काही लेखक ना अचानक वाचनात येतात म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दलच काहीच म्हणजे काहीच ठाऊक नसतं आणि अचानक त्यांचा एखादा विचार किंवा वाक्य वाचता आणि त्याच्याबद्दल वाचायला घेता. आपल्यापैकी अनेकांची व.पु. काळेंबरोबर अशीच ओळख झाली असणार. हो की नाही? आज वपुंच्या जयंतीबद्दल हा खास ब्लॉग…

व. पु. काळे… काही चांगल्या माणसांची नावं विचित्र असतात. काळे नावाच्या माणसाचं इतकं शुभ्र मन असू शकतं. वपुंने लिहिलेलं ‘वपुर्झा’ वाचायला घेतलं तेव्हा ठरवलं की वाक्य आवडेल ते पान फोल्ड करून ठेवायचं. जवळजवळ पन्नास पानांपर्यंत हा नियम वापरला आणि मग कळलं की पन्नास पैकी ३० पानं तर मी फोल्डच केलीयत. खरंच ‘वपुर्झा’ हे पुस्तक आहेच त्याच्या डिस्क्रीप्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे कधीही कुठेही उघडा आणि वाचायला सुरुवात करा, असं पुस्तक. ‘पार्टनर’ तर बोलता बोलता लाइफची फिलॉसॉफी शिकवून जातं. एकदा वाचून झाल्यावर आपण परत तेच वाक्य वाचतो आणि मग कळतं अरेच्या काय मस्त लिहीलंय हे. एकदम कडक, भारी असं वालं फिलींग येतं. एका एक सरांना सांगितलं की ‘वपूर्झा’ वाचतोय तर ते म्हणाले अरे अजून अशीच पुस्तकं वाचतोयस. याचे दोन अर्थ होतात एक तर ते पुस्तक मराठी वाचकासाठी बेसिक पुस्तक असावे (पुलंची असतात तशी) किंवा आत्ताशी वाचायला घेतलं हा दुसरा अर्थ. दोन्हींपैकी कोणताही अर्थ असला तरी पॉझिटीव्हच आहे. पण प्रश्न विचारणाऱ्या सरांचा बोलण्याचा टोन थोडा निगेटीव्ह वाटला. एकंदरित त्यांना ‘वपुर्झा’त काय घेण्यासारखं आहे किंवा तुकड्या तुकड्यांमध्ये तर आहे पुस्तक असं काहीसं म्हणायचं होतं. पण तसं बघायला गेलं तर बरंच काही आहे वपुर्झामध्ये घेण्यासारखं. वपुंबद्दल पूर्ण माहिती नेटवर उपलब्ध नाहीय पण ‘वपुर्झा भाग दोन’ (मेनका प्रकाशन) मधील माहितीनुसार वपुंचा पहिला कथासंग्रह ‘लोंबकळणारी माणसं’ नोव्हेंबर १९६० ला प्रकाशित झाला होता. सांगायचा मुद्दा इतकाच की २००१ साली त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी ४० वर्षांमध्ये ६० हून अधिक पुस्तके लिहीली. पण या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे ती आजही खूप रिलेव्हन्ट आहेत. ‘वपुर्झा’बद्दल सरांनी त्या टोनमध्ये विचारलं तेव्हा वाटलं, ‘असू दे ना एखादी गोष्ट आवडल्यावर तिच्याबरोबर कंटाळा येईपर्यंत खेळतात ना पोरं तसंच आहे हे पुस्तक.’ कंटाळा येईपर्यंत वपुमय व्हायला काही हरकत नाही पण इथेही अडचण आहे या माणसाच्या लेखनाचा कंटाळाही येत नाही. आहे ना लोचाच लोचा

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

वपुंसारख्या मोठ्या लेखकांचे लेखन वाचल्यावर दोन गोष्टी असू शकतात असं वाटतं. एक तर मोठ्या लोकांना दूरदृष्टी असते किंवा आपण त्यांनी लिहून ठेवल्यापासून इंचभरही प्रगती गेली नाहीय. यामध्ये वपुंनी तेव्हा करून ठेवलेले मुंबई लोकलचे वर्णन वाचावे. म्हणजे वपु आत्ता काल परवा माझ्या बाजूला उभे राहून प्रवास करत होते का असा प्रश्न पडवा इतकं आजच्या सारखं ताजं लिखाण आहे ते. तसं पुस्तक २००५ ला प्रकाशित झाल्याने आजच्या सारखी परिस्थिती असेल ही पण याचा अर्थ मागील तपभरात लोकलची सेवा सुधारलेली नाही असा अर्थ आपण काढू शकतो.

