– सुहास जोशी

जॉन लोगी बेअर्डने २ ऑक्टोबर १९२५ साली ‘स्टूकी बिल’ ही कृष्णधवल चित्रफीत (सेकंदाला पाच चित्रे या गतीने) प्रक्षेपित केली. दूरचित्रवाणीचं हे जगातलं पहिलंवहिलं प्रक्षेपण. या पद्धतीला मेकॅनिकल टेलिव्हिजन असं संबोधलं गेलं. त्यानंतर ४७ वर्षांनी दूरचित्रवाणीवर मराठी मुद्रा अवतरली. जर्मन तंत्रज्ञांनी तांत्रिक घडी बसवून दिली आणि २ ऑक्टोबर १९७२ साली मुंबई दूरदर्शनची सुरुवात झाली. लोककला, नाटक आणि चित्रपट या मनोरंजनाच्या चढत्या पायरीवर आलेलं टेलिव्हिजन थेट तुमच्या-आमच्या दिवाणखाण्यात विसावलं. दूरदर्शन सरकारी माध्यम असल्यामुळे ‘मनोरंजनातून प्रबोधन’ या बोधवाक्यावर सारं काही बेतू लागलं.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

दूरदर्शनच्या कार्यक्रमांनी (ज्याला प्रोग्राम म्हटलं जाई) स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यापैकी एक म्हणजे ‘गजरा’. वेगवेगळ्या विषयांवर आधारित नृत्य, गायन, प्रहसनं, स्किट यांचा समावेश त्यामध्ये असे. एनएसडीमधून आलेल्या विनायक चासकर यांची ही निर्मिती. दर बुधवारी सायंकाळी ८.३० वाजता सादर होणाऱ्या एक तासाच्या या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना टेलिव्हिजनने चेहरा मिळवून दिला. अर्थात ठरावीक कलाकारांचा संच आणि सुरुवात- मध्य- शेवट अशी रचना असणारी गोष्ट यात नव्हती.

पहिली मराठी सीरिज – चिमणराव

गजरा चांगलाच फुलला असताना मालिकांच्या जन्मास कारणीभूत ठरणारी एक घटना घडली. लखनौ दूरदर्शनवर १९७६ मध्ये एक विनोदी कार्यक्रम सुरू झाला होता. मुंबई केंद्राचे तत्कालिन निर्देशक व्ही. एच. एस. शास्त्री यांनी आपल्याकडेदेखील असं काही सुरू करता येईल का याची विचारणा केली. दूरदर्शनवरील तत्कालीन निर्मात्यांनी अनेक पर्याय चाचपून पाहिले. निर्मात्या विजया धुमाळे जोगळेकर त्यापैकीच एक. त्यांना शालेय अभ्यासक्रमातली चिं. वि. जोशी यांची चिमणरावांची कथा आठवली. चिमणराव- गुंडय़ाभाऊंच्या कथांवर आधारित काही करता येईल का यावर त्यांचा विचार सुरू होता आणि त्याच वेळी श्रीधर घैसासांनी चिंविंच्या दोन कथांचे, पटकथा संवाद लिहून याकूब सईदना दाखविले होते. हा सारा योगायोग जुळून आला नि पहिल्या मराठी मालिकेचा जन्म झाला. चिमणरावाचे स्क्रिप्ट सर्वानाच मान्य झाले. पात्रांचा शोध सुरू झाला. त्या वेळी गजरामध्ये दिलीप प्रभावळकरांनी एक स्किट सादर केलं होतं. ‘पंचवीस एक्के पंचवीस’. एका सामान्य वकुबाच्या पण मोठय़ा आविर्भावात वावरणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील पंचवीस-पन्नास-पंचाहत्तर असे टप्पे त्यामध्ये मांडले होते. विजया धुमाळेंना प्रभावळकरांच्या सादरीकरणातला भाबडेपणा भावला, त्या व्यक्तीत चिमणराव दिसले. हेच चिमणराव हे नक्की झालं. बाळ कर्वेना पाहिल्यावर तर थेट हाती सोटा घेतलेला गुंडय़ाभाऊच विजयाबाईंसमोर उभा राहिला. नीरज माईणकर मोरू, अरुणा पुरोहित मैना, स्मिता पावसकर काऊ, सुलभा कोरान्ने चिमणरावांची आई, आणि राघूच्या भूमिकेसाठी गणेश मतकरी असं चिमणरावांचं कुटुंब तयार झालं.

