– सुनीता कुलकर्णी
लहानपणी एकलेल्या श्रीकृष्ण जन्माच्या गोष्टीपासून आपण तुरुंगाबद्दल ऐकलेलं असतं. त्यामुळे तुरुंग म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती काळकोठडी. अंधार, तिथे खितपत पडलेले कैदी, त्यांना मिळणारं जाडभरडं, बेचव अन्न, क्वचित लावली जाणारी थर्ड डिग्री… सावरकरांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेमुळे त्या काळात पिसावा लागणारा कोलु. आजही एखाद्याला तुरुंगात जावं लागलं तर खडी फोडायला गेला हाच वाक्प्रचार वापरला जातो. त्यामुळे तुरुंगवास म्हणजे फक्त विलगीकरणाची शिक्षा नाही तर नरकवास हे सगळ्यांच्याच मनात पक्कं असतं. पण नुकतीच स्वीडनमधल्या तुरुंगाची छायाचित्रं इंटरनेटवर व्हायरल झाली आणि भल्याभल्यांचे डोळेच विस्फारले.

डॅरेल ओन्स नावाच्या व्यक्तीने आपल्या @IdoTheThinking या ट्वीटर हॅण्डलवरून नुकतेच एका नॉर्दिक तुरुंगाची छायाचित्रं शेअर केली. आपल्या ट्वीटमध्ये तो म्हणतो तुरुंगातल्या या खोल्या म्हणजे सनफ्रॅन्सिस्कोमधल्या तीन हजार डॉलर आकारणाऱ्या अपार्टमेंटसारख्या आहेत.

आणखी एका ट्वीटमध्ये डॅरेल ओन्स म्हणतो तुम्हाला एखाद्या माणसाचं पुनर्वसन करायचं असतं आणि त्याला गुन्हेगारी जीवनापासून दूर ठेवायचं असतं तेव्हा यापेक्षा आणखी चांगलं वातावरण काय असू शकतं?

सार्वजनिक आरोग्यसेवा, शिक्षण, रोजगार आणि असं पुनर्वसन यामुळे गुन्हेगारी खरोखरच कमी होऊ शकते अशी पुस्तीही त्याने जोडली आहे.

त्याने शेअर केलेली छायाचित्रं बघून लोक हरखूनच गेले आहेत. पीटर के यांचं म्हणणं आहे की तुरुंग असे असतील आणि तिथे चांगलं वागवलं जात असेल तर आपला समाज किती चांगला होईल याचा विचार करा.

रॉड डेव्हिडसन हे अमेरिकी नागरिक म्हणतात, स्वीडनमधल्या तुरुंगाचा हेतू गुन्हेगारांचं पुनर्वसन हा आहे. तर आपल्या अमेरिकेतल्या तुरुंगांचा हेतू तिथे जास्तीतजास्त माणसांना पाठवून भरपूर पैसे कमावण्याचा आहे.

प्रतीक भटनागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे की हे छायाचित्रं बघून मला तर वाटलं की कुणीतरी नव्या घरात रहायला गेलं आहे आणि त्याची छायाचित्रं पोस्ट केली आहेत.

तुरुंगातल्या या खोल्या तर माझ्या कॉलेजरुमपेक्षा सुंदर आहेत. हा कसला तुरुंग, या तर हॉटेलपेक्षा छान खोल्या आहेत असंही काहीजणांनी म्हटलं आहे.

स्वीडनमधला तुरुंग आपल्याकडच्या तुरुंगापेक्षा सुंदर आहे असं अमेरिकेतल्या लोकांना वाटत असेल तर आपण भारतीयांनी तर काहीही न बोललेलंच बरं, नाही का?

समाप्त