वपुंची कथा सांगण्याची पद्धत भन्नाट आहे. तुम्ही हसत हसत त्यात अडकत जाता आणि विचारचक्र सुरु करून ते तुम्हाला कथेच्या शेवटी ओपन एण्डेड म्हणतात तसं सोडून देतात. घे बाबा आता कर पुढचा विचार असं काहीतरी कथा संपल्यावर होतं. मग कथा वाचल्यावर आपण लेखकाच्या मनात शिरू पाहतो पुढे असं असं लिहीलं असतं नाही नाही असं नाही असं लिहीलं असतं. आपल्या आजूबाजूचे कॅरेक्टर किंवा कधीतरी हायपर एक्झॅगरेट केलेले (मराठीत त्याला अतिशयोक्ती) कॅरेक्टर असल्याने ते वाचताना गंमत वाटते पण आपण त्यांना रिलेट करू पाहतो. भन्नाट व्यक्तीरेखा, डिटेल नाही पण त्या व्यक्तीचा अंदाज येईल इतकं त्याचं व्यक्तीमत्व कथेमध्येच रंगवणं, ही व्यक्ती मला माहितीय असं वाचकाला वाटणं हे वपुंच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे. हे असं रिलेट करणारे लेखकच यशस्वी होतात हे वेगळं सांगायला नको.

कधीतरी कुठून तरी मेटाफरमधून (रुपक अलंकार) सुरु करतात आणि खऱ्या आय़ुष्यात आणून सोडतात. तर कधी सगळंच उपहासात्मक तर कधी अगदीच थेट थोड्यात पण लागेल असं लिहितात वपु. तुम्ही बोट ठेवा त्या विषयावर वपुंनी लिहून ठेवलं असेल असंच वाटतं मला. कारण सेक्स, रेल्वे, स्त्री-पुरुष संबंध, आई, उदासी, मन, हृदय, प्रेम, कागद, वही, विमान, शरीर, हत्ती, घोडा, बटाटा, टिकली, डोळे, समाज, धर्म, जग, देव, विश्व, चंद्र, फुल, तारे, ग्रह, माती, पाऊस, ऊन, वारा, गारा, हात, भविष्य, वर्तमान, भविष्य असं सगळं सगळं सगळं कुठे ना कुठे वपुंनी कव्हर केलंय.

न दिसणाऱ्या गोष्टी खूप जास्त सुंदर असतात हे वपु वाचल्यावर जाणवतं अगदी प्रकार्षाने. म्हणजे मन, विचार, प्रेम, बावळटपणा यासारख्या गोष्टींना प्रत्यक्षात आकार वगैरे नाही किंवा त्या दाखवू शकत नाही पण वपुंनी त्यांचे वेगळेपण कायमच मांडले आपल्या लिखाणामधून. materialistic आणि non materialistic अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींबद्दल थेट हृदयाला लागेल इतकं खोलंवर लिहीणं खूप कमी जणांना जमतं त्यातलेच वपु एक होते. काही लेखक मराठीमध्ये जन्माला आले हे त्यांच्यापेक्षा मराठी भाषेचे आणि मराठी भाषिकांचे भाग्य असे म्हणावे लागेल त्या यादीत वपुंचा नंबर लागतो अगदी वर कुठेतरी.

कथांमध्ये पण अशी पेरलीयत ना वाक्य जसं गरम गरम पोह्यांवर नाही आपण किसलेलं खोबरं पेरतो. मग ते खोबरं पोहे संपेर्यंत पुरवून पुरवून खातो तसंच वपुंच्या वाक्यांच एक वाक्य येऊन गेलं की ते वाचायचं आणि फोल्ड करून ठेवायचं. पुस्तक संपलं तरी ते खोबरं लक्षात राहतं कायमचं. उत्तम उदाहरण म्हणजे ‘पार्टनर’ ही कादंबरी. वपुंनी लिहिलेलं ‘काही खरे काही खोटं’ हे ही पुस्तक सुंदर आहे. सगळ्यात खास तो क्लार्कचा किस्सा गच्चीवर पतंग उडवण्याचा. मला कोणी, ‘काय कुठे?’ असं विचारल्यावर ‘ऑफीस’ उत्तर देतो. पण त्यानंतर येणाऱ्या ‘काय करतोय?’ या प्रश्नाला मी ती कथा वाचल्यापासून, ‘गच्चीवर पतंग उडवतोय’ असंच उत्तर देतो.

