचा खडतर प्रवास संपतो.

कठीण प्रसंगामध्ये अनेक मानवी आणि अमानवी चेहरे समोर आणणारी ही डॉक्युमेंटरी आहे. या गरीब लोकांचा कोणताही विचार न करता लावलेली टाळेबंदी, अन्नपाण्याविना पायी जाणाऱ्या मजुरांच्या जथ्यांना सरकारी मदत शून्य, त्यांना गावी पोहोचल्यावरही त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न नाही, किती मजूरांचं नक्की स्थलांतर झालं याची आकडेवारी नाही, किती जणांचा मृत्यू झाला हे सरकारला माहित नाही, कितीजणांनी शहरांत परत येऊन पुन्हा काम सुरू केलं याचा हिशेब नाही. शहरांची चकचकीत शान जे मजूर आपल्या घामाने, कष्टाने घडवतात त्यांची कोणतीही दखल घेणं सरकारला उचित वाटलं नाही. विनोद काप्री यांच्या डॉक्युमेंटरीमधून हेच वारंवार जाणवतं की वर्षभरात या लोकांचं काय झालं असेल, ते घरी पोहोचले असतील का, त्यांना परत काही रोजगार, शेतीत काम मिळालं असेल का? ते परत आले का? बिनचेहऱ्यांच्या या माणसांचं स्थलांतर हे आधुनिक काळातलं जगातलं सर्वात मोठं स्थलांतर मानलं जातं. या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने इतिहास त्याची किमान काही अंशी नोंद होईल.

shruti.sg@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 11:15 am

Web Title: 1232 kms vinod kapris documentary on the plight of migrant workers avb 95
Next Stories
1 आजचा दिवस मला साजरा करू दे…
2 स्थानिक वि. उपरे : एक अटळ संस्कृती संघर्ष
3 Blog: एक असतो माकड पळवणारा…
Just Now!
X