12 August 2020

News Flash

BLOG : फिल्म फेअर अवॉर्डस नाईटमध्ये मराठी तडका….

हिंदी ग्लॅमरच्या तोडीस तोड अमृता खानविलकर, पूजा सावंत, सई ताह्मणकर यांची उपस्थिती लक्षवेधक ठरली.

दिलीप ठाकूर

फिल्मी पुरस्कारांच्या सध्याच्या सुकाळात फिल्म फेअर अवॉर्डस नाईटने आपले ग्लॅमर/गाॅसिप्स/वलय/वजन/दबदबा कायम ठेवण्यात झक्कास यश मिळवलेय. या पुरस्काराची ब्लॅक लेडी कोणाला बरे मिळतेय याची एकीकडे जबरा उत्कंठा, तर त्याच वेळेस या कलरफुल सोहळ्यात स्टेजवरचे मनोरंजन आणि उपस्थित स्टार्सचे प्रेझेंटेबल रुपडं, त्यांचे दिसणे/सजणे/बघणे/हायफाय फाडफाड इंग्लिश बोलणे/हसणे/खिदळणे हे सर्वच महत्वाचे असते. एक प्रकारचे चकाचक पॅकेजच म्हणा ना? बरं हे आजचे नाही. तर १९५४ पासून हे उत्तरोत्तर मुरत चाललयं. या पहिल्या वर्षी ‘द क्लेअर अवाॅर्डस ‘ या नावाने तो दिला गेला, त्यानंतर त्याचे नाव ‘फिल्म फेअर अवाॅर्डस ‘ असे झाले.

हिंदी चित्रपटसृष्टीचा हा जणू ब्रॅन्ड अॅम्बेसिडर सोहळा. त्यामुळे त्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळपास सगळेच स्टार येणारच. एकदा जुही चावला केवळ या इव्हेन्टससाठी जयपूरवरुन ‘हम है राही प्यार के ‘च्या शूटिंगवरुन एका दिवसासाठी मुंबईत आली. यावरून या अवाॅर्डसला हिंदी स्टार्स कसे गंभीरपणे (?) घेतात हे लक्षात येते. ( खरं तर ही अवाॅर्डस नाईट म्हणजे फोकसमध्ये राहण्याची मोठीच संधी).

त्यात मराठी कलाकारांना काही स्थान? तुम्हाला माहित नसेल, पण १९६३ सालापासून मराठी, तमिळ व तेलगू भाषिक चित्रपटानाही फिल्म फेअर अवाॅर्डस मिळू लागला. काही वर्षातच त्यात मल्याळम व कन्नड चित्रपटांचीही भर पडली. दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटांचा फिल्मफेअर अवाॅर्डस सोहळा दक्षिणेकडील शहरात होतो. तर मुंबईत बरीच वर्षे षण्मुखानंद हाॅलमधील इव्हेन्टसमध्ये अगदी सुरुवातीला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, दिग्दर्शक, नायक आणि नायिका एवढेच मोजके पुरस्कार दिले जात. तेही अगदी सुरुवातीला दिले जात, म्हणजे हिंदीतले मोठे स्टार्स येईपर्यंत हे सगळे उरकले जाई. पण फिल्म फेअर अवाॅर्डसच्या प्रतिष्ठेमुळे मराठी चित्रपटसृष्टी तक्रार करीत नसत. पण सत्तरच्या दशकात एक दोनदा मराठीला पुरस्कार जाहीरच न झाल्याने शिवसेनेने आंदोलनाचा इशारा देताच या पुरस्कारांची लगोलग घोषणा झाली. त्या काळात मराठीचे पुरस्कार घोषित असत. म्हणजे अगोदरच निवड होई आणि त्याच चार पाच जणांना आमंत्रण असे. तेही खूप महत्वाचे वाटे.

