News Flash

BLOG: मरणाच्या बातम्यांमध्ये कसला ब्रेकिंग न्यूजचा हव्यास!

ही स्पर्धा करताना आपण मृताच्या टाळूवरचं लोणी तर खात नाही ना? याचा विचार होणं अगत्याचं आहे

प्रतीकात्मक छायाचित्र

इलेक्ट्रॉनिक व डिजिटल प्रसारमाध्यमांमध्ये बातमी कुणी ब्रेक केली, म्हणजे सर्वात आधी कुणी दाखवली याला महत्त्व आहे. परंतु ही स्पर्धा करतानाही आपण मृताच्या टाळूवरचं लोणी तर खात नाही ना? याचा विचार होणं अगत्याचं आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अत्यवस्थ असल्याच्या बातमीमुळे सारा देश चिंता व्यक्त करत होता. नक्की काय स्थिती आहे हे जाणण्याचा प्रयत्न करत होता. वाजपेयी हे अशा मोजक्या राजकीय नेत्यांपैकी आहेत ज्यांची लोकप्रियता पक्षीय राजकारणच नाही तर जाती धर्मांच्या भेदापलीकडे जाते. अजातशत्रू व कवीमनाच्या वाजपेयींचा चाहता वर्ग समाजाच्या सगळ्या स्तरांमध्ये असून पक्षांच्या भिंतीही या प्रेमाच्या आड येत नाहीत.

अशा वाजपेयींच्या निधनाची बातमी ब्रेक करायची घाईच झाल्यासारखं वर्तन एका आघाडीच्या मराठी वृत्तवाहिनीनं केलं. दुपारी अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान या वृत्तवाहिनीनं अटल वाजपेयी यांचं निधन अशी बातमी दाखवली. वास्तविक, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेऊन रुग्णालयातून निघाले होते. एम्सचं मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं नव्हतं. कुणीही अधिकृतपणे म्हणजे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं नव्हतं, परंतु या कशाचाही सारासार विचार न करता या वृत्तवाहिनीनं केवळ ब्रेकिंगच्या हव्यासापोटी वाजपेयींचं निधन झाल्याची बातमी दाखवून चिंधीगिरी केली. काही वेळातच ती चूक लक्षात आल्यावर लगेचच, वाजपेयींची प्रकृती चिंताजनक, लवकरच जारी होणारं मेडिकल बुलेटिन वगैरे दाखवून त्यांनी चूक झाकण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाची बाब म्हणजे या वृत्तवाहिनीनं केलेल्या या घोडचुकीची पुनरावृत्ती अन्य काही वाहिन्यांनी केली. हे वृत्त खरं आहे की नाही याची शहानिशा न करता त्यांनीही वाजपेयींच्या निधनाची बातमी केली. एका वृत्तवाहिनीनं तर नंतर दिलगिरी व्यक्त केली आणि अन्य एका वृत्तवाहिनीनं आम्ही असं काही केलं नाही असं सांगत इतर वाहिन्यांना उतावीळ संबोधत आपली पाठ थोपटून घेतली. वेळ काय? काळ काय? आपण करतोय काय? याचं ताळतंत्र सुटलं की असे प्रकार होतात. एक धावला म्हणून सगळे धावतात, तो खड्यात गेला की सगळे खड्यात असा हा प्रकार आहे.

बरं हा प्रकार आजचं घडलाय नी या एकाच वृत्त वाहिनीनं केलाय असं नाही. याआधीही असे प्रकार घडले आहेत. जयललितांच्या निधनाच्या वेळीही असाच प्रकार घडला होता. एका आघाडीच्या इंग्रजी प्रसारमाध्यमानं अर्धा पाऊण तास आधीच जयललिता गेल्याचं फेसबुक लाइव्ह केलं होतं. प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी मृत्यूच्या बातम्या देताना खरंतर खूपच संवेदनशील राहण्याची गरज आहे. अशी बातमी इतरांपेक्षा दोन-चार मिनिटं आधी दिलीत तर त्यात काय फार मोठा तीर मारला असं नाही.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनाची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या ऑनलाइन एडिशननं सूत्रांच्यावर विसंबून राहत चक्क एक दिवस आधीच दिली. विलासरावांसारख्या ऐन भरात व लोकप्रिय असलेल्या व्यक्तिमत्त्वाबाबत देणं त्या पत्रकारांना फारच महागात पडलं. या चुकीसाठी तीन जणांना कामावरून काढण्यात आलं.

काही प्रसारमाध्यमांनी विकिपीडियाचा हवाला देत निधनाच्या बातम्या केल्या आणि नंतर त्या मागे घेण्याची वेळ आल्याचेही प्रकार घडले आहेत. निधनाच्या बातम्यांमध्ये ब्रेकिंगचा सोस धरू नये, विकिपीडिया व कथित खास सूत्रांचे हवाले ग्राह्य मानू नयेत आणि केवळ अधिकृत व्यक्तिंनी तशी घोषणा करेपर्यंत धीर धरावा, ही अपेक्षा बाळगणं काही गैर नाही. विशेषत: सध्याच्या व्हॉट्स अॅप व फेसबुकवरून अफवा पसरल्या जाण्याच्या काळात तर हे जास्तच लागू आहे आणि त्यामुळं ताक फुंकूनच प्यायलेलं बरं, अन्यथा तोंड भाजणं नक्की आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2018 7:02 pm

Web Title: disgusting attitude of exploiting deaths for breaking news by some sections of media
Next Stories
1 वाजपेयींच्या जाण्यानी एका युगाचा अंत, नि:शब्द! – पंतप्रधान
2 भारतमातेने आज आपला सुपुत्र गमावला-राहुल गांधी
3 Video : अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता, त्यांच्याच आवाजात…
Just Now!
X