– महेश टिळेकर, निर्माता-दिग्दर्शक

शरद पवार ही व्यक्ती आहे की एक अदभुत शक्ती हा अनेकांना सातत्याने विचार करायला लावणारा आणि तितकाच सतावणारा प्रश्न. छाती ठोकून पवारांना आव्हानं देणाऱ्या मुरब्बी, धुरंधर राजकीय विरोधकांना खुल्या मैदानात चारी मुंड्या चित करणारा असा हा उमदा पैलवान, राजकिय खेळी करून अनेकांची बिन टाक्यांची ऑपरेशन करणारा कुशल सर्जन. वाढत्या वयानुसार, कामातील उत्साह कमी होतो,शरीरातील उर्जा हळूहळू संपत जाते,स्मरणशक्ती मंदावते.पण म्हातारपणाच्या या सर्व मर्यादा ओलांडून ताठ कण्याने उभा असलेला लढवय्या म्हणजे ’शरद पवार’.

जेंव्हा जेंव्हा शरद पवार यांना भेटण्याचा योग आला आहे तेंव्हा त्या भेटीतून मला अप्रत्यक्षरित्या काहीना काही मिळत गेलं आहे.राजकारण हा विषय सोडून त्यांच्याशी गप्पा मारताना राजकारणा पलीकडचे शरद पवार अनुभवने ही एक माझ्यासाठी नेहमीच आनंदाची गोष्ट असते. साहित्य,कला आणि संगीत याबद्दल या माणसाला असलेलं ज्ञान आणि आवड पाहून कुणीही चकित होईल.समोरचा बॉलर कितीही तरबेज असला तरी बॉल कसा येतोय त्या प्रमाणे दमदार बॅटिंग करणारे शरद पवार मी पाहिले आहेत.आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मी एका हिंदी टीव्ही चॅनल साठी टाईमलेस आशा नावाचा कार्यक्रम केला होता.आयुष्यमान खुराणा त्या कार्यक्रमाचा निवेदक होता.आलेल्या प्रसिद्ध कलाकारांना आयुष्यमान प्रश्न विचारून कार्यक्रमाची रंगत वाढवत होता.शरद पवारांनाही मी या कार्यक्रमाला बोलवले होते.आयुष्यमानला एक प्रश्न मी लिहून दिला आणि तो प्रेक्षकांमध्ये पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह बसलेल्या पवारांना विचारायचाअसं सांगितलं.पण प्रश्न वाचून तो मला म्हणाला”महेशजी इतने रथी महारथी लोगोंके सामने पवार सर को ये सवाल करनेकी मेरी हिम्मत नही है,अभितो मेरा करीयर शुरू हुवा है” मग तिथे असलेला दुसरा कलाकार राघव जुयाल याला मी कसा बसा तयार केला .त्याने प्रश्न विचारला” तुमचं तुमच्या बायको बरोबर भांडण होतं का?आणि झाल्यावर रुसलेल्या बायकोचा रुसवा घालवण्यासाठी तुम्ही नक्की काय करता”.ह्या खेळकर प्रश्नाचं पवारांनी एका वाक्यात मिश्किल उत्तर दिलं ”बायकोचा रुसवा घालवण्यासाठी मी तिच्या पुढे गाणं गातो,तरुण आहे रात्र अजून ही ….. पवारांचे हे उत्तर ऐकून टाळ्या वाजल्या आणि हशा पिकला.

बारामती नाट्य संमेलनात माझ्या मराठी तारका’कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंबिय उपस्थित होते.माझा सत्कार करण्यासाठी शरद पवार साहेब स्टेजवर आले,सत्कार करून स्टेजच्या मागच्या बाजूने ते गाडीकडे निघाले.तिथे उपस्थित असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता माझ्या जवळ येऊन मला म्हणाल्या की त्यांना पवार साहेबांना भेटायचं होतं ते राहूनच गेलं.मी त्यांना घेऊन पुढे निघालो अंतर खूप असल्यामुळं पवार साहेबांना “पवार साहेब” अशी हाक मारली.ती ऐकून मागे वळून ते थांबले.मी आशालता यांची ओळख करून दिली आणि सांगितलं यांची आपल्याला भेटायची खूप इच्छा होती.त्यावर पवार साहेबांनी ”मी तुमचं संगीत नाटक ’मस्यगंधा’ पाहिलंय”.हे सांगून ते नाटक गोव्यात कुठल्या वर्षी कुठल्या वेळी पाहिलं ते ही त्यांनी सांगितलं. जे आशालता यांनाही आठवत नव्हतं. आठवड्या आधी कुणी भेटलेले आपल्याला आठवत नाही तिथं या माणसाची स्मरण शक्ती बघा किती दांडगी आहे.

