– मनोज भोयर

28 एप्रिलला पुन्हा माझी एक टेस्ट व्हायची होती. पहाटे 6 वाजता डॉक्टरनी मला अचानक झोपेतून उठवलं आणि माझी करोनाची टेस्ट घेतली ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. कारण या टेस्टवरूनच गेल्या काही दिवसांमध्ये माझ्यातील प्रतिकारशक्ती किती वाढली आणि करोनाने माझा पिच्छा सोडला का हे मला समजणार होत..?

दिवसभरामध्ये मी फार काही चिंता केली नाही की, या टेस्टचा रिझल्ट नेमका काय येणार आहे मात्र रात्री सहज मी माझ्या डॉक्टरला एका वेगळ्या कामासाठी फोन केला… आणि तेव्हा बोलण्याच्या ओघात त्यांनी मला सांगितलं की, तुमच्या टेस्टचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह आलाय. पुन्हा छातीत घबराट निर्माण झाली.

आता हा करोना आपल्यासाठी नवीन…आणि ही तिसरी टेस्ट पॉझिटिव्ह येणं माझ्यासाठी धक्कादायक होतं. भीतीदायक होतं. पण तो धक्का मी पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्येच पचवला. आणि माझ्या घरच्या व्यक्तींना मी या टेस्टबद्दलची माहिती दिली. ती रात्र माझी तशीच गेली. ती नॉर्मल घालवण्याचा प्रयत्न केला.

29 तारखेला मात्र मग मी विचार केला की, आता मात्र आपण संसर्गजन्य रुग्णांच्या सोबत आहोत आणि आपल्यात दिसणारी लक्षणं ही देखील केव्हाच संपली आहेत. म्हणजे पहिल्या दिवशी थंडी वाजून येणारा ताप जो 21 तारखेच्या रात्रीला आला होता. तो ताप चार दिवसांनंतर निघून गेला होता. पण त्यामुळे माझ्या शरीरामध्ये अशक्तपणा आला होता आणि तो अशक्तपणाही निघून गेला होता. खरंतर माझ्या घरच्यांचा आणि जवळच्या मित्रांचाही माझ्यावर वाढता दबाव होता की, मी आता इथून दुसर्‍या ठिकाणी आराम करायला जायला हवं. इथे एक गोष्ट मात्र नक्की होती की, डॉक्टरांची ट्रिटमेंट खूप चांगली मिळत होती.
बाकी खूप नसला तरी बरा आहार रोजच्या अंडी सोबत मिळत होता..
व्यवस्थापन इतक्या सगळ्या रुग्णांसाठी झटत होतं..
मला कोणतीही तक्रार नव्हती.

कारण अत्यंत कमी मनुष्यबळामध्ये त्या रुग्णालयातील व्यवस्थापनाला काम करताना त्यांचीही तारेवरची कसरत होत होती. स्टाफ खूप दुरून आपला जीव धोक्यात घालून इथे येत होता. मला या सर्व गोष्टींची जाणीव होती.. आता इथून आपल्याला आणखी चांगल्या ठिकाणी जाता आलं तर जावं,पुढचा रिपोर्ट निगेटिव्ह येण्यासाठी आणखी काही प्रयत्न करावा असं माझ्या मनाला आवर्जून वाटलं. आणि तसा जवळच्या लोकांचा आग्रहही होता. जवळपास आठ दिवस या ठिकाणी मी घालवलेले होतेच. त्यामुळे तिथून अन्य ठिकाणी जाण्याचा मी निर्णय घेतला. तस मी डॉक्टरांनाही कळवल. इन्शुरन्सचे पेपर मोबाईल वर मागवून ठेवले.. जवळच्या कोणत्या खाजगी रुग्णालयात जाता येईल याची शोधाशोध सुरू झाली.

अखेर काही माहिती काढून झाल्यावर ज्या माझ्या 53 माध्यमकर्मींवर गोरेगावच्या फर्न हॉटेल मध्ये उपचार सुरू होते तिथेच शेवटी जायचं ठरलं. माझी तिथून डिस्चार्जची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आणि 29 एप्रिलला रात्री 9.30 वाजता
अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था झाल्यावर मी तिथून निघालो. सहकारी माझ्या मित्राला सोडून जाताना मनात अपराधी भाव होते. पण निर्णय झाला. जागे असलेल्या ओळखीच्या सर्वांचा जड अंतःकरणाने निरोप घेतला. त्यापूर्वी सेंट जॉर्ज रुग्णालयातून निघण्यापूर्वी मी पुन्हा एकदा रुग्णालयाच्या खिडकीत उभा राहिलो आणि त्या खिडकीतून दिसणार्‍या गोदीकडे आणि त्यात तळ ठोकलेल्या जहाजाकडे पाहत दूरवर नजर टाकली. मी कमालीचा शांत झालो होतो आणि त्याच शांततेत मी समुद्रातील पाण्याकडे पाहत राहिलो. समुद्रात पाणी कमी आणि बोटी जास्त दिसत होत्या…
एकेदिवशी बोट येईल आणि सर्वांना करोनामुक्त झाल्यावर घेवून जाईल
असं कायम गोदीकडे नजर टाकल्यावर मला वाटत राहायचं.
पण आज मीच एकटा करोनाला सोबत घेवून दुसऱ्या मुक्कामाला निघालो होतो.

नर्सने माझ्या हातावर कॉरेन्टाईनचा शिक्का मारला. माझ्या डिस्चार्जचे पेपर्स हातात सोपवले संशयीत रुग्णांच्या वॉर्डमधील दोन दिवस आणि पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डमधील सहा दिवस, असे मिळून आठ दिवसांनंतर माझा इथला मुक्काम मी संपवला होता.
जाताना अनेक आठवणी मनात भराभर आल्या.
पार्किन्सने आजारी असलेल्या तिथल्या एका रुग्णाला मी अधूनमधून मदत करत होतो. एव्हाना त्याचं चालणं-बोलणं आणि खाण पिणं सर्वच बंद झालं होतं. त्या रुग्णाला मी एकदा डोळे भरून पाहिलं. याचं कारण इतकंच होतं की, त्या आठ दिवसांमध्ये त्या रुग्णाची मला शक्य होईल तेवढी मदत करता आली होती. त्याच्या त्या वेदनादायी आजारी जिवनात थोडासा आनंद निर्माण करण्याचाही मी प्रयत्न केला होता. अशा त्या अल्पपरिचयाच्या रुग्णाला आता मी सोडून जाणार होतो. बाकीच्या रुग्णांवरही उपचार सुरू होते. यानिमित्तानं अब्दुल चाचा नावाच्या एका भल्या माणसाशी माझी ओळख झाली होती. पण तो त्याच रात्री पायधुनीला बरा होवून आपल्या मुलाच्या घरी निघून गेला होता. त्यामुळे त्यांना मला निघताना भेटता आलं नाही. यानंतर जे ओळखीचे चेहरे झाले होते, त्यांनाही भेटून मी निघालो होतो. तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर एकच प्रश्‍न होता. तो म्हणजे, मी निघालो तरी कुठे? पण त्यांनाही मी जुजबी माहिती दिली. पण त्यावेळेस मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की, आपल्याला धीर देणारा माणूस जर निघून गेला तर तो फार मोठा धक्का असतो. हाच धक्का मला निघताना पाहून मी त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे पाहत होतो. मी तो धक्का वाचत होतो. मला हेही स्पष्टपणे जाणवत होतं की, माझं जाणं यांच्या मनामध्ये अनेक प्रश्‍न निर्माण करून जात आहे. मुळात त्यांनाही लवकर बरं होवून त्यांच्या घरी जायचं होतं. मात्र, काही कारणास्तव त्यांचा तिथला मुक्काम लांबत होता. कारण त्यांना इतरही आजार होते. त्यामुळे डॉक्टर त्यांची निगेटिव्ह टेस्ट आली तरीही त्यांची इतर आजारपणं जोवर बरी होत नाहीत, तोवर त्यांना सोडत नव्हते.

आमची देखभाल करण्यासाठी ज्या नर्स येत होत्या, त्यांचाही निरोप घेतला. त्या नर्स खूप दुरून इथे येत होत्या. एकीला तीन-चार वर्षांची मुलगीही होती. अशा परिस्थितीही त्या रुग्णालयात येवून आपलं कर्तव्य बजावत होत्या. त्याबद्दल मी त्यांचं कौतुकही केलं. दोनेक मिनिटं त्यांच्याशी गप्पाही मारल्या… यावेळी त्या म्हणाल्या की, आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की, इथे पुरेशी व्यवस्था नाहीय. पण आमचा नाईलाज आहे. यावर मी त्यांना म्हणालो की, माझी त्याबद्दल अजिबातच तक्रार नाहीय. कारण ज्या रुग्णालयानं शेकडो रुग्णांना यापूर्वीही आधार दिलाय आणि आताही तो आधार दिला जातोय. इतकंच नाही तर अत्यंत धोक्याच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार असे तुम्ही सगळे जण काम करत आहात. त्यामुळे मला या रुग्णालयाबद्दल कोणतीच तक्रारच नाहीय. मी केवळ माझ्या सोयीसाठी इथून जातोय, इतकंच मी मला त्यांच्याशी बोलता आल. त्यांना नमस्कार करून दोन मजले खाली उतरून मी बाहेर पडलो. ज्या हॉस्पिटलमध्ये मी 22 तारखेला प्रवेश केला ती सकाळची वेळ होती आणि आता जेव्हा मी त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडलो तेव्हा ती रात्रीची वेळ होती. एक पोलीस कॉन्स्टेबल तेवढा बाहेर बसलेला होता. त्या व्यतिरिक्त त्या हॉस्पिटलमध्ये चीटपाखरूही नव्हतं. सूई पडली तरी आवाजा येईल इतकी भीषण शांतता तिथे होती आणि ती शांतता अंगावर येत होती…

(लेखक जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे सहसंपादक आहेत.)