विनायक परब
एखाद्याने दिमाखदार टोपी घातलेली असली की त्याला या टोपीखाली दडलंय काय असं हमखास विचारलं जातं. कोणत्याही टोपीखाली जरा बरा मेंदू असावा एवढीच अपेक्षा करावी असे हल्लीचे दिवस आहेत. माकड आणि टोपीवाल्याच्या गोष्टीत घडतं तसं एखाद्याच्या पेटीमधल्या टोप्या पळवणारी माकडं आणि दुसऱ्याची टोपी तिसऱ्याला घालून आपला फायदा करून घेणारी माणसं आजकाल जागोजागी दिसतात.
डिकन्सन या ह्यूस्टनचं उपनगर असलेल्या शहरात मात्र टोपीमधून चक्क महापौरपद निघालं.
झालं असं की ह्यूस्टनपासून ४० किलोमीटरवर असलेल्या डिकन्सन या उपनगराचं महापौरपद भूषवू इछ्छिणाऱ्या जेनिफर लॉरेन्स आणि शेन स्कीपवर्थ या दोघांना आपल्या नशिबाचा डाव लावण्यासाठी एका टोपीचा आधार घ्यावा लागला. कारण त्या दोघांपैकी डिकन्सनचा महापौर कोण होणार हे एका टोपीमध्ये दडलं होतं.
डिकन्सनची एकूण लोकसंख्या २१ हजार आहे. जेनिफर लॉरेन्स आणि शेन स्कीपवर्थ या दोघांनीही गेल्या महिन्यात डिकन्सनच्या महापौरपदाची निवडणूक लढवली आणि त्या दोघांनाही १,०१० मतं मिळाली. या आठवड्यात पुन्हा मतमोजणी केल्या नंतरही दोघांचीही मतं सारखीच भरली.
मग काय करणार?
टेक्सासच्या कायद्यानुसार निवडणुकीत अशा पद्धतीने दोन्ही बाजूंची मतं सारखीच असतील तर नशिबाचा डाव लावला जातो. आपल्याकडे जसं नाणं घेऊन छापा काटा करतात तसंच काहीसं तिथेही केलं जातं. तिथे एका टोपीत दोन्ही उमेदवारांची नावं लिहिलेले पिंग पाँग बॉल ठेवले जातात. समारंभपूर्वक टोपीत हात घालून त्यातला एक बॉल काढला जातो. त्यावर ज्याचं नाव असेल तो जिंकला.
तर या खेळात शेन स्कीपवर्थच्या नावाचा बॉल बाहेर निघाला आणि ते डिकन्सनचे महापौर झाले. पण विशेष म्हणजे दहा मिनिटांच्या या सगळ्या प्रक्रियेनंतर त्यांची प्रतिस्पर्धी असलेल्या जेनिफर लॉरेन्स यांनी आपण हरल्यावर आपली फसवणूक झाली असा कांगावा करणं असे ट्रम्पसारखे काही प्रकार केले नाहीत. उलट आपला या प्रक्रियेवर विश्वास असून ही निवड नियमाप्रमाणेच झाल्याचं मान्य केलं.
थोडक्यात या गल्लीतल्या निवडणुकीने अमेरिकेत सगळेच राजकारणी ट्रम्पतात्यांसारखे नाहीत हे सिद्ध केलं.
समाप्त