मुंबईतल्या वाय. बी .चव्हाण ऑडिटोरियम मध्ये मी माझ्या एका कामासाठी गेलो होतो तिथे खाली पवार साहेबांची गाडी दिसली.तिथे वरती असलेल्या त्यांच्या ऑफिस मध्ये ते आल्याचं समजलं. मी सहज जाऊन भेटू म्हणून गेलो.नेहमीप्रमाणेच तिथे त्यांना भेटायला आलेल्या लोकांनी भरपूर गर्दी दिसली तरी मी माझ्या नावाची चिठ्ठी लिहून आत पाठवली. पाच दहा मिनिटांनी आधीचे आत भेटायला गेलेले लोक बाहेर आल्यावर मला बोलावण्यात आले.सियाचीन,लेह लडाख इथ जवानांच्या मनोरंजनासाठी मराठी तारका शो करून आल्याचे मी सांगितले.त्यावर त्यांनी ”हो माहितीये मला तुम्ही जाऊन आल्याचं,तिथं परतापुरच्या पुढं पाकिस्तान बॉर्डरवर पण तुम्ही गेला होतात ना मराठी जवानांच्या तुकडीला भेटायला?”.त्यांचा प्रश्न ऐकून मी अवाकच झालो, त्यांना सांगताना परतापुरचे नाव घ्यायला मी विसरलो होतो पण इथे महाराष्ट्रात बसून जिथं मोबाईल, इंटरनेट सेवाही चालत नाही अश्या संवेदनशील ठिकाणची खबरबात यांना कशी? हा प्रश्न मला पडला आणि मी समजून गेलो की म्हणूनच ह्यांना शरद पवार म्हणतात. तिथे सियाचेनला अठरा हजार फुटांवर ऑक्सीजन कमी असतो अश्या ठिकाणी जवांनाच्या भेटीला पहिल्यांदा गेलेला शरद पवार हा एकमेव मराठी नेता आहे. सियाचेनला जवानांच्यासाठी मराठी तारका कार्यक्रम करण्यासाठी गेल्यावर आम्हाला ही माहिती मिळाली असं मी पवार साहेबांना सांगितले त्यावर फक्त ते हसले. अंदमानच्या पुढे छत्तीस तास समुद्रातून प्रवास करून गेल्यावर तिथे असलेल्या एका बेटावर लक्ष्मीनगर नावाची हजारएक मराठी लोकांची वस्ती आहे तिथं सुनामी आली तेंव्हा त्यांच्या भेटीला आणि मदतीला धाऊन जाणारे शरद पवार हे महाराष्ट्रातील एकमेव नेते असल्याचे तिथल्या गावकऱ्यांनी आम्ही तिथे मराठी तारका कार्यक्रम करायला गेलो तेंव्हा आम्हाला अभिमानाने सांगितले होते.

पवार साहेबांना भेटून मी बाहेर पडलो लिफ्ट मध्ये शिरताना त्यांच्या ऑफिसमधील माणूस धावत निरोप घेऊन आला ” साहेबांनी बोलावलं आहे परत”.मला कळेना पुन्हा का बोलावलं असेल.मी आत गेलो तेंव्हा तिथे बोलण्याच्या नादात मी माझा चष्मा विसरलो होतो ,तो चष्मा पवार साहेब माझ्याकडे देत हसत म्हणाले ” चष्मा इथेच ठेवून चालला होतात तुम्ही,मी फक्त माझाच चष्मा वापरतो”.त्यांनी मारलेली ही कोपरखळी मला जाम आवडली आणि डोक्यात भुंगा सुरू झाला की माझ्या आधी पण तिथे त्यांना भेटायला लोक येऊन गेले होते. त्यांच्यापैकीच कुणाचा तरी तो चष्मा असेल असे न वाटता तो माझाच चष्मा आहे याची कशी काय त्यांना खात्री झाली? म्हणजे बोलताना समोरच्या व्यक्तीच्या हालचाली सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नाही अशी त्यांची तीक्ष्ण दृष्टी.साहित्य, कला,क्रीडा अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचा परिचय,मैत्री आहे. कलाक्षेत्रातील अनेकांना अडचणीच्या वेळी मदतीचा हात देणारा हक्काचा माणूस म्हणून शरद पवार हे नाव वर्षानुवर्ष कलाक्षेत्राला जवळचे आहे. नाट्य परिषदेसाठी त्यांनी वेळोवेळी दिलेलं सहकार्य असो की जी येस टी मुळे वाढलेले नाटकांचे तिकीट दर कमी करण्यासाठी केलेली मोलाची मदत हे फक्त कलारसिक पवारांच्या मुळेच होऊ शकते. दिलीपकुमार,सायरा बानो यांचा मोडणारा संसार शरद पवारांच्या मध्यस्थिमुळे वाचला म्हणून तर सायरा बानो पवार साहेबांना भाऊ मानून राखी बांधतात.

माझ्या बायपासच्या ऑपरेशनचे समजल्यावर पवार साहेबांनी मला फोन केला ”महेश,ऑपरेशन नंतर मिळालेलं आयुष्य म्हणजे मिळालेला बोनस आहे असं समजा आणि लवकर कामाला लागा,आता आयुष्य आणखी वाढलं आहे तुमचं”.त्यांचं हे धीर देणारं वाक्य ऐकूनच बळ आलं.आणि आठवलं की जेव्हा कॅन्सर सारख्या आजाराने हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बाहेर पडल्यावर डॉक्टरांनी विश्रांतीचा दिलेला सल्ला न मानता शरद पवार नावाचा योद्धा एखाद्या तरूनालाही लाजवेल अशा जोशात नागपूरला एका मोर्चात सहभागी होण्यासाठी तडक एअरपोर्टला पोचला.

नुसतं फोनवर त्यांच्याशी चार वाक्य बोलूनही त्यांचेकडून मिळालेली उर्जा घेऊन मी ,बायपास ऑपरेशन नंतर दहा दिवस डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये रहावं लागेल आणि नंतर महिनाभर आराम. असं सांगितलं असताना सातव्या दिवशी घरी आलो त्यानंतर चार दिवसांनी खासदार संजय राऊत यांच्या ठाकरे सिनेमाच्या मुहूर्ताला जाण्यासाठी घराबाहेर पडलो आणि त्याच महिन्यात एका टीव्ही चॅनल वरील कार्यक्रमात मराठी तारका टिमसह भाग घेतला आणि तिथं तारकांच्या सह नाचावं लागलं तेही केलं मी. हे सगळं करण्यासाठी माझ्यात आत्मविश्वास निर्माण करणारी अदभुत शक्ती होती ती म्हणजे ’शरद पवार’.