वपु काळे पेशाने वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट होते. त्यामुळे सौंदर्यदृष्टी नोकरीचाच भाग असल्याने जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनच वेगळा होता. त्यांच्यामधील लेखक जग पहायचा मग वपु पहायचे. म्हणूनच त्यांनी कदाचित शब्दांचे राजवाडे आणि महाल बांधले असावेत. हे असे शब्दमहल बांधणे त्यांना अगदी सहज म्हणजे मस्करी मस्करीत जमलं असावं. इतकं सहज मी मस्करी मस्करीत म्हणलो कारण त्यांच्या एकएका वाक्यावर पुस्तक लिहून काढता येईल किंवा ती स्टोरीचा बेस किंवा थीम म्हणून वापरता येतील अशी आहेत त्यांची वाक्ये. आता उदाहरणे घ्यायची झाली तर हेच बघा..

पहिलं वाक्य
पाऊस सर्वांसाठी पडतो पण प्रत्येकासाठी त्याचा अर्थ वेगळा असतो

याचा कसाही अर्थ घेता येईल
पहिला रोमॅन्टीक ते दोघे स्कुटीवर फिरतायत, कटिंग, लाँग ड्राइव्ह, भरपूर पाऊस, नावाला घातलेलं विंडशिटर, गाडीत सुरु असणारी गाणी, किकू किकू आवाज करत हलणारे वायपर्स आता या पावसाचा अर्थ रोमॅन्टिक तोच पाऊस २६ जुलैचा असला तर त्याचा अर्थ भयंकर किंवा काहीतरी आव्हानात्म होतो, तोच गावात दुष्काळानंतर पडलेला पाऊस म्हणजे आनंदवार्ताच, तोच पावसातून चालेली अंतयात्रा म्हणजे आनंदवार्ताचं दुसरं टोकं… असे बरेच अर्थ या पावसाचे काढता येतील वपु म्हणतात तसं.

दुसरं वाक्य
खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!!

हे माझ्याबरोबर रोजच होतं खऱ्याखुऱ्या आय़ुष्यात. वैचारिक लेव्हलला प्रेम, वेळ, एखाद्यात गुंतल्यानंतर केलेले प्रय़त्न या सगळ्या गोष्टी खर्च कॅटेगरीमध्ये बसवून हवा तसा अर्थ घेता येईल. अशा वाक्यांचे पर्वत करता येतील इतकी वाक्य वपुंच्या लेखणीतून पाझरली आहेत.

अनेक गोष्टी ते थेटही लिहायचे उदाहर्णार्थ

> ‘अंत’ आणि ‘एकांत’ ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
> कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
> Success is a relative term. More the success more is the number of relatives.

वपु त्यांच्या कोट्ससाठी आजच्या इंटरनेटच्या जगातही खूप जास्त लोकप्रिय आहेत. ऑडीओ कॅसेट्स आलेला मराठीतला पहिला लेखक म्हणून वपुंची ओळख आहे याबाबतीमध्ये त्यांनी पुलंना पण मागे टाकलंय हे विशेष. तर One liners आणि quotes चा बादशाह म्हणता येईल.

कितीही लिहलं तरी न संपणाऱ्या वपु या विषयावर मी इथे थांबतो. अनंत म्हणजे कीती रे? या प्रश्नाला उत्तर देता येत नाही कारण अनंत हे अनंत आहे. तशीच ही पोस्ट लांबत जाईल लिहीत राहिल्यास कारण वपु आणि त्यांचे लिखाण कनेक्ट होण्याच्या बाबतमीमध्ये अनंत शक्यतांनी भरलेलं आहे म्हणूनच इथे थांबतोय.

अशा वपुंचे अनेक कोट्स तुम्हाला सापडतील नेटवर त्यांच्या नावाने सर्च मारलं तर, तरीही जाता जाता वपुंचे आणखी दोन मस्त कोट्स तुमच्याबरोबर सोडून जातोय कारण ब्लॉग हाय पिचवर एण्ड व्हावा अशी इच्छा आहे.

प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्यंत असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!

आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!

(तळटीप: एखाद्याचा सुंदर बर्थ डे गिफ्ट द्याचं असेल ना अगदी डोळे बंद करूनही तुम्ही ‘वपुर्झा’ त्याला भेट म्हणून देऊ शकता आयुष्यभर नाव काढेल तो तुमचं.)

– स्वप्निल घंगाळे
swapnil.ghangale@loksatta.com