मर्यादित बजेटमुळे दूरदर्शनचा स्टुडिओच शूटिंगसाठी वापरावा लागणार होता. पटकथा संवादांना अंतिम स्वरूप येऊ लागलं तसं तालमींना वेग येऊ लागला. सारेच कलाकार नोकरी करणारे आणि दैनंदिन कामकाजातून स्टुडिओ उपलब्ध नसल्यामुळे शूटिंगसाठी रविवारशिवाय पर्याय नव्हता. दूरदर्शनची मोजकी प्रॉपर्टी, मोजकाच कपडेपट (नऊवारी साडय़ा तर विजया धुमाळेंनी घरूनच आणल्या होत्या), तीन कॅमेरा सेटअप आणि दोन इंची टेपवर चित्रीकरण सुरू झालं. (तेव्हा शूटिंगला रेकॉर्डिग म्हटले जायचे.) शूटिंगच्या वेळेस भरपूर धम्माल होत असे. अमराठी कॅमेरामननादेखील कधी कधी हसू आवरायचे नाही. (एकदा तर असे हसणे रेकॉर्डदेखील झाले होते). आणि १९७७ साली चिमणराव-गुंडय़ाभाऊ छोटय़ा पडद्यावर अवतरले.

मुळात तेव्हा टीव्ही असणं, तो पाहणं हेच अप्रूप होतं. अशा वेळी निखळ करमणूक करणारी, सर्वाना आपलीशी वाटणारी कथा, छोटय़ा पडद्यावर अनेकांच्या घरातच अवतरल्यामुळे साहजिकच तुफान प्रतिसाद मिळाला. महिन्यातून एका रविवारी सकाळी (दिल्ली दूरदर्शनच्या सोयीनुसार) भेटणारे चिमणराव गुंडय़ाभाऊ सर्वानाच भावले. लोक त्या प्रतिमांमध्ये अडकले. चार वर्षांत जवळपास ३६ भाग प्रक्षेपित झाले. नंतर दूरदर्शनने त्याचे पुन:प्रक्षेपणदेखील केलं. एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे अनेक अमराठी प्रेक्षकांनीदेखील या मालिकेची प्रशंसा केली होती. चिमणराव म्हणजे प्रभावळकर आणि प्रभावळकर म्हणजे चिमणराव हे समीकरण सर्वसामान्यांमध्ये अगदी फिट्ट बसले, अगदी आजदेखील प्रभावळकरांना अनेक कार्यक्रमांत चिमणरावाचे संवाद त्या टिपिकल आवाजात म्हणून दाखवायची मागणी केली जाते. मालिकेच्या लोकप्रियतेनंतर चिमणराव गुंडय़ाभाऊ हा चित्रपटदेखील झाला.

ठरावीक कलाकारांचा एक संच (कथानकानुसार नवीन कलाकारांचा समावेश) आणि त्यांच्या आयुष्यातील विविध घटनांचे चित्रीकरण अशी सर्वसाधारण चिमणराव गुंडय़ाभाऊची रचना होती. प्रत्येक एपिसोडची कथा निराळी. एकच एक गोष्ट सर्व भागात विभागलेली नसायची. टीव्हीच्या परिभाषेत यालाच सीरिज म्हणावे लागेल. तोपर्यंत दूरदर्शनवर कथांचे माध्यमांतर होत असे, पण एक ठरावीक कलाकारांचा संच, तोदेखील सर्वच भागांमध्ये अशी रचना नव्हती. अर्थातच चिमणरावला पहिल्या मराठी सीरिजचा मान मिळाला.

 

साभार…

‘लोकप्रभा’ 2015 च्या दिवाळी अंकातील ‘मालिकांची चाळीस वर्षे’ या प्रदीर्घ लेखातील संपादित अंश. 1976 ते 2015 या काळातील मराठी मालिकांच्या विश्वावरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा.