मंदार भारदे

इंडिगो एअरलाइंस त्यांच्या आंतरराष्ट्रीय रूटवर भारतीय प्रवाशांना डॉलरमध्ये पेमेंट करायला भाग पाडते. त्यांना डॉलर चालतात त्यांना दिरम चालतात, त्यांना दिनार चालतात पण फक्त त्यांना भारतीय रुपये चालत नाहीत.

मी काही दिवसांपूर्वी मुंबई – दुबई इंडिगो फ्लाइटने प्रवास करत होतो. त्यावेळी माझ्याकडे दुबईचे पैसे नव्हते आणि भारतीय रुपये होते. त्यामुळे मला प्रवासात खाण्यासाठी काहीही विकत घेता आले नाही. भारतीय प्रवाशांकडून भारतीय विमान कंपनीला भारतीय रुपये घेण्यात काय अडचण असावी हेच मला कळत नाही. माझ्या शेजारी बसलेल्या एका परदेशी प्रवाशाने मला टोमणा मारला की, बघ तुझ्याच देशातल्या कंपन्यांना तुमच्याच करन्सीवर विश्वास नाही. त्यामुळे ते डॉलर मागतात आणि रुपये मागत नाहीत. मला अतिशय शर्मिंदा व्हायला झालं. खरंतर इंडिगो ही माझी अतिशय आवडती एअरलाइन आहे. जगात सर्वाधिक वेगाने विस्तारणाऱ्या ज्या विमान कंपन्या आहेत त्यात इंडिगो अग्रस्थानी आहे.

त्यांना भारतीय लोकांकडून भारतीय पैसे घेण्याची लाज का वाटत असावी? आंतरराष्ट्रीय रूटवर चालणाऱ्या इतर कंपन्या भारतीय रुपयामध्ये पेमेंट स्वीकारतात असे मला आठवते आहे. मग ‘इंडिगो’च्या बाबतीत काय समस्या असावी हेच कळत नाही. तीन तास काहीही न खाता मला प्रवास करावा लागला हे किती क्लेशकारक आहे हे तरी त्यांनी समजून घ्यायला हवं होतं.

( लेखक स्वत: एअरलाईन आॅपरेटर आहेत. चार्टर एव्हीएशनचा त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. )