विश्वचषक संघात कोणत्या खेळाडूला जागा मिळावी यावर सध्या बीसीसीआयमध्ये जो काही प्रकार सुरु आहे, त्याला सावळा गोंधळ हा एकमेव शब्द पुरेसा आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास टीम इंडियाच्या चौथ्या फळीतला भरवशाचा खेळाडू अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. संघात जागा मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात असताना, एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने रायुडूवर एकदा नव्हे तर दोनदा अन्याय केला. सर्वात प्रथम संघ जाहीर करताना निवड समितीने विजय शंकरच्या अष्टपैलू खेळाला प्राधान्य देत रायुडूला संधी नाकारली. यानंतर विजय शंकर विश्वचषक स्पर्धेत जखमी झाल्यानंतर रायुडूला संघात जागा मिळेल अशी आशा होती, मात्र निवड समितीने मयांक अग्रवालला पसंती देत रायुडूचे दरवाजे पुन्हा एकदा बंद केले. त्यामुळे गुणवत्ता असूनही सलग दोनदा नाकारल्यामुळे रायुडूने अखेरीस निवृत्ती स्विकारणं पसंत केलं.

चौथ्या क्रमांकावर कोणत्या खेळाडूने फलंदाजी करावी यावर टीम इंडियामध्ये विश्वचषकाआधीपासून उहापोह सुरु आहे. या जागोवर टीम इंडियाने अनेक प्रयोग करुन पाहिले. अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, मनिष पांडे, अंबाती रायुडू या सर्व फलंदाजांना टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने संधी दिली. या सर्वांमध्ये अंबाती रायुडूची कामगिरी ही अधिक विश्वसनीय होती. वर्षभरापूर्वी कर्णधार विराट कोहलीनेही अंबाती रायुडूच्या खेळीचं कौतुक करत, आमच्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीचा प्रश्न सुटला असं वक्तव्य केलं होतं.

विश्वचषकाआधीच्या मालिकांमध्ये कशी राहिली आहे रायुडूची कामगिरी??

आशिया चषकादरम्यान भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर रायुडू सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होता. आशिया चषकापासून ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यापर्यंतच्या काळात टीम इंडिया २४ सामने खेळली, त्यातील २१ सामन्यांमध्ये रायुडूला संधी देण्यात आली होती. यादरम्यान रायुडूने १ शतक आणि ४ अर्धशतकं झळकावली. न्यूझीलंड दौऱ्यातही रायुडूने ६३.३३ च्या सरासरीने धावा काढल्या होत्या. संघात पुनरागमन केल्यानंतर २० डावांमध्ये रायुडूने १४ वेळा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. यादरम्यान रायुडूने ४२.१८ च्या सरासरीने चौथ्या क्रमांकावर ४६४ धावा काढल्या होत्या.

मग नेमकी माशी शिंकली तरी कुठे??

वर नमूद केलेली आकडेवारी पाहता रायुडू हा चौथ्या क्रमांकावर योग्य उमेदवार आहे असं आपल्या सर्वांना वाटेल. मात्र काही गोष्टी या विश्वचषकादरम्यान रायुडूच्या विरोधात गेल्या. २०१८ पासून खेळलेल्या २० डावांमध्ये रायुडू ९ वेळा २५ किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर माघारी परतला. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात रायुडूने केलेली ९० धावांची खेळी ही एकमेव जमेची बाजू रायुडूच्या खात्यात होती. त्यामुळे साहजिकच विराट कोहली आणि निवड समितीचा रायुडूवरचा विश्वास उडाला. निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी आयपीएलमधली खेळाडूंची कामगिरी विश्वचषक संघासाठी ग्राह्य धरणार नाही असं वक्तव्य केलं होतं.

अवश्य वाचा – BLOG : महेंद्रसिंह धोनी – टीम इंडियाचं अवघड जागेचं दुखणं !

मात्र चेन्नईकडून खेळताना रायुडू आपला फॉर्म हरवून बसला आणि निवड समितीने विजय शंकरच्या खेळावर भाळत त्याला विश्वचषक संघाचं तिकीट दिलं. पण केवळ या कारणावरुन रायुडूला संघात स्थान नाकारणं ही गोष्ट मनाला पटत नाही. कारण विजय शंकर आणि अंबाती रायुडू या दोघांची तुलना केली असता, रायुडू हा कित्येत पटीने चांगला फलंदाज आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या मधल्या फळीची कामगिरी पाहता निवड समितीची निवड शंभर टक्के योग्य आहे असंही म्हणता येत नाही.

काही सामन्यांमधलं अपयश हे एखाद्या खेळाडूला संघात जागा नाकारण्याचा निकष ठरणार असेल, तर अनेक खेळाडूंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उठवता येईल. संघात जागा नाकारल्यानंतर रायुडूने ट्विटरवर शेलक्या शब्दांत बीसीसीआयला टोला लगावत आपली नाराजी व्यक्त केली होती. बीसीसीआयने नरमाईचं धोरणं स्विकारलं तरीही निवड समितीवर केलेली टीका अनेकांना रुचलेली नव्हती. IANS वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विजय शंकर माघारी परतल्यानंतर मयांक अग्रवालची निवड करणं हा निर्णय निवड समितीचा नसून संघ व्यवस्थापनाचा होता.

आता सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत, बाण भात्यामधून सुटलेला आहे. त्यामुळे या गोष्टींवर चर्चा करण्यात कितीपत योग्य आहे हे सांगता येणार नाही. मात्र रायुडूला नाकारुन बीसीसीआयने संघ निवडीमधला सावळा गोंधळ उघड केला एवढं मात्र नक्की.