फिल्म फेअर अवाॅर्डस नाईटच्या हिंदी स्टार्समध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमर दिसू लागले ते नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला अश्विनी भावे, वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे यांच्यामुळे. त्या हिंदीत तर झेपावल्याच पण तिकडचे ग्लॅमरस ( क्वचित कोणी सेन्सुअस) फोटो सेशन, इंग्रजी मिडियातील चमकधमक, आवश्यक अशा डिसेंड फिल्मी पार्टीत हजर राहणे, स्वतःचा सेक्रेटरी हेही कल्चर त्यांनी आत्मसात केले. तेथे फक्त पडद्यावरची गुणवत्ता उपयोगी नसते, इतरही फंडे महत्वाचे असतात. काही वर्षांनी एक तर मराठी चित्रपटासाठी फिल्म फेअर अवाॅर्डसचा स्वतंत्र सोहळा रंगू लागला. एव्हाना मराठीत एकाच वर्षी शंभर -सव्वाशे चित्रपट प्रदर्शित होऊ लागल्याने ते गरजेचेही होतेच. तो बहुतेक नोव्हेंबरमध्ये असतो. त्याला मराठीतील आजच्या पिढीतील अभिनेते, अभिनेत्री आवर्जुन हजर असतातच. अगदी नवीन फॅशनच्या ड्रेसमध्ये ते लक्ष वेधतात. एका वर्षी मराठी अॅक्ट्रेस अशाच छान फॅशनच्या ड्रेसमध्ये जणू एकमेकींशी जणू जबरा स्पर्धा करीत असतानाच विद्या बालन चक्क पैठणीत आली आणि बाजी मारली. इव्हेन्टस फिल्म फेअर अवाॅर्डसचा असला तरी तो मराठी चित्रपटाचा आहे, याचे पक्के भान तिने ठेवले. गोष्ट खूप छोटी वाटते, पण खूपच लक्षात येणारी आहे.

पण मग हिंदी चित्रपटाच्या फिल्म फेअर अवाॅर्डस नाईटमध्ये मराठी तडका असायला/दिसायला हवाच की. आपल्या मराठी अभिनेत्रीही कैतरिना कैफ, जान्हवी कपूर, चित्रांगना सिंह, सोनम कपूर, सारा अली खान, सनी लिओनी यांच्याइतक्याच ग्लॅमरस ( तसेच बोल्ड, हाॅट, सेन्सुअस असेही मोकळेढाकळे शब्द वापरणे आजच्या ग्लोबल युगात फिट बसणारे आहे…. असं रुपडं नसलं तरी आपण म्हणणार, छे छे किती काळ मराठी अभिनेत्री काकूबाई राहणार?) हां तर, या हिंदी ग्लॅमरच्या तोडीस तोड अमृता खानविलकर, पूजा सावंत, सई ताह्मणकर यांची उपस्थिती लक्षवेधक ठरली. फोटोच किती आणि कसे आकर्षक आहेत बघा. या इव्हेन्टसच्या स्टाईल, कल्चर आणि नेचरशी ते सुसंगत आहे. आणि याचे त्यानी भान ठेवले याला बोनस गुण द्यायला हवा. सईला प्रवेश करताच एका चॅनलने बोलते केले, तेव्हा ती नेहमीप्रमाणे छान हसतच बोलू लागली, पण मस्त इंग्रजीत बोलली. खरंच खूप आवडलं. फिल्म फेअर सोहळा हिंदी चित्रपटासाठीचा असला तरी तो बराचसा इंग्रजाळलेला असतो, तेथे इंग्रजी मस्ट. आणखीन एक विशेष म्हणजे, तिकडे इव्हेन्टस रंगात आला असतानाच अमृता, सई यांची याच इव्हेन्टसमधील उपस्थिती सोशल मिडियात फोटोच्या रुपात पोस्ट होत राहिली. फिल्म फेअर अवाॅर्डस नाईटमध्ये त्या छा गेल्याचे पाहून लाईक्स, शेअर आणि काॅमेन्ट्सही सुरु झाल्या.

आजच्या डिजीटल पिढीला आपल्या चांगल्या गोष्टी चाहत्यांपर्यंत पोहचाव्यात याची असलेली सवय अगदी सही आहे. फिल्म फेअर अवाॅर्डस नाईट तर या व्यवसायाचा हायपाॅईंट आहे. फार पूर्वी तर त्याला आपल्याकडचे ऑस्कर म्हटले जाई. काहीशी तशीच नाॅमिनेशनची पध्दत, तशीच उत्कंठा आणि अगदी तशीच स्टार्सची मंदियाळी. त्यात आता मराठी विश्वास दिसू लागलाय. अभिनयातही मराठी अभिनेत्री हिंदीच्या तोडीस तोड आहेत याचाही प्रत्यय अधेमधे येतच असतो. मराठी कलाकार वक्तशीर आणि पाठांतर उत्तम म्हणून त्यांना हिंदी चित्रपटात भूमिका मिळतात असे म्हटले जाते, पण मराठी स्टार्स ग्लॅमरमध्येही सरस हे दाखवून देण्याची संधी म्हणजे, अशा भारी अवाॅर्डस नाईट. आता तर या अवाॅर्डसला जगभरातील मिडियात आणि चाहत्यांत एक्पोझर आहे. या मराठी स्टार्सचे प्रेझेंटेबल रुपडं खूप दूरवर पोहचलयं. आपला सिध्दार्थ जाधवही हजर होता आणि ‘सिम्बा ‘ची सारा अली खान हिच्यासोबतचा त्याचाही फोटो खूप महत्वाचा आहे. नीना कुलकर्णीही या इव्हेन्टसमध्ये सहभागी होती. श्रेयस तळपदेला मराठीचा म्हणायचा की हिंदीचा हा प्रश्न करण्यापेक्षा तोही भाव खाऊन गेला हे नक्कीच. हे मराठी स्टार्स अधूनमधून हिंदी चित्रपटात भूमिका साकारतात, तिकडच्या आठवणी रंगवून/खुलवून सांगतात. कोणी तिकडच्या कामाची पध्दत स्वीकारुन एकेक करत आणखीन काही हिंदी चित्रपटात भूमिका साकारतात, तर कोणी एक दोन हिंदी चित्रपटातच कंटाळते आणि म्हणते, माझे केवढे शूटिंग झाले होते, पण सिनेमा पडद्यावर आल्यावर मीच मला शोधत राहिले. जेमतेम दीड मिनिटाचा रोल राहिला हो, त्यापेक्षा आपला मराठी चित्रपट बरा…. पण असा विचार करणारे स्टार एक विसरतात की हिंदीत पैसा, प्रसिद्धी व समाधान आहेच, पण फिल्म फेअर अवाॅर्डस नाईटही आहे. हा बोनस आनंद आहे. आजच्या ग्लोबल युगात तर दृष्टिकोन आणि कक्षा वाढवायला हव्यात आणि त्याचा एक महत्वाचा आणि उपयुक्त असा मार्ग अशा अवाॅर्डस नाईटमधून नक्कीच जातो. या माध्यम व व्यवसायातील हे एक सर्वोत्तम स्थान आहे. ते महत्व हिंदी चित्रपटसृष्टीने दिलेय, विकसित केलेय. तेथे मराठी ठसा उमटलाय आणि यापुढेही तो असाच आपले अस्तित्व आणि प्रभाव दाखवेल असा आजच्या मराठी चित्रपटसृष्टीचा व्यापक आणि सकारात्मक दृष्टिकोन आहेच. आतापर्यंत त्याचीच कमतरता होती, यापुढे ती नक्कीच नसेल. कोणत्याही क्षेत्रातील बदल असा सर्वव्यापक हवा. तो जर होतोय, तर कौतुक हवेच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2019 9:18 am

Web Title: amruta khanvilkar pooja sawant sai tamhankar shine at red carpet at filmfare awards 2019
Next Stories
1 BLOG : मुंबई मधील दुर्लक्षित तोफांचा आढावा…
2 #WorldSparrowDay: सर्वांच्या लाडक्या ‘चिऊताई’ला लिहीलेलं ओपन लेटर
3 Blogs: नेते, कार्यकर्ता आणि निवडणुका !
Just Now!
X