• शरद कद्रेकर

विराट कोहीलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. वन-डे मालिका ३-० ने गमावल्यानंतर कसोटी मालिकेतही भारतीय संघावर व्हाईटवॉशची नामुष्की आली. अव्वल फलंदाजांचं अपयश हे भारतीय संघाचं कसोटी मालिकेतल्या अपयशाचं प्रमुख कारण ठरलं. वेलिंग्टन कसोटी सामना भारतीय संघाने १० विकेटने गमावला, यानंतर कर्णधार विराट कोहलीने…एका पराभवानंतर राईचा पर्वत करण्याची गरज नसल्याचं म्हटलं होतं. परंतु ज्या पद्धतीने भारतीय फलंदाजांनी या मालिकेत विकेट फेकल्या ते चीड आणणारं आहे.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयी अश्वमेधाला पहिला खिळ बसला तो न्यूझीलंडमध्ये…अजिंक्य रहाणे, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यासारख्या दिग्गज फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नाकाबंदी करुन टाकली. या सर्वांमध्ये कर्णधार विराट कोहलीचं अपयश हे ठळकपणे दिसून येणारं आहे. ४ डावात ९.५० च्या सरासरीने ३८ धावा! गेल्या ५-६ वर्षात विराटच्या बॅटला विळखा पडण्याची ही पहिलीच खेप.. २०१४ इंग्लंड दौऱ्यात १० डावांत विराटला जेमतेम १३१ धावाच करता आल्या, पण त्या इंग्लंड दौऱ्यापेक्षाही न्यूझीलंड दौऱ्यातील या कटू आठवणी विराटला नक्कीच सतावतील. ही कसोटी मालिका भारतीय संघासाठी इतकी भीषण गेली की ४ पैकी ३ डावांत भारतीय संघ २०० पर्यंतही मजल मारु शकला नाही.

ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यात विशेषकरुन दुसऱ्या डावांत भारतीय फलंदाजांनी ज्या पद्धतीने विकेट फेकल्या ते पाहणं दुर्दैवी होतं. सर्वात वाईट पद्धतीने बाद झाला तो म्हणजे अजिंक्य रहाणे…हॅगले ओव्हलची खेळपट्टी म्हणजे एका प्रकारचा हिरवा गालिचाच! या खेळपट्ट्यांवर चेंडू प्रचंड उसळी घेणार ही गोष्ट आता जग जाहीर आहे. मात्र वॅगनरच्या गोलंदाजीवर अजिंक्यने फाईन लेगच्या दिशेने फटका खेळताना ज्या पद्धतीने स्वतःचा त्रिफळा उडवून घेतला ते पाहून अजिंक्यची कीव करावीशी वाटली. सलामीवीर ही भारतीय संघासाठी नेहमीच समस्या राहिलेली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईकर पृथ्वी शॉला दोन्ही कसोटी सामन्यात संधी मिळाली मात्र त्याचा खेळही फारसा आश्वासक नव्हता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजची सध्या रया गेलेली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये या संघाची तुलना सध्या तळातल्या संघांसोबत होते. अशा विंडीडवर मात करत कोहलीच्या संघाने १२० गुणांसह कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दिमाखात सुरवात केली. यानंतर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशलाही भारताने घरच्या मैदानावर पराभवाचं पाणी पाजत आपलं अव्वल स्थान बळकट केलं.

परदेशात खास करुन इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत भारताचा कसोटी विजय दुर्मिळच आहे. तब्बल सात दशकांनंतर भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवून प्रथमच कसोटी मालिका जिंकल्यावर रवी शास्त्री-विराट कोहली यांनी एवरेस्ट सर केल्याच्या थाटात विजयोत्सव केला. पण या मालिकेत स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर बंदीमुळे खेळू शकले नव्हते ही बाब देखील नजरेआड करता येणार नाही. अ‍ॅशेस मालिकेत वॉर्नर, स्मिथ दोघे पण खेळले अन रंगतदार अ‍ॅशेस मालिकेचा आनंद प्रेक्षकांनी लुटला.

पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत, मात्र त्यांना अद्यापही मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षा करण्यात काहीच गैर नसलं तरीही ते परिपूर्ण खेळ करु शकणार नाहीत, कारण आहे त्यांच्या फलंदाजीचं सदोष तंत्र…हे सुधारण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाला खूप मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. गेल्या काही सामन्यांत फॉर्मात असलेल्या भारताच्या जलदगती गोलंदाजांनाही या दौऱ्यात अपयशाचा सामना करावा लागला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत यजमान न्यूझीलंड भारतापेक्षा सरस ठरला अन त्याचेच प्रतिबिंब २-० या निकालात उमटलं. एका पराभवामुळे राईचा पर्वत करु नका हे विराटचं म्हणणं जरी योग्य असलं तरीही या दौऱ्यातलं अपयश झाकता येणार नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहलीला याची जाणीव आहे ही आश्वासक गोष्ट आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.