24 January 2021

News Flash

त्याने दिली टकिलाची ऑफर

आम्ही तुम्हाला आमच्याकडे असलेली टकीला प्यायला देऊ. पण आमचं बाळ अशा पद्धतीने फार काळ रडणार नाही यासाठी कृपा करून तुम्हीही प्रार्थना करा.

सुनीता कुलकर्णी

बाळ रडतंय? ग्राइप वॉटर दे त्याला. तू लहान असताना तुलादेखील मी तेच देत होते… असं सांगणारी आई, आजी, पणजी अशी एक जाहिरात एकेकाळी खूप लोकप्रिय होती. पण आपल्याच घरातलं नाही तर शेजाऱ्याच्या घरातलं बाळ रडत असेल तरी डोकावून बघण्याची, त्याला काय झालं असेल याचा अंदाज करून उपाय सुचवण्याची पद्धत आजही आपल्याकडे आहे.

एवढंच नाही तर शेजाऱ्याचं तान्हं बाळ रडत असेल तरी आपल्याकडे त्या रडण्याचा कुणालाही त्रास होत नाही. त्या बाळाचं हसणं, खिदळणंच नाही तर त्याचं रडणंही आपल्याकडे गोड मानून घेतलं जातं. आपल्या घरात कधी ना कधी लहान मूल असतं आणि ते रडतं तसंच शेजाऱ्याच्या घरातही असणार आणि ते रडणार… हाच तर जीवनाचा वाहता प्रवाह आहे याचा समंजस स्वीकार आपण केलेला असतो.

अमेरिकेत शेजाऱ्यांमध्ये आपल्यासारखे संबंध नसतात असं आपण अनेदका ऐकलं वाचलं असतं. शेजाऱ्यांच्या लहानशा त्रासामुळे लगेचच पोलिसांना बोलवलं गेल्याचे तिथले किस्से आपण अनेकदा ऐकलेले असतात. पण लहान बाळाच्या बाबतीत सगळेचजण बहुधा सहनशील, समजूतदार असतात.

अमेरिकेत मॅथ्यू आणि क्ली वॉर्ड या जोडप्याने आपल्या चार महिन्याच्या बाळाच्या रडण्यामुळे शेजाऱ्यांना त्रास होतो आहे हे लक्षात घेऊन माफी मागणारं पत्र त्यांना लिहिलं आणि ते इंटरनेटवर चांगलंच व्हायरल झालं आहे.

आपल्या पत्रात ते म्हणतात, आमच्या घरातून रोज रात्री बाळाच्या रडण्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आम्हाला माफ करा. तुम्हाला बाळाच्या रडण्याचा आवाज येईल पण तो आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नाही तर आम्ही त्याला रात्री झोपण्याचं प्रशिक्षण देत असल्यामुळे आहे. मी त्याच्या खोलीत दर थोड्या वेळाने जाईन, पण त्याला रडू देईन. रडल्यानंतर दमून बाळ शांत झोपेल. आम्ही अधून मधून गॅप घेऊन हा प्रयोग करून बघणार आहोत. तुम्हाला त्याच्या रडण्याचा त्रास झाला तर तुम्ही आमचं दार वाजवू शकता. आम्ही तुम्हाला आमच्याकडे असलेली टकीला प्यायला देऊ. पण आमचं बाळ अशा पद्धतीने फार काळ रडणार नाही यासाठी कृपा करून तुम्हीही प्रार्थना करा. तरीही तुम्हाला हा आवाज सहन होत नसेल तर तुम्ही तुमचा टीव्ही आणखी मोठ्याने लावू शकता. आणि हो तुम्हाला दूध, साखर, अंडी, टकीला यातलं काहीही हवं असेल तर तुम्ही आमच्याकडे मागायला येऊ शकता.

तुमचे थकलेले आणि माफी मागणारे शेजारी
या कृतीने त्यांचे शेजारी इतके हेलावून गेले की त्यांनी ते पत्रच ट्वीट केलं. एवढंच नाही तर कुणी आपण या जोडप्यासाठी कुकीज बेक करत असल्याचं ट्वीट केलं तर कुणी बाळासाठी टॉयलेटरीजचा सेट तर त्याच्या आईबाबांसाठी केक, दारुची बाटली भेट म्हणून पाठवून दिली.

मॅथ्यू आणि क्ली या सकारात्मक प्रतिसादाने भारावून गेले आहेत. ते म्हणतात, आम्हाला वाटत होतं की आम्ही आमचं म्हणणं मांडणारं पत्र लिहू, ते शेजाऱ्यांच्या दाराला अडकवू, ते पत्र वाचतील आणि आमच्या भावना समजून घेतील. आम्हाला अशा पद्धतीने आमचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होणं, त्याची चर्चा होणं हे अजिबातच अपेक्षित नव्हतं.
पण प्रत्यक्षात हे पत्र हजारो वेळा रीट्वीट झालं आणि त्याच्यावर लाखो प्रतिक्रिया आल्या. कुणी असं पत्र लिहिणाऱ्या पालकांचं कौतुक केलं आहे तर कुणी बाळाच्या रडण्यामुळे त्रासून पोलिसांना न बोलवणाऱ्या शेजाऱ्यांचं कौतुक केलं आहे. कुणी शेजाऱ्यांना टकिला भेट देऊ पाहणाऱ्या या तरुण पालकांच्या प्रेमात पडलं आहे तर कुणी बाळाचं रडणं कसं थांबवायचं, त्याला झोपायला कसं शिकवायचं याचे सल्ले दिले आहेत.

आपल्याकडेही बाळाच्या निमित्ताने शेजाऱ्याबरोबर चटण्या- लोणच्यांची देवाणघेवाण झाली असती आणि नंतर बाळ मोठं झाल्यानंतर दुडदुडू धावत शेजाऱ्यांच्या घरात धावलं असतं तेव्हा त्याच्या बाळलीला सगळ्यांनी कौतुकाने पाहिल्या असत्या.
जगात सगळीकडे जीवनाचा प्रवाह असाच वाहता राहो…

समाप्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2020 6:26 pm

Web Title: father mother apologize to neighbours for child crying dmp 82
Next Stories
1 भारतीय संघाच्या पराभवला जबाबदार कोण?
2 वीजतारांची कुंपणे हत्तींच्या जिवावर
3 पृथ्वी शॉ नेमका कुठे चुकतोय?
Just